Home > रिपोर्ट > सिल्लोडमधील मायलेकींची हत्या, आत्महत्या की अपघात?

सिल्लोडमधील मायलेकींची हत्या, आत्महत्या की अपघात?

सिल्लोडमधील मायलेकींची हत्या, आत्महत्या की अपघात?
X

हिंगणघाटमधील युवतीचा तसंच औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये एका महिलेला जाळल्याच्या दोन घटनांच्या पाठोपाठ पुन्हा सिल्लोडमधून एक नवीन घटना उघडकीस आली. १५ फेब्रुवारीपासून डोंगरगाव मधून बेपत्ता असलेल्या मायलेकी १७ फेब्रुवारीला गावातीलच एका शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळल्या. ही घटना आधीच्या दोन घटनांप्रमाणे माध्यमांतून फारशी उचलली गेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादमधील पदाधिकाऱ्यांनी त्यावर रान उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही वृत्तमाध्यमांत किंवा अगदी समाजमाध्यमांतही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मॅक्समहाराष्ट्र ने सर्वप्रथम या घटनेचं वृत्तांकन केलं. कायद्याने वागा लोकचळवळ या सामाजिक संघटनेने बातमीचा पाठपुरावा करतानांच घटनेचं सत्यशोधन केलं आहे.

सत्यशोधन कशासाठी ?

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांनी घटनेची माहिती मिळताच मायलेकींच्या मृतदेहांचं इन-कॅमेरा शवविच्छेदन व्हावं, म्हणून पोलिसांवर दबाव आणला. ती मागणी मान्यही झाली. या घटनेत मृत महिलेच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय होता. मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून बलात्कारानंतर गळा दाबून खून झालाय व त्यानंतर विहिरीत ढकलून देण्यात आलंय, असा नातेवाईकांना संशय आला. त्यामुळे घटनेने गंभीर वळण घेतलं.

औरंगाबादहून या घटनेबाबत चालू घडामोडी नीट समजून येत नव्हत्या व पोलिस मोबाईलवर मोघम बोलत होते, त्यामुळे घटनास्थळी जाण्यावाचून पर्याय नव्हता. महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात संविधानिक पध्दतीने संयमाने काम करणाऱ्या कायद्याने वागा लोकचळवळीने या घटनेचं शक्यतोवर सत्यशोधन करायचं ठरवलं. मॅक्समहाराष्ट्र ने त्याला पाठबळ दिलं आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना सिल्लोडला रवाना झाले.

कौटुंबिक पार्श्वभूमी :

वंदनाबाई बनकर आणि भारती साळवे अशी मृत मायलेकींची नावं आहेत. वंदनाबाईंचं आडनाव माहेरचं आणि भारतीचं आडनाव वडिलांकडचं म्हणून दोन्ही आडनावात फरक दिसतो. वंदनाबाई नवऱ्यापासून विभक्त गावात माहेरघरीच आईसोबत राहत होत्या. वंदनाच्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं, असं तिचे नातेवाईक सांगतात. वंदनाबाईचा नवरा डोंगरगावपासून जवळच्याच एका गावात राहतो.

पण तो वंदना किंवा मुलांच्या संपर्कात नव्हता. विलास साळवे हा वंदनाबाईचा दुसरा नवरा. तोही आता तिच्या संपर्कात नाही. वंदनाची आई जनाबाई गावातील अंगणवाडीत खिचडी बनवायचं काम करते, तर नववीत शिकणारा मुलगा नीतिनही शाळेतून आल्यावर एका किराणा दुकानात काम करतो. वंदनाबाई घरातील शेळ्यांसाठी रोज गवत आणायचं काम करत होती.‌

घटनेदिवशी काय घडलं ?

१५ फेब्रुवारीला ती गवत आणण्यासाठी म्हणून जवळच्याच शेतात गेली होती. घरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर शेतात ती गेली होती. सकाळी दहाच्या सुमारास वंदनाबाई शेतात गेली, ती संध्याकाळ झाली तरी परतली नाही, म्हणून तिची शोधाशोध सुरू झाली. अखेर पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. मायलेकी हरवल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली खरी, पण एक महिला आणि तिची लहानगी मुलगी आपल्या हद्दीतून बेपत्ता होते, हा विषय पोलिसांना फारसा गंभीर वाटला नाही. पोलिसांनी दोन दिवस कसलाही तपास केला नाही, अशी वंदनाच्या नातेवाईकांची तक्रार आहे.

मृतदेह कुठे आढळले?

१७ फेब्रुवारी २०२० रोजी गावातीलच हकीम खां पठाण यांच्या शेतातील विहिरीत मायलेकींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांना पहिली खबर मिळाली ती पठाण आणि पांडुरंग शिरसाट या पोलिस पाटलाकडून. त्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे आपत्ती निवारण टीमने येऊनच मृतदेह बाहेर काढावेत, अशी मागणी केली. त्यावरून पोलीस आणि मयताच्या कुटुंबीयांच्यात वादही झाला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने खाट आणि दोराच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तणावपूर्ण परिस्थिती

पोलिसांनी मागवलेल्या रुग्णवाहिकेवर संतप्त नातेवाईकांपैकी दगडफेक केल्यामुळे आलेली रुग्णवाहिकाही निघून गेली; गावात प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ओम्नी गाड्या मुस्लिम समाजातील लोकांच्या आहेत, त्यांनीही तणाव पाहता देण्यास नकार दिला. "या आधीच्या प्रकरणात अश्याच प्रकारच्या घटनेत मुस्लिम समाजाताले काही तरुण अद्याप शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला नसावा" असा एक सूर पुढे आला.‌ शिवाय, मयताच्या वस्तीतीलच काही जणांकडे वाहने असताना, त्यांनीही वाहन व्यवस्था केली नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

शवविच्छेदनात काय दिसलं?

त्यापाठोपाठ, शवविच्छेदन सिल्लोडला न करता औरंगाबाद येथे करण्यात यावी, अशी नातेवाईंकांनी मागणी केली, त्यानुसार मृतदेह औरंगाबादला घाटी रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व घटनास्थळी पोहचलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी लावून धरल्याने पोलिसांनी तसा निर्णय घेतला खरा, पण रात्रीच्या वेळी ते शक्य नसल्याचे पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं होतं. परंतु, कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं; त्यामुळे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात आलं.

संशय कोणावर?

सद्यस्थितीत, पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत्यू इथवर निष्कर्ष पोहचलाय. पण मायलेकी पाण्यात पडल्या की ढकलल्या गेेल्या, हे त्यावरून स्पष्ट होत नाही. मायलेकींचे डोळे, जीभ बाहेर आलेले होते, असं नातेवाईक व ग्रामस्थ सांगतात. कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली असता, त्यांचं म्हणणं आहे की अत्याचार करून, त्यानंतर मायलेकींना मारून विहिरीत टाकण्यात आलं आहे. शेतमालक पठाणवर त्यांचा संशय आहे. घाटी रूग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालाबद्दल वंदनाबाईचे नातेवाईक संशय व्यक्त करत आहेत. ‌

घटनेचे इतर कंगोरे व पोलिसांची भूमिका :

बेपत्ता झाली त्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास, वंदना गवत घेऊन घरी आली होती. "बकरीसाठी असलं कसलं गवत आणलं, " यावरून आईसोबत तिचा वाद झाला होता. त्यावेळी रागाने घरातून बाहेर पडलेल्या वंदनाच्या मागे तिची लेक भारतीही रडत रडत गेली होती, अशी माहिती पोलिसांकडे आहे. पण अजून तशी पृष्टी झाली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गावातील इतर लोकांशी संवाद साधला असता, त्यांच्याकडून अशी माहिती पुढे येत आहे की, वंदना भोळसट स्वभावाची होती.

तिचे दोन विवाह अपयशी ठरलेले होते. त्यामुळे तिने मुलीला आधी फेकून आत्महत्या केल्याची किंवा पाय घसरून पडल्याची शक्यताही असू शकते. पण वंदनाचे नातेवाईक म्हणतात, विहिरीजवळ गवत जमा करण्यासारखी परिस्थिती नाही, त्यामुळे पाय घसरून पडायची शक्यता नाही. शिवाय, तिच्या वैवाहिक आयुष्यात घडलेल्या गोष्टी आजच्या नाहीत, तर अचानक आत्महत्या कशाला करेल? मृतदेहांची अवस्था बघता त्यांना मारूनच विहीरीत फेकण्यात आलंय, हे कोणीही सांगेल.

बलात्कार झालाय का?

शवविच्छेदन अहवालाबाबत काही तज्ज्ञ डाॅक्टरांशी बोलल्यावर अशी माहिती मिळाली की दोन-तीन दिवस पाण्यात बुडालेल्या मृतदेहाच्या तपासणीत बलात्कार निश्चित करणं कठीण आहे. तो दिसून येत नसला तरी झालाच नव्हता, असंही ठामपणे म्हणता येत नाही.

पोलिस त्यामुळे सावधानतेने पावलं टाकत आहे. डोंगरगावात त्यांनी श्वानपथकही फिरवलं. त्याच बरोबर मयतांचे शरीराचे काही भाग नखे, डोळ्याचा काही भाग, ओठाचा काही भाग औरंगाबादला, तर पोटातील पाणी व विहिरीतील पाणी तपासणीसाठी मुंबईत कालिना येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलं आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पी पी इंगळे यांनी दिली. जोवर मुंबई आणि औरंगाबादहून प्रयोगशाळा अहवाल येत नाही, तोवर कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येता येणार नाही, असं इंगळे यांनी सांगितलं.

डोंगरगावात दंगलपथक कशासाठी तैनात?

एकंदरीत, हत्या, आत्महत्या व अपघात या सगळ्या शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. मुस्लिम बहुसंख्य ( किमान ५०-६० टक्के) असलेल्या डोंगरगावात बौध्द समाज दहा टक्के आहे. बाकी हिंदूंमधील मराठा वगैरे इतर जाती आहेत. एक बौध्द समाज वगळता या घटनेवर इतर कोणी आक्रमक नाही.

गावातली वडाप प्रवासी वाहतूक मुस्लिमांकडे आहे. सगळ्या समाजांचा एकमेकांशी रोजचा संपर्क आहे. पण घटनेबद्दल लोक दबक्या आवाजात बोलतात. डोंगरगावात सद्य परिस्थितीत गावात तणावपूर्ण शांतता आहे. तपास संपलेला नाही. निष्कर्ष काहीही असू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे.

-राज असरोंडकर आणि राकेश पद्माकर मीना

Updated : 24 Feb 2020 10:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top