ट्रोल होणा-या रश्मीच्या पाठिशी तुम्ही उभे राहणार का?
Max Woman | 4 April 2020 5:45 PM IST
X
X
“तुम्हाला दिव्यांचीसुद्धा भीती वाटायला लागली. तुमचे अंधारातले उद्योग उघड होतील वाटतं. रात्री कुणाच्या बंगल्यावर जाता, हे कळेल याची भीती आहे का ? पण घाबरू नका, आम्ही सांगणार नाही कुणाला?” we support @narendramodi
भाजपाचा सोशल मिडियाचा नाशिक जिल्हाप्रमुख विजयराज जाधव याचं एका महिला पत्रकाराला दिलेलं उत्तर ! का तर मोदींच्या दिवेथिअरीला विरोध केला म्हणून !
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर लगेचच पत्रकार रश्मी पुराणिक यांनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की थाळी बजाव नंतर लोक काय दिवे लावतील, याचा विचार पण भयावह आहे.. संकट काय, सुरुये काय…
थाळी बजाव नंतर लोक काय दिवे लावतील याचा विचार पण भयावह आहे..
संकट काय सुरुये काय... #दिवेलावणारीजनता #विषाणूउजेडातपणयेऊशकतो
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) April 3, 2020
या ट्वीटवर भाजपा समर्थकांनी रश्मी पुराणिक यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या. त्यातली विजयराज जाधव यांची प्रतिक्रिया आक्षेपार्ह होती. जाधव हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जातात. पत्रकार पुराणिक यांनी त्यांनाही ट्वीट केलं होतं.
दरम्यान भाजपा सोशल मिडियाचे महाराष्ट्र प्रमुख प्रवीण अलई यांनी दिलगिरी व्यक्त करत जाधव हा भाजपाचा पदाधिकारी नसल्याची सारवासारव केली. जाधव याने ट्वीट काढून टाकलेले असले तरी नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्क्रीनशाॅटवरून विजयराज जाधव विरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली.
५ एप्रिलला रात्री नऊ वाजता अंधार करून दिवे पेटवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलंय. त्याला यावेळी जोरदार विरोध होतोय. त्यावरून मोदी समर्थक आणि विरोधकांत चांगलीच जुंपलीय. पण जिथे समोर महिला येतात, तिथे पुरूष खातेदार साधारणतः जी भाषा वापरतात, तीच जाधव याने ट्वीट केली आणि आपल्या राजकीय संस्कृतीचे “दिवे” लावले. ते त्याला भारी पडले ! नाशिक पोलिसांनी त्याला दणका दाखवलाच.
For your kind information @SPNashikRural #Help pic.twitter.com/fnH4BCEP3T
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) April 3, 2020
व्यक्त होताना किमान बदनामी करू नये, टीका करताना मर्यादा ओलांडू नये इतकीच अपेक्षा आहे! अशी प्रतिक्रिया पत्रकार रश्मी पुराणिक यांनी पोलिसी कारवाईनंतर आभाराचं ट्वीट करताना दिलीय.
या प्रकरणाविषयी पत्रकार रश्मी पुराणिक यांनी मॅक्सवुमन सोबत बोलताना टीका करताना मर्यादा ओलांडू नये असं म्हणत आपली भावना व्यक्त केली,
आज मी पहिली तक्रार नोंदवली म्हणून कारवाई झाली. पण, अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यावर टीका होत असते पण कधीही कारवाई होत नाही. मी पत्रकार आहे म्हणून कारवाई झाली असं नको वाटायला. म्हणून गृहखात्याने दखल घ्यावी आणि सक्षम नियमावली बनवावी. जेणेकरुन सर्वसामान्य मुलींच्या बाबतीतही तितक्याच तत्परतेने कारवाई व्हायला हवी.
महिलांना अशाप्रकारे ट्रोल करण्याचे प्रकार तेव्हाच थांबतील जेव्हा काही ठाम भुमिका घेतली जाईल. कारण अशा किती मुली आहेत ज्या बोलतील किंवा पोलिस ठाण्याची पायरी चढतील. या घटनेनंतर मला सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला. तसा सर्वच मुलींना मिळणार नाही. म्हणून हे प्रकार थांबवण्यासाठी गृहखात्याने सक्षम पाऊलं उचलावीत.
Updated : 4 April 2020 5:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire