LockDown : ‘या’ गरोदर महिलांचं काय होणार?
X
कोरोना व्हायरसमुळे राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊनचा त्रास भटक्या समाजातील महिलांना मोठ्या प्रमाणावर होतो आहे. हाताला काम नाही, राहण्याचा ठावठिकाणा नाही, कागदपत्रांची वाणवा असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात आपल्या पोटाची खळगी कशी भरायची हा पालावरच्या कुटुंबांना पडलेला मोठा प्रश्न आहे. त्यात गरोदर माता आणि नवजात बालाकांच्या आरोग्याचा प्रश्न तर फारचं गंभीर आहे.
बीडच्या माजलगाव मधील असाच एक प्रकार समोर आला आहे. पालावर राहणाऱ्या गरोदर मातांना आहार वेळेवर मिळत नाही. वीटभट्टी किंवा शेतात काम करायला गेल्यास गर्दी नको म्हणून कामावरुन काढुन टाकलं जात आहे. राशन कार्ड नसल्याने तहसील कार्यालयातून यांना धान्य देण्याचा आदेश दिला असला तरीही राशन दुकानदार ते देत नाहीत. पालावरील महिलांची आणि मुलांची अंगणवाडीत नोंद घेतली गेली नसल्याने लॉकडाऊनच्या काळात सकस आहार किंवा धान्य देण्यासही नकार दिला जातोय. अशा पद्धतीने पालावरील या कुटुंबांची उपासमार होतेय.
अनेकदा पालावरील महिलांना अनैच्छिक गरोदरपण करावी लागतात. उपासमार पाचवीला पुजलेली असताना गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर आईलाच पुरेसा आहार मिळत नसतो. अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कुपोषणाचं प्रमाण वाढतं. सव्वा महिन्याची बाळंतीण असलेल्या स्त्रीचे स्तन दुधाने भरलेले असणं आवश्यक आहे पण, पालावरील या महिलांना दुध येत नाही. मग कुपोषित लेकराला सोबनी झाली म्हणत त्या महिलेची सावली इतर महिलांवर पडू देत नाहीत.
वास्तविक पाहता ही परिस्थिती फक्त कोरोनाच्या काळातच आहेत असं नाही. या समस्या कायम कमी अधिक प्रमाणात भेडसावत असतात. “सरकारने रोजगार हमी योजनेत या लोकांना कामं, आधार कार्डावर राशन आणि संबंधित कुपोषित मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करावा नाही तर, कोरोनाने नाही तर कुपोषणाने पालावरील लेकरं नक्की मरतील.” अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या सत्य़भामा सौंदरमल यांनी व्यक्त केली आहे.
पालावरील महिला आणि मुलांचा उपासमार आणि भुकबळीचा गंभीर वास्तव सत्यभामा यांनी व्हिडीओच्या माध्यामातून लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करुन या कुटुंबांना शक्य त्य़ा स्वरुपात मदत करण्याची मागणी केली आहे. पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/L9DxiqwJ7rA