Nirbhaya Case: जुन्या वकिलावर फसवणूक केल्याचा आरोप, दोषींना फाशी पुन्हा लांबली?
X
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींनां फाशीच्या शिक्षेस होणाऱ्या विलंबामुळे देशभरात नाराजीचा सुर उमटतो आहे. ३ मार्च रोजी दोषीची फाशीची शिक्षा रद्द झाली होती. त्यानंतर २० मार्चला त्यांना फासावर लटकवले जाणार आहे. मात्र, आता दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवरच आरोप करत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने या प्रकरणात आता नवीनच भर पडलीय.
क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यास तीन वर्षांचा कालावधी असतो याची माहिती आपल्याला जुन्या वकिलांनी दिली नाही असं मुकेशने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाकडे केलेल्या सदर याचिकेत सर्व कारवाया रद्द करुन पुन्हा क्युरेटिव्ह याचिका आणि इतर कायदेशीर पर्याय वापरण्याची परवानगी देण्यात यावी, असे म्हटले आहे. वकील एम. एल. शर्मा यांच्यामार्फत मुकेशने ही याचिका कोर्टात दाखल केली आहे.
भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमिकस क्युरी (कोर्ट सहाय्यक) यांना प्रतिवादी केलं आहे. त्यानं याचिकेत म्हटलं की, मला एका कटाचा बळी बनवण्यात आलं आहे. लिमिटेशन अॅक्टनुसार क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा काळ असतो, हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे मला माझ्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. असं याचिकेत म्हटलं आहे.
लिमिटेशन अॅक्टच्या कलम १३७ नुसार याचिका दाखल करण्याची कालमर्यादा निश्चित आहे. यासाठी तीन वर्षांपर्यंतचा काळ असतो. त्यामुळे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी मिळू शकतो. मुकेशची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी वेळ होता. जो कालावधी जुलै २०२१ पर्यंत आहे.