नवनिर्वाचित महिला खासदार...
X
सतराव्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल होता. या निकालात २०१४ पेक्षा अधिक बहुमताने भाजप जिंकलं आहे. या घवघवीत यशाबद्दल देशाभरात जल्लोषाचे वातावरण सुरु आहे. युतीच्या उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात भरघोस मतांनी बाजी मारली आहे. तर महाआघाडीचा सुफडासाफ झाला आहे.
महाराष्ट्रातल्या नव्या महिला खासदार…
बीड – बीड मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे या १ लाख ७७ हजार ८२९ मतांनी विजयी झाल्या असून बजरंग सोनावणे यांना पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे या व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस सोबतच डर्माटॉलॉजीमध्येही एम.डी केलं आहे. वडिलांच्या निधनानंतर 2014 साली बीड मतदारसंघातून वडिलांच्या जागी त्या भाजपतर्फे उभ्या राहिल्या आणि प्रचंड मतांनी त्या निवडूनही आल्या. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे सात लाख मतं मिळवणा-यापैकी एक आहेत. 2014 साली त्या बीड मतदारसंघातून निवडून आल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. यंदाही याच मतदारसंघातून ते भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांची बहिण, पंकजा मुंडे या सध्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत. लोकनेते म्हणवल्या जाणारे वडिल गोपीनाथ मुंडे यांचा वारसा या दोन्ही भगिनी चालवत आहेत.
नंदुरबार – नंदुरबार मतदारसंघातून डॉ. हिना गावित यांचा ९५ हजार ६२९ मतांनी विजय झाला असून हिना गावित यांना ६ लाख ३९ हजार १३६ मतं पडली तर के. सी. पाडवी यांच्या पारड्यात ५ लाख ४३ हजार ५०७ मतं आली आहेत. डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या हिना गावित या देखील वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी मंत्री आणि सध्या भाजपचे आमदार असलेले डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून हिना यांना राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. भाजप खासदार डॉक्टर हिना यांना लोकसंघटनाची नस चांगलीच सापडलेली आहे. 2014 साली काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणा-या नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत भाजपला तिथे यश मिळवून देण्याचा विजय त्यांच्या नावावर होता आणि तो तसाच त्यांनी कायम ठेवला आहे. आदिवासी समाजातून पुढे येऊन सर्वात कमी वयात खासदारपदाची जबाबदारी तसंच चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणा-या हिना गावित यांची लोकप्रिय नेत्या म्हणून ख्याती आहे. नंदुरबारसारख्या एकेकाळच्या मागास आणि विकासापासून वंचित जिल्ह्यातील अनेक विकासकामांना डॉ. हिना गावित यांनी मार्गी लावलं आहे. आता पुढील पाच वर्षही त्यांना जनतेनं मिळवून दिली आहे.
रावेर – रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांचा ५ लाख ६९ हजार ८२१ मतांनी विजय झाला आहे. सरपंच पदावरून खासदारकीपर्यंत प्रवास करणा-या रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. रावेर मतदारसंघातून त्या 2014 साली निवडून आल्या होत्या. 16 व्या लोकसभेतील त्या सर्वात युवा संसद सदस्य होत्या. रक्षा यांना ग्रामीण जीवनाची आणि आवश्यक विकासाची उत्तम माहिती आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. 2010 ते 2012 या काळात त्या मुक्ताईनगरच्या सरपंच होत्या. पती निखिल खडसे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या जळगाव जिल्हा परिषदेतील रिक्त जागेवर रक्षा या निवडून आल्या आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं. 2014 साली महिला सशक्तीकरण समितीच्याही त्या सदस्य होत्या. आता २०१९च्या या निवडणुकांत महत्तवपूर्ण विजय त्यांच्या हातात आला आहे.
उत्तर-मध्य मुंबई- सलग दुसऱ्यांदा पूनम महाजन या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. पूनम यांना ४ लाख ८२ हजार ४७५ मतं मिळाली असून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना ३ लाख ५४ हजार ५६७ मत मिळाली आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी अमेरिकेतील टेक्सासमधील डल्लास येथून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे उच्चशिक्षणही लंडन आणि अमेरिकेत झाले आहे. ब्रायटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून त्यांनी 2012 साली बीटेकची डिग्री घेतली. वडिल प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा निर्धार केला. 2014 साली काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांना मोठ्या मताधिक्याने हरवून पूनम निवडून आल्या. तर 2019 मध्येही त्यांनी हा विजय कायम राखून ठेवला आहे.
बारामती- या मतदारसंघाकडे अख्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला असून भाजप तोंडघशी पडलं आहे. देशभरातून बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवता आलं नाही. सुप्रिया सुळे यांना 6 लाख 83 हजार 705 मतांनी विजयी झालेत तर कांचन कुल यांना 5 लाख 28 हजार 711 मतं पडली आहे.देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यशस्वीपणे वडिलांचा वारसा चालवत आहेत. मुंबईत शिक्षण घेतलेल्या सुप्रिया या विज्ञानशाखेतील मायक्रोबायॉलॉजीच्या पदवीधर आहेत. लग्नानंतर सुप्रियाताई या पती सदानंद सुळे (बाळासाहेब ठाकरे यांचे बहिणीचे पुत्र) यांच्यासमवेत अमेरिकेत गेल्या. तिथे बर्कले युनिवर्सिटीत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. काही वर्ष अमेरिका आणि जकार्ता येथे राहिल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि त्यांच्या आवडत्या सामाजिक कार्यांमध्ये मग्न झाल्या. महिला सक्षमीकरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 2006 साली त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. संसदेत आणि मतदारसंघात भरीव कामगिरी करणा-या सुप्रियाताईंनी 2014 साली बारामतीतून विजय मिळवला. ग्रामीण विकास, पर्यावरण, तंत्रज्ञान, महिला बचत गट अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम योगदान दिलेले आहे. सलग तिसऱ्यांदा सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.