Home > Max Woman Blog > सध्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात महत्व प्राप्त होण्यापाठीमागे शरद पवारांचे योगदान…
सध्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात महत्व प्राप्त होण्यापाठीमागे शरद पवारांचे योगदान…
Max Woman | 12 Dec 2019 10:14 AM IST
X
X
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी जे सामाजिक कार्य केले, ते कार्य खऱ्या अर्थाने आजघडीला पुढे घेऊन जाणारा जर कोण नेता असेल तर शरद पवार आहेत. आई शारदाबाई पवार यांनी दिलेली शिकवणुक आणि पुरोगामी वंशाचा वारसदार म्हणुन त्यांनी स्त्रीवर्गाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व देण्याची आणि स्त्रियांचे समाजातील दुय्यमत्व घालविण्याची भुमिका शारदासपुत शरद पवारांनी घेतली.
१) मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी १९९३ मध्ये महाराष्ट्रात राज्य महिला आयोग स्थापन करुन देशातील पहिले महिला धोरण तयार केले. या महिला धोरणात महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, त्यांची मानहानी करणाऱ्या प्रथांवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर सल्ला देणे यावर भर दिला.
२) १९९३ साली कॅबिनेटमध्ये मध्ये महिला व बालविकास विभाग या स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणुन स्थापना केली. या विभागामार्फत आज महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवर आधारित विविध योजना राबविल्या जातात. त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होतो.
३) १९९४ साली महिला, मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा केला. हा कायदा पुढे २००५ मध्ये भारत सरकारनेही राबवला. या कायद्यामुळे महिला, मुलींना आधार मिळाला.
४) १९९३ साली राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे २०११ मध्ये हे प्रमाण ५० टक्के केले. त्यामुळे उंबरठ्याच्या आत आयुष्य घालवणाऱ्या महिलांना “समान संधी समान सत्ता” या न्यायाने गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा कारभार करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा सर्वच पक्षांना झाला.
५) केंद्रीय संरक्षणमंत्री असताना त्यांनी महिलांना तिन्ही सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. संरक्षण खात्यात महिलांना ११ टक्के आरक्षण हा त्यांचा क्रांतिकारी निर्णय ठरला. आज संरक्षण दलात महिला मानाने देशसेवा करत आहेत.
६) महिलांकडे आपल्याला दिलेले कुठलेही काम काळजीपुर्वक करण्याची दृष्टी असते याची नोंद घेऊन शरद पवारांनी महिलांना हवाई दलात वैमानिक म्हणुन संधी मिळावी यासाठी संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे मन वळविले. महिला वैमानिक म्हणुन रुजु झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या अपघाताच्या संख्येत लक्षणीय घट झाली हे त्याचेच द्योतक असल्याचे हवाई दलाचे अधिकारी सांगतात.
७)शरद पवारांनी महिलांना पोलीस दलात भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे ग्रामीण, शहरी भागातील कित्येक शिक्षीत मुुली पोलीस दलात भरती होऊ शकल्या. आज त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ सुरळीत सुरु आहे.
८) ग्रामसभा मध्ये गावातील ७५ टक्के महिलांनी मागणी केल्यास गावातील दारुचे दुकान बंद होईल हा कायदा त्यांनी केला. ग्रामीण भागातील महिलांना दारुड्या पतींमुळे होणारा त्रास यामुळे कमी झाला. हा निर्णय महिलांना झुकते माप देणारा आहे.
९) कोणताही हुंडा न घेता लग्न केले. क्रिकेटर सदु शिंदे यांची कन्या प्रतिभा या त्यांच्या पत्नी आहेत. मुलगी सुप्रिया यांचा जन्म झाल्यानंतर स्वतःची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन त्यांनी समाजापुढे आदर्श मांडला. एका मुलीवर कुटुंब नियोजन करुन त्यांनी वंशाचा दिवा, वगैरे समजुतींवर जोरदार प्रहार केला. मुलींना मुलांप्रमाणेच दर्जा मिळावा म्हणुन त्यांनी घेतलेला हा निर्णय आदर्श आहे.
१०) कोणत्याही शासकीय खरेदीविक्रीत (जमीन, घर किंवा इतर) पतीसोबत पत्नीचेही नाव लावणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला. यामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत महत्वाचे स्थान मिळाले.
११) महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ उभी करुन राज्यातील महिला बचत गटांना केवळ ४ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वेगवेगळ्या इव्हेंटमधुन महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवुन दिली. या निर्णयामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळाली.
१२) घरातील महिला हीच घरातील कुटुंबप्रमुख असेल हे धोरणही शरद पवारांनी अंमलात आणले. त्यामुळे महिलांचा बरोबरीचा दर्जा मिळाला आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला.
१३) राज्यात पहिल्यांदाच तरुण महिलांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस स्थापन करुन त्या माध्यमातुन स्त्रीभ्रुणहत्या, बालविवाह, स्त्रीशिक्षण, मुलींची लग्ने या विषयांवर राज्यात जागर जाणीव अभियान राबवले. त्या अभियानाची दखल घेऊन राज्य सरकारने महिला, मुलींसाठी २०१४ साली सुकन्या योजना लागु केली.
Updated : 12 Dec 2019 10:14 AM IST
Tags: @PawarSpeaks #SharadPawar #शरदपवार #शरद_पवार maharashtra-politics sharad pawar sharad-pawar happy birthday
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire