Mumbai Rain | मुबंईत पावसाची हजेरी, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा
X
मुंबईमध्ये मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली (Mumbai Rain) असून वाढत्या गरमीपासून मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाने हलक्या सरींसह हजेरी लावली. पावसाने लावलेली हजेरी आणि लॉकडाऊनच्या नियमांमधील शिथिलता पाहता मुंबईकर आता पावसाळी खरेदीच्या दृष्टीने बाहेर पडतील.
दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या 48 तासात मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उद्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळून चक्रीवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.