'मॅक्सवुमन'चा धक्कादायक पाहणी अहवाल...
Max Woman | 7 March 2019 9:49 PM IST
X
X
महाराष्ट्र पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसांना समान वागणूक मिळत नाही, तसंच जबाबदारीची कामे ही दिली जात नाहीत अशी धक्कादायक माहिती 'मॅक्सवुमन'ने केलेल्या पाहणी अहवालात समोर आली आहे.
'मॅक्सवुमन'ने राज्यातील जवळपास २७ जिल्ह्यांमध्ये फिरून केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष समोर आला आहे. जवळपास सर्वच पोलीस अधीक्षकांच्या केबिन बाहेर महिला पोलिसांची बदलीसाठी गर्दी गोळा होत असते. प्रशिक्षणादरम्यान किंवा प्रशिक्षणानंतर ड्युटी जॉइन केल्यानंतर काही काळातच महिला पोलिसांचं लग्न ठरतं आणि मग त्यानंतर सुट्ट्यांची मागणी सुरू होते, नवीन लग्न झाल्यानंतरचं पहिल्या वर्षी विविध घरगुती कार्यक्रमांसाठी अनेक महिला पोलीसांना कामात सूट हवी असते. अशा वेळी महिला पोलिसांशी डील करणं कठीण होऊन बसतं असं एका पोलीस अधीक्षकाने सांगितलं.
आम्ही महिला पोलिसांना इन्वेस्टीगेशन किंवा इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या देत नाही, असं एका पोलीस अधीक्षकाने मॅक्सवुमनला सांगितलं. महिला पोलीस सिन्सिअरली काम करतात. मात्र तरी सुद्धा इन्वेस्टीगेशन त्यांच्याकडे सोपवण्याची हिंमत होत नाही असं ही या अधिकाऱ्याने सांगितलं.
बाळंतपणानंतर महिला पोलिसांना ऑफिस ड्युटी हवी असते. त्यामुळे वायरलेस किंवा हेडक्वार्टर मध्ये डयुटीसाठी अनेक अर्ज येतात. सर्वांनाच कार्यालयीन ड्युटी देता येत नाही. त्यामुळे ट्रेनिंगच्या दरम्यानच या बाबीचा विचार करून ट्रेनिंग दिलं जावं अशी इच्छा विदर्भातील एका पोलीस अधीक्षकाने व्यक्त केली. महिला पोलिसांच्या मुलांसाठी बेबीकेअर उपलब्ध नसल्याने महिला पोलिसांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचंही समोर आले आहे.
बीडमध्ये काम केलेल्या एका पोलीस अधीक्षकांनी तर थेट सांगितलं की, महिलांना चांगलं ट्रेनिंग दिलं जातं, पण प्रत्यक्षात त्या कामाला सुरूवात करतात त्यावेळी त्यांचा रोल बदललेला असतो. इथे येणाऱ्या महिला 12 वी पासून उच्चशिक्षण घेतलेल्या असतात. तरी त्यांची मानसिकता चूल आणि मूल वालीच असते. बहुतेक सर्वच महिला पोलीस गृहकलहाने ग्रासलेल्या असतात. त्यांच्या ड्युटीच्या वेळांमुळे घरी वाद होत असतात. खूप महिला पोलीस अॅनिमिकही आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होत असतो.
पश्चिम महाराष्ट्रातील एका पोलीस अधीक्षकाने खळबळजनक माहिती दिली. त्यांच्या निरिक्षणानुसार, महिला पोलीस मोठ्या प्रमाणावर मोबाईल मध्ये गेम खेळण्यात किंवा व्हॉटसऍपवर चॅटींग करण्यात बिझी असतात. अजूनही महिला पोलीस सक्षम आहेत हे स्विकारण्याची मानसिकता पोलीस दलात नाही. त्यामुळे आजही आम्ही त्यांना प्रोटेक्ट करण्याच्या मानसिकतेत असतो. त्याला मी सुद्धा अपवाद नाही. जर आम्ही त्यांना जबाबदारीची कामं दिली तर कदाचित त्यांना मोबाईल वर खेळायला वेळ मिळणार नाही.
गडचिरोली, सोलापूर अशा भागांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या एका पोलीस अधिक्षकाने मान्य केलं की महिला पोलिसांना ते बाहेरच्या बंदोबस्तासाठी फार पाठवत नाहीत. महिला पोलीस डिक्टेशन घेण्याचं काम, फायलिंग, रेकॉर्ड मेन्टेनन्सचं काम चांगलं करतात. सोशल मीडियावर चॅटींगमध्ये महिलांबरोबरच पुरुष पोलीसही तितकेच बिझी असतात असंही या अधिक्षकांचं म्हणणं आहे.
महिलांना सहसा गुन्हे विभाग दिला जात नाही. ज्यांनी क्राइम सांभाळलंय अशा महिला पोलीस अधिकारी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. क्राइम विभाग सांभाळलाय अशा एका महिला पोलीस अधिकारीने तर स्पष्टच सांगितलं की, नव्या डब्ल्यूपीसी आमच्यासाठी लायबिलिटी आहेत. त्या आल्या की लगेच त्यांची लग्नं होतात, मग एक-दोन बाळंतपणं, आणि त्यानंतर त्या पोलिसींगच्या कामाच्या राहत नाहीत. मग त्या बैठ्या कामांसाठी विनंत्या करतात. त्यांना काहीच डोकं नाहीय अशाच त्या वागतात. साड्या घालू नका सांगितलं तरी त्या बंदोबस्ताला साड्या घालतात. मॉब जमला, आक्रमक झाला तर काही महिला पोलीस थेट रडायला लागतात. जास्तीत जास्त वेळ कानात इअरफोन लावून गाणी ऐकण्यात, मोबाईलवर चॅटींग करण्यात त्या घालवतात.
मॅक्सवुमनने चर्चा केलेल्या जवळपास 80 टक्के पोलीस अधीक्षकांनी महिला पोलीसांवर आपण जबाबदारीची कामं सोपवत नसल्याचं सांगितलं.
• जवळपास 90 टक्के अधिकाऱ्यांनी महिला पोलीस मोबाईल वर जास्त वेळ असतात असतात अशी माहिती दिली.
• जवळपास 95 टक्के अधिकाऱ्यांनी महिला पोलीस प्रामाणिक, नेमूण दिलेल्या कामं योग्य रितीने करतात अशी माहिती दिली
• 90 टक्के अधिकाऱ्यांच्या मते महिला पोलीस वायरलेस आणि रेकॉर्ड चांगले सांभाळतात.
• 70 टक्के अधिकाऱ्यांनी महिला पोलीस क्रायसिसच्या वेळी गडबडतात अशी भावना व्यक्त केली.
Updated : 7 March 2019 9:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire