Home > Max Woman Blog > भाषेवर काम करण्यासाठी प्रयोगशीलता व जिवंतपणा हवा..

भाषेवर काम करण्यासाठी प्रयोगशीलता व जिवंतपणा हवा..

भाषेवर काम करण्यासाठी प्रयोगशीलता व जिवंतपणा हवा..
X

आपण कुसुमाग्रजांचा जो जन्मदिवस तो महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून ठरवला, त्याला आता काही वर्ष गेली आणि आता सगळ्याच शासकीय संस्थापनामध्ये, शाळा, महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या साहित्यिक संस्था, ज्या असतील त्यात तो साजरा होतो. आता मी जे बोलतेय ते मी माझ्या वैयक्तिक अनुभव त्या आधारे अर्थातच बोलतेय.

मी गेली ३० वर्ष ठाण्यामध्ये सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये वरिष्ठ विभागात मराठी भाषा आणि साहित्य शिकवते. आता हा जो जीआर आहे, तो अलिकडचा आहे; काही वर्षापूर्वीचा आहे. मला असं वाटत की आपली त्या दिशेने चर्चा सुरू आहे म्हणून तो संदर्भ घेऊन मी बोलतेय. पण त्याच्याही आधीं आणि त्याच्याही नंतर मी माझ्या विभागामध्ये खूप सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत आणि मुळामध्ये आमचं जे महाविद्यालय आहे, ते काही रुईया, रुपारेल कॉलेज, किंवा ठाण्यामधलं जोशी बेडेकर कॉलेज नाही की ज्या महाविद्यालयामध्ये मुळातच ७०%-८०% च्या आसपासच्या विद्यार्थांनाच प्रवेश दिला जातो.

मी ज्या महाविद्यालयामध्ये गेली अनेक वर्ष प्राध्यापिका आहे, त्या महाविद्यालयाची संकल्पना किंवा निर्मिती खूप वेगळ्या विचारांनी झालेली आहे. ती ही की जो संपूर्ण वर्ग आहे विद्यार्थ्यांचा, ज्यांना ३५% आहेत, ४०% आहेत, पण ज्यांना कुठलंही महाविद्यालय प्रवेश देत नाहीत, अश्या विद्यार्थ्यासाठीच हे महाविद्यालय उभं करण्यात आलं; म्हणजे हे महाविद्यालय उभं राहण्यामागे ही संकल्पना आहे. आता माझ्याकडे जे विद्यार्थी येतात, ते मुळातच ते अशा अभिजनी किंवा पुस्तकी किंवा अश्या कुठल्याही वर्गातून आलेला नसतो. त्यामुळे ते त्यांचीच भाषा घेऊन येतात, जी रस्त्यावरची आहे, जी घराघरात बोलली जाते, आणि त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या अतिशय जीवंत अश्या स्त्रोत, ज्याला आपण काय म्हणूयात…एक अतिशय जिवंतपणा, उस्फूर्तता असते, त्यात कुठल्याही पद्धतीच्या पुस्तकी वातावरणातून ती मुले मोकळी असतात, त्यामुळे त्यांना घेऊन हे सगळं काम करणं, आणि त्या भाषेच्या पातळीवर वेगवेगळे उपक्रम करणं, वेगवेगळे खेळ खेळणं किंवा अभिनव अशा संकल्पना राबवणं, ते आम्ही सातत्याने मी आणि माझा विभाग आणि माझे सहकारी करत आलेलो आहोत; म्हणजे आता एक साधी गोष्ट आहे की, आम्ही त्यांना जेव्हा सांगतो की, तुम्ही एक साधं वार्षिक अंक काढा आणि त्याच प्रकाशन मग आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये करतो, पण ते २७ लाच आम्ही करतो असं नाही. फेब्रुवारी महिना आम्ही धरलाय कारण ते काम करायला तेवढा वेळ लागतो. बारावीची परीक्षा असते, वगैरे म्हणून आम्ही फक्त फेब्रुवारी महिना पकडला आहे, काही त्या शासकीय जीआरला जखडून आहोत अश्यातला काही भाग नाही, तेवढी एक मोकळीक आम्ही घेतलेली आहे आणि हे विद्यार्थी की ज्यांना काहीही माहिती नाहीये, त्यांना टाइप करणं माहीत नाही, त्यांना लेआऊट माहीत नाही, त्यांना अंक प्रसिद्ध करणं म्हणजे काय करणं, हे माहीत नाही, असे विद्यार्थी चक्क गेले ६-७ वर्ष सातत्याने “मुद्रा” या वार्षिक अंकाच प्रकाशन करताहेत…

आता हे विद्यार्थी तुम्ही बघाल तर कुठून आलेले आहेत, तर ते अक्षरशः ऐकून, म्हणजे आपण… किंवा मी स्वतः ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करते, मी माझ्या लेखनातून त्याविषयी बोलत असते, कवितेतून ते मांडत असते, तो सगळा आशय म्हणा आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे भावविश्व आहे, त्याच्यामध्ये अतिशय जवळकीच नातं आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जीआर काही पण निघो, त्याला एक शासकीय रूप येवो…

बाकीच्या ठिकाणी लोकं कसं करतात, मला कल्पना नाही.. पण मला असं वाटतं की जिथे माणसं प्रयोगशील असतील ना आणि त्यांच्यामध्ये जर तो जिवंतपणा असेल ना, सातत्य असेल, वेगळ्या पद्धतीने काम करण्याची जर इच्छा असेल तर तिथे खूप चांगल्या प्रकारे आपण या भाषेचा विचार करू शकतो आणि प्रत्यक्ष अंमलात येतानासुद्धा खूप वेगळ्या प्रकारे काम होऊ शकतं.

या मुलांनी, साधे साधे विषय आहेत, की जसं प्रेम, आठवणी, चित्रपट… या वर्षी आमचा विषय होता.. चित्रपट.. या विषयावर मुलांनीच लिहिलेलं आहे, ते त्यांच्या अनुभवातून लिहिलं आहे, त्याच्यात भाषेची जो त्यांचा त्यांचा म्हणून एक साधेपणा आहे, त्यांचा त्यांचा म्हणून जो काही जिवंतपणा आहे तो त्यांनी जपलेला आहे. तिथे मी कुठल्याही पद्धतीचे संस्कार करत बसलेले नाही.

मला हे फार महत्त्वाचं वाटतं. त्याचं संपूर्ण परीक्षण पण वेगवेगळ्या लोकांकडून होतं आणि मग किरण येले, महेश केळुस्कर, सौमित्रसारखे लेखक असतील अशी वेगवेगळी माणसं जी आपल्या मराठी सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात काम करतात, त्यांना बोलवून त्यांना तो अंक दाखवून त्यांना त्याच्यावर बोलायला आम्ही लावतो.. यंदा विजय चोरमारे आले होते, पत्रकार, कवी आणि अनुवादक…त्यामुळे मला काय वाटतं, शेवटी व्यक्ती कशा प्रकारे ते बघतात, त्याला सामोरं जातात, हा महत्त्वाचा विषय आहे… हा झाला पहिला भाग…

दुसरा भाग असा आहे की, आपली जी लोकभाषा आहे , म्हणजे ज्ञानभाषेकडे जावी याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना जेव्हा झाली तेव्हाच हे धोरण यशवंतराव चव्हाण यांनी त्या काळामध्ये घेतलं होतं की लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, पण त्या पातळीवर आपण खरोखर प्रयत्न करतो का? तर याबाबतीत मला थोडी उदासीनता वाटते. ते होत नाहिये..

राजकारण्यांकडून तर आहेच, पण माझं एक साधं म्हणणं आहे की नुसतं खळळ खट्ट्याक करून आणि दुकानावरच्या पाटया मराठीमध्ये लिहून काही बदल होणार नाहीत.. तेवढी राजकीय इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींमध्ये असेल तरच काही बदल व्हायचं असेल तर तो होईल.

आणि मराठी शाळांची ज्या प्रकारची अवस्था आहे, शाळा बंद होत चाललेल्या आहेत, तर त्या सगळ्याला एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय इच्छाशक्तीचा संदर्भ हवा आणि हे माझ्या दृष्टीनं आस्थेचं आणि महत्वाचं म्हणजे खरंतर प्रत्येक मराठी भाषिकांचे आस्थेचे मुद्दे आहेत, एकूण काय होणार आहे या मराठी शाळांचं…??

आणि दुसरं म्हणजे ज्ञानभाषेकडे जाताना खूप वेगवेगळ्या पातळीवर बदल व्हायला हवा, तिला मुद्दाम प्रमाणभाषा प्रमाणभाषा असं म्हणत असताना ! मी आता बालभारतीसारख्या ठिकाणी काम केलं, पुस्तकं तयार केलीत. १ली ते चौथी ची. तेव्हा सुद्धा आमचा आधीच्या ध्येयधोरणे ठरवणाऱ्या लोकांशी प्रचंड संघर्ष झालेला आहे..

अ अननसाचाच का?? भ भटजीचाच का?? म्हणजे जे शब्द आदिवासी पाड्यावराच्या, या सगळ्या मुलांच्या भावविश्वात त्यांच्या जगण्यातच नाहीयेत, तर त्यांना ती अक्षरओळख करताना त्यांच्यासाठी ती प्रमाण भाषा नाहीच..त्यांचं आपण काय करणार आहोत?

या प्रमाण भाषेचा जो काही बोलबाला, आता पुढे जसजसं ते सरकतात, मग त्यात दलित साहित्य, ग्रामीण साहित्य वेगवेगळे आहेत त्याच्या मधून ते येतं…पण हा जो सुरुवातीचा टप्पा आहे नं प्राथमिक शाळांच्या पातळीवरचा, तिथे मला असं वाटतं की प्रमाणभाषेच्या संदर्भातही वेगवेगळे विचार व्हायला पाहिजे, आणि त्याला वेगवेंगळे पर्याय असायला पाहिजे. तसं आम्ही केलं.

की जसं चक्क आदिवासी भाषेतली ती कविता त्याच भाषेत दिली आणि मग आम्ही ती प्रमाण मराठी भाषेतपण दिली. अशा प्रकारे हे बदल होत गेले. लोकभाषा, मौखिकता, लोकसाहित्य, शब्दांचे अर्थ अश्या प्रकारे जर थोडासा बदल होत गेला तर लोकभाषा, मौखिकता, लोकसाहित्य आणि ज्ञानभाषा यांचे जे समीकरण आहे, ते धावतं राहिल आणि समकालीनतेकडे जाणारं राहिल, असं मला वाटतं..

-डाॅ. प्रज्ञा दया पवार

Updated : 27 Feb 2020 10:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top