तिळगूळ ते कॅडबरी : एक अरण्यरुदन...
X
या फोटोतील मुले बघितली का ?
ही नष्ट होणाऱ्या दुर्मिळ प्रजातीतील शेवटची मुले असतील कदाचित. आज संक्रांतीला ही मुले अनोळखी घरात जाऊन तिळगुळ मागत फिरत आहेत. दुर्मिळ दृश्य असल्यानेच आम्ही मित्रांनी आवर्जून त्यांचा फोटो काढला ...तुम्ही आम्ही लहान असताना अशा झुंडी गल्लोगल्ली दिसायच्या पण आता तशी स्थिती राहिली नाही. बिल्डींगमधली मुले साधी बिल्डींगमध्येही तिळगुळ मागायला जात नाहीत. संपूर्ण गल्लीत गावात फिरणे तर दूरच ...
आपण लहान असताना रिकामे डबे घेवून निघायचो आणि अनोळखी घरात ही ओळख नसताना बिनधास्त जायचो कारण ध्येय एकच असायचे की घरी येताना तो डबा पूर्ण भरला पाहिजे.मेरे डबेसे तेरा डबा खाली कितना ? ही स्पर्धा असायची ... आज ही मुले कुठेच दिसेना . तिळगूळ आणि दसऱ्याला सोने गोळा करणारी ती मुले आता गेली कुठे ?
सणातून होणारे हे सहज होणारे सामाजिकीकरण लुप्त होते आहे. मुलांना असे घरोघर फिरताना आता लाज वाटू लागली आहे कारण त्यांचे पालक ही जवळच्या घरात तिळगुळ मागायला जात नाहीत..मी स्वत : नास्तिक असूनही मला या गोष्टी सुंदर वाटतात. लहानपणी आपण ज्यात आनंद घेतला तो या मुलांना का घ्यावा वाटत नाही ? टीव्ही ,मोबाईल ,गेम यापलीकडे या मुलांना या गोष्टी निरर्थक का वाटत असतील ?
एक विलक्षण कोरडेपणा आणि व्यवहारीपणा या पिढीत येतोय तो मला जास्त अस्वस्थ करतो .लहानपणी आम्ही एस टी stand वर जाऊन लोकांनी टाकून दिलेली तिकिटे गोळा करायचो , ती तिकिटे आम्हाला रुपयांच्या नोटांपेक्षा जास्त किमती वाटायची .घरात चिंचा फोडल्या की चिंचोके जपून ते खेळायचे . प्रत्यक्ष हिरे मोती दिले असते तरी काचेच्या जमवलेल्या गोट्या आम्ही दिल्या नसत्या ...पुस्तकातले मोरपीस रोज वाढते का ? म्हणून बघणारे माझे ते निरागस मन या मुलांमध्ये कुठे शोधू आता ?
काहीजण म्हणतील की काळ बदलतो आणि त्या काळाची माध्यमे बदलतात . पण मुलांना असे भाबडे बनवणारी ,सामाजिक करणारी कोणतीच नवी माध्यमे निर्माण होत नाहीत आणि जुनी मात्र फेकली जाताहेत
ही मुले हुशार आहेत पण त्यांना या माझ्या तुमच्या बालपणीच्या त्या सर्व गोष्टी आज निरर्थक वाटताहेत ....तिळगुळ खाणारी माझी पिढी आणि कॅटबरी खाणारी ही माझ्या मुलाची पिढी ...हे अंतर सांधायला कोणती बुलेट ट्रेन आणायची सांगा ??
-हेरंब कुलकर्णी