बबनराव लोणीकरांच्या विरोधात “महिला” एकवटल्या...
Max Woman | 2 Feb 2020 5:54 PM IST
X
X
भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवटा मंत्री बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. स्थानिक तहसिलदार असलेल्या महिलेबाबत आक्षेपार्ह उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात असे वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. . या आधीही लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सगळीकडे व्हायरल होत असून, विरोधकांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
काय म्हाणाले बबनराव लोणीकर ?
https://youtu.be/_DCY5-C1FOw
‘शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, त्या निवेदन घ्यायला येतील,” असं लोणीकर भाषणात म्हणाले.
विरोधकांची टीका :
"वक्तव्य निषेधार्हचं, भाजप,कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना अगदी कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाषण करण्याच्या ओघात किंवा बोलण्याच्या भरात सुद्धा शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे. समर्थन नाहीचं" असं भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी ट्विटवर प्रतिक्रीया दिली आहे.
“बबनराव लोणीकर जिजाऊ, सावित्रीच्या लेकी या हिरोईन आहेतच त्याची काळजी करू नका पण तुमच्यासारखी गिधाडं आजुबाजूला असतील तर त्यांचा सूपडा साफ करायला मला वेळ लागनार नाही सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेली नाही, त्यामूळे बोलतांना भान ठेवा” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
“लोणीकरांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केलाय. यातून भाजपच्या नेत्यांची मानसिकता दिसून येते” अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलीय.
‘तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आहे ना ? २५ हजारांचा मोर्चा काढू, ५० हजारांचा मोर्चा काढू आणि मोर्चाला गर्दी करण्यासाठी एखाद्या हिरोईनला आणू आणि ती नाहीच आली तर आपली तहसीलदार मॅडम आहेच. व्वा ! बबनराव लोणीकर साहेब तुमच्या एक वाक्याने तुम्ही महिला अभिकार्याला कोणत्या नजरेतून बघता,’ असे म्हणत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी टीका केली आहे.
Updated : 2 Feb 2020 5:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire