महिला टीम सदस्याच्या हस्ते ‘लोकशाही’ चॅनेलचं लाँचिंग...
X
‘लोकशाही’ न्यूज़ चॅनेल आज पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या न्यूज चॅनेलचे वेगळेपण म्हणजे सर्व नवे चेहरे घेऊन त्यांचा इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. त्याचबरोबर न्यूजचं लाँचिग देखील अनोखे ठरलं आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महिला टीमच्या हस्ते ‘लोकशाही’ न्यूज़ चॅनेलचं लाँचिग करण्यात आलं. या सर्व प्रवासाचा उलघडा लोकशाही न्यूजचे सीनियर एडिटर राहुल पहूरकर यांनी या लेखात केलं आहे.
4 महिन्यापूर्वी एका मराठी चॅनेलला जन्म द्यायचं, असं विजय शेखरसरांनी ठरवलं. त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजेश सुंदरमसर यांनी खूप मोलाची भूमिका बजावली. आमची मोजक्या लोकांची टीम कामाला लागली. सुरुवातीला चॅनेलचं एक नाव निश्चित केलं. त्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मग दुसरं नाव समोर आलं, ते सर्वात जास्त समर्पक ठरलं, ‘लोकशाही’ आजच्या काळात सर्वात आवश्यक, महत्त्वाचा शब्द. मग पुढचा टप्पा म्हणजे टीम घ्यायचं ठरलं. नवं चॅनेल लाँच करायचं म्हणजे अनुभवी टीम घ्यावी लागते, अशी परंपरा आपल्याकडे आहे. मात्र या परंपरेला छेद देण्याचं आम्ही ठरवलं. प्रसंगी त्याची किंमत चुकवण्याची तयारीही मनाशी ठेवली. त्यामुळे फ्रेश, नव्या दमाची यंग टीम बांधण्याचं काम सुरू झालं.
सर्वसाधारणपणे मुलाखतीमध्ये जास्त अनुभव असणाऱ्यांना पहिली संधी मिळते. आमच्याकडे अनुभव नाही, मी फ्रेशर आहे, असं म्हणणाऱ्या तरुणांना आम्ही पहिली संधी दिली. अनेकांना याचा सुखद धक्काही बसला असेल. समाजाच्या सर्व थरांतील मुलाना पत्रकारिता करण्याची संधी द्यायचं ठरलं. त्यामुळे आमच्याकडे असे अनेक तरुण, तरुणी पत्रकार झालेत, ज्यांच्या आईवडिलांचं हातावर पोट आहे. समाजाचं वास्तव दाखवण्यासाठी विविध दुर्लाक्षित तरुणांना या प्रक्रियेत सहभागी करणं गरजेचं असतं. ते आम्ही इथं करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. सोबत मोजक्या अनुभवी लोकांना सोबत घेतलं, म्हणजे आम्ही तरुणाईला अनुभवाचीही जोड दिली.
आता पुढचा टप्पा होता, तो लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि या टीमचा मेळ बसवण्याचा. या चॅनेलमध्ये जगातील सर्वोत्तम आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ग्रास व्हॅलीचे कोअर सर्व्हर, व्हिजार्टीची ऑनलाईन ग्राफिक्स प्रणाली, स्टुडिओतील इकेगामी कॅमेरे आम्ही इथं आणलेत. महत्त्वाचं म्हणजे विजय शेखर, राजेश सुंदरमसर आणि राजेश त्यागराज यांनी सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी बाहेरील एक्स्पर्टची मदत न घेता या नव्या टीमला ट्रेन केलं. इथं एक मुद्दा आवर्जून नमूद करावासा वाटतो तो म्हणजे देशातील हे पहिले चॅनेल असेल ज्यामधे पत्रकारांनी या चॅनेलच्या तंत्रज्ञानाचा प्रत्येक पाया रचला आहे. या सर्व प्रवासात खूप काही शिकता आले आणि मदर टीम म्हणून हा वेगळा अनुभव इतर पत्रकारांनासुद्धा मिळालाय. कदाचित देशातील हा पहिला प्रयोग असावा.
आमच्या न्यूजरूम आणि स्टुडिओचं वेगळेपण प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येणार आहे. चॅनेलच्या उभारणीत महिला शक्तीच्या उर्जेचा आम्ही जास्तीत जास्त वापर केलाय. अगदी प्रोग्रॅमिंगपासून कार्यक्रमांची थीम ठरवण्यासाठी या यंग बटालियननं आम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या. आजच्या तरुणाईचं निरीक्षण खूप सूक्ष्म आहे. त्यांच्याकडून भन्नाट आणि क्रियेटिव्ह आणि लाख मोलाच्या आयडिया आम्हाला मिळाल्या. त्या आधारे या चॅनेलची उभारणी करण्यात आली.
लोकशाही न्यूजचं लाँचिगदेखील प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महिला टीमच्या हस्ते करण्यात आलंय. लोकशाही न्यूजचा प्रयोग हा नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटासारखा आहे. सर्व नवे चेहरे... आमचा इथपर्यतचा प्रवास पार पडला, मात्र लोकशाहीमध्ये शेवटी जनताच अंतिम फैसला देते. त्यामुळे या चॅनेलचं भवितव्य मायबाप प्रेक्षकच ठरवेल. आता चांगले विचार, निष्पक्ष रिपोर्टिंग, फेअर (फेवर नाही) कव्हरेज देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत.
लोकशाही न्यूजचा एक नवीन विचार घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर आलो आहोत. येणाऱ्या काळात या कसोटीचं आव्हान स्वीकारायला आमची तरुण टीम तयार झाली आहे. व्यवस्थेच्या हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हा सर्व प्रेक्षकांची साथ खूप मोलाची ठरणार आहे, कारण तरच आणि तरच हा लढा लढता येईल. मी नाही, आम्ही... तुर्तास एवढंच!
-राहुल पहुरकर
सीनियर एडिटर
लोकशाही न्यूज