महिलांना बाळंतपणासाठी माहेरी जाणं अशक्य, किरीट सोमय्यांनी केली 'ही' मागणी
X
लॉकडाऊनमुळे राज्यातील गरोदर स्त्रिया वेगळ्याच अडचणीत सापडल्या आहेत. बाळंतपणासाठी माहेरी जाण्याची पद्धत असल्यामुळे तिथल्या प्रसुतीगृहात अनेक गरोदर महिलांची नोंदणी केलेली असते. पण या काळात त्यांना बाळंतपणासाठी माहेरी जाण्याची परवानगी मिळत नसल्याने गरोदर पण करायचं कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
“बाळंतपणासाठी नावनोंदणी केलेलं गायनोकोलॉजिस्ट सेंटर वेगळ्या क्षेत्रात किंवा माहेरी आहेत. संचारबंदीमुळे तिथे जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. काही प्रकरणात बाळंतपणासाठी आई गावावरुन येणार होती. पण, तिलाही येण्यासाठी परवानगी मिळत नाही.” अशी अडचण निर्माण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी या विषयावर महाराष्ट्र सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या अडचणीच्या वेळी लवकर परवानगी मिळावी. किंवा स्थानिक गायनोकोलॉजिस्ट कडे या गरोदर मातांचं रजिस्ट्रेशन करुन देण्याचा आग्रह त्यांनी अधिकाऱ्यांना केलाय.