भगवंताची बासरी लता मंगेशकर...
X
'लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं'... लताबद्दल लिहिताना गुलजारच्या या ओळींचा आधार घ्यावासा वाटतो! लता नुसते गात नाही, तर ती स्वतःच गाणे बनते. लताचे वैशिष्ट्य म्हणजे, तिचा सोनेरी स्वर आणि भावपूर्ण उच्चार. गाण्यात ती आपला आत्मा मिळवून गाते. प्रत्येक सुराचे आकलन करणारी तीव्र संवेदनशीलता, संगीतातील नाट्याची अचूक समज, स्वरांचे आघात, स्वर कोठे लावावा व कोठे कमी करावा याचे तारतम्य, मधुर हेलकावे.. हे सारे लताला जन्मजात मिळाले आहे.
एकदा सलिलदांनी सांगितले होते की, 'दो बिघा जमीन' चित्रपटाच्या प्रारंभी जी टायटल्स येतात, त्यावेळी सलिलदांनी जे पार्श्वसंगीत दिले आहे, ते केवळ एकदा ऐकून लताने जसेच्या तसे बिनचूक म्हणून दाखवले होते! शैलेंद्रनेच लताची आणि सलिलदांची ओळख करून दिली. लताची निरीक्षण आणि ग्रहणशक्तीमुळे तलतही प्रभावित झाला होता. अशा गोड गळ्याच्या गायिका बऱ्याच आहेत. पण भावपूर्ण पद्धतीने रसपरिपोष करण्याचे खास तंत्र लताकडे आहे.
लताचे उर्दू शब्दांचे उच्चार ऐकून उर्दूतले विद्वानही चकित होत. तलतने एक किस्सा सांगितला होता. 'मेहरबानी' चित्रपटाच्या वेळी त्याच्या सोलो गीताचे रेकॉर्डिंग होते. अनेकदा रिहर्सल करूनही गाणे मनासारखे होत नव्हते. तेवढ्यात लता आली. तिला पाहताच संगीतकार हाफिज खान म्हणाले की, तलत, तुमचं गीत बाजूला ठेवा. आता अगोदर तुमचं नि लताचं युगलगीत आटोपू. तेव्हा लताने त्यास नकार दिला. आधी तलतचे सोलोगीत होईल, मगच मी युगलगीत गाईन, असे तिने बजावले. खरे तर हा तिच्या मनाचा मोठेपणा! बदकाच्या पिलांनी पाण्यात जितके सहजपणे पोहावे, तितक्याच सहजपणे लताचा सूर गाण्यात विहरतो.
नौशादकडून ऐकलेला एक किस्सा. 'चांदनी रात' या चित्रपटासाठी एक गीत घ्यायचे होते. लता भर पावसात आली होती. तिच्या हातात फाटकी छत्री होती. परळ टी टीवरून ती कारदार स्टुडिओत चालत आली होती. आज मी नेहमी बघतो की, तेथे एकेकाळी कारदार स्टुडिओ होता, हेच कोणाला माहिती नाही! सध्या तेथे सगळीकडे गॅरेजेस आहेत. नौशादच्या छायेखालील ते पहिले रेकॉर्डिंग झाले, तेव्हा लताचा आवाज त्यांना पातळ वाटला आणि जिच्यासाठी ती गात होती, ती नटी तर प्रौढ नि ढोली होती. लताने पुन्हा मेहनत घेतली. पुन्हा रेकॉर्डिंग झाले, तेव्हा मात्र लताच्या स्वरातला भरगच्चपणा आणि गोलाई पाहून सगळेजण थक्क झाले. निर्माते ए हसन यांनी लताला खुश होऊन त्यावेळी 60 रुपयांचे बक्षिस दिले होते. लता उर्दू शब्दोच्चारांवर खूप मेहनत घेत होती. कारदार यांच्यासारखा निर्माता देखील लताने गायलेले 'कौन सुने फरियाद हमारी' हे गाणे ऐकून प्रभावित झाला होता. त्यानंतर नौशादने संगीत दिलेल्या 'अंदाज'चे रेकॉर्डिंग मेहबूबमध्ये झाले. 'कौन सुने फरयाद हमारी' हे गाणे स्टुडिओत बसून राज कपूर मन लावून ऐकत होता... त्याच वर्षी राजच्या 'बरसात' मध्ये लताने अक्षरशः विक्रमी सूर बरसात केली.. 'अमर भूपाळी' ची 'नको दूर देशी जाऊ सजणा' हे शोकगीत असो किंवा 'नको बोलू रे' ही जोरकस शृंगारिक ढंगाची लावणी असो, लता ती लीलया गाते.
अपोलो बंदरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ होता. वसंत देसाईंनी 1000 मुलांना घेऊन शिवमंगलस्तोत्र बसवले होते. यशवंतराव, अत्रे, बाळासाहेब देसाई तेथे उपस्थित होते. लता दूर बसली होती. लता ही शिवप्रेमी आहे. ते वातावरण बघून भारावलेली लता तडक वसंतरावांकडे येऊन म्हणाली की, मला आज गाणे म्हणायचे आहे. तेव्हा तिथल्या तिथेच एक गाणे लताने बसवून, साथीदारांना तयार करून, ते सादरही केले! टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.. माणसात जशी माणुसकी, तसे गाण्यात गाणेपण हवे आणि लताच्या कोणत्याही गाण्यात शंभर टक्के हे गाणेपण सापडते.
कुमार गंधर्व म्हणाले होते की, नादमय उच्चार हे लताचे वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी लोकप्रियतेची कमाल केली, पण महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत बालगंधर्वांची तेवढी जादू जाणवली नाही. उलट लताची कीर्ती सातासमुद्रापार गेली. असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो. हे कुमार गंधर्वांचे बोल आहेत. लता ही भगवंताची बासरी आहे. 91 वर्षांच्या लता मंगेशकर यांना माझ्यासारखे असंख्य लोक आपुलकीच्या भावनेतून 'लता' असे एकेरीतच संबोधतात.
कारण ती कोणी परकी नाहीच. चिल्लर नट्या किंवा दोनचार हिट गीते गायली की, स्वतःला हाय-फाय सेलिब्रिटी समजणाऱ्या गायिका चटकन मावळतात. लता मात्र 'कहीं दीप जले कहीं दिल' याप्रमाणे तेवतच होती व तेवतच राहणार आहे. ती असताना आपण या जगात आहोत, या पलीकडे दुसरे आनंदनिधान ते कोणते! हा आनंदघन आपल्या मनाला सदैव न्हाऊ घालतच आहे... सामान्यतः स्त्रियांचा आवाज काळी चार पांढरी पाचपर्यंत मर्यादित असतो. कोणीच फार उंच स्वरात गाऊ शकत नाही. लता मात्र तशी गाऊ शकते. आज लताचा वाढदिवस. तिला कोटी कोटी शुभेच्छा! 'हाय रे वो दिन क्यूं ना आये, जा जा के ऋतू लौट आये' अशीच भावना आपल्या सर्वांची आहे!
हेमंत देसाई