"मातीतल्या खेळांची जत्रा"
व्हिडीओ गेम्स मुळे आजची पिढी मैदानी तसेच मातीतले खेळ खेळणंच विसरून गेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक पालक याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. याच पिढीला खऱ्या खेळांची आठवण करून देण्यासाठी भरवली जातेय “मातीतल्या खेळांची जत्रा”
X
कॅंडी क्रश, पबजी, GTA 5 या आणि अशा खेळांमध्ये सध्याची पिढी व्यस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. यासगळ्या व्हिडीओ गेम्स मुळे आजची पिढी मैदानी तसेच मातीतले खेळ खेळणंच विसरून गेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक पालक याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. शहरातील तर जरा जास्तच. याची तशी काही कारणं देखील आहेत म्हणा. मैदानी खेळ खेळण्यासाठी शहरांमध्ये तशी फारशी मैदानेच उपलब्ध राहिलेली नाहीत. पण भोवरा गोट्या हे खेळ खेळण्यासाठी तशी काही फारशी मोठी जागा लागत नाही. आणि तरीही बहुतांशी शहराकडची आजची नवी पिढी आपल्याला हे खेळ खेळताना दिसत नाही. त्यांना जणू व्हिडीओ गेम्समधील किल्स आणी कार रेसिंग खेळण्यातच जास्त आनंद मिळत असतो. स्मार्टफोन्सचा यात फार मोठा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. पण याच पिढीला खऱ्या खेळांची आठवण करून देण्यासाठी कुणीतरी काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
असं सगळं सुरू असतानाच गेल्या काही वर्षांपासून बारामतीमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचं नाव आहे. मातीतल्या खेळांची जत्रा! एकूण एक मातीतल्या खेळांचं आयोजन या जत्रेमध्ये केलं जातं. विटीदांडू, गोट्या, लगोरी, भोवरा, पोत्यातील शर्यत, टायर पळवणं, जिबल्या, फुगड्या, तळ्यात मळ्यात आणि गजग्यांचा खेळ या अशा खेळांचं आयोजन या जत्रेमध्ये करण्यात येतं. या खेळ खेळणं सोडा , त्यांची नावं देखील फारशा मुलांना ठाउक नाहीत. पण बारामतीतल्या का होईना पण नव्या पिढीपर्यंत हे खेळ आज पोहचत आहे. या जत्रेमध्ये अबालवृध्दांचा समावेश असतो. विशेष म्हणजे या जत्रेमध्ये लहान मुलांपेक्षा प्रौढांचीच जास्त हजेरी असते. सारे जण जणू एका दिवसात आपलं लहानपण पुन्हा जगण्यासाठीच ते येत असतात आणि मनसोक्तपणे ते जगतातसुध्दा!
कधी पासून झाली सुरूवात?
राज्याची राजकीय पंढरी समजली जाणाऱ्या बारामतीमध्ये मातीतल्या खेळांची जत्रा या संकल्पना अस्तित्वात आली. २०१७ मध्ये पहिल्यांदा बारामतीमध्ये ही ऐतिहासिक(सध्याच्या काळात हाच शब्द योग्य वाटतो म्हणून) मातीतल्या खेळांची जत्रा भरवली गेली. जुन महिन्याच्या पहिल्या रविवारी उकळत्या सुर्याची दाहकता जरा कमी झाली की या जत्रेचं आयोजन केलं जातं. २०१७ ला ४ जुन ला पहिल्यांदा या जत्रेचं आयोजन केलं गेलं होतं आणि याच निमंत्रण विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलं होतं. आता असा ऐतिहासिक सोहळा बारामतीत होत असेल आणि त्यात जर पवार कुटूंबाचा सहभाग नसेल असं कसं होईल. स्वतः पुढाकार घेऊन सुनेत्रा पवार या जत्रेत सहभागी तर होतातच शिवाय विविध खेळांचा आनंद देखील लुटतात.
पवार कुटूंबाचा सहभाग
२०१७ पासून सलग दरवर्षी ही मातीतल्या खेळांची जत्रा भरवली जाते. दरवर्षी न चुकता या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आयोजनात स्वतः पवार कुटुंबाचा देखील सहभाग असतोच. विद्या प्रतिष्ठान तसेच Environmental forum of India या NGO च्या संयुक्त विद्यमाने या जत्रेचं आयोजन केलं जातं. स्वतः अजित पवार देखील या जत्रेत सहभागी होऊन विविध मैदानी खेळांचा आनंद लुटत असतात. मध्यंतरी याच जत्रेमधील त्यांचा विटी दांडू खेळतानाचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला होता.
कोव्हीड १९ मुळे पडलेला खंड
या जत्रेच्या आजोनात २०२१ मध्ये मात्र कोव्हीड १९ या महामारीच्या येण्याने खंड पडला. पण यावर्षी कोव्हीड १९ चे रूग्ण कमी झाले आहेत. त्यावर निघालेल्या लशी या देखील प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही जत्रा भरताना आपल्याला पाहायला मिळू शकते.
आपल्या कडे ज्या प्रमाणे दहावी बारावीच्या शिक्षण बोर्डांचे विविध पॅटर्न असतात त्याचप्रमाणे आता मातीतल्या खेळांच्या जत्रेचा हा बारामती पॅटर्न राज्यभर राबवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून सर्व अबाल वृद्ध मंडळी मनसोक्तपणे एक दिवस का होईना पण स्वतःचं बालपण पुन्हा अनुभवू शकतील.