महागाईने महिलांचं आर्थिक गणित बिघडलं…. पण किती आणि कसं?
अनेक पक्षांनी आजवर महागाई कमी करण्याची आश्वासन दिली आणि निवडणुका जिंकल्या, सरकारं स्थापन केली. पण महागाई काही ते कमी करू शकले नाही. महागाई म्हणजे काय? ती कशी वाढत जाते? महागाईचा संबंध आणखी किती बाबींसोबत आहे? महागाई प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कुटूंबांवर शिवाय महिलांवर कसे बरे वाईट परिणाम करते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
X
सध्या देशभरामध्ये भोंगे आणि धर्मवाद सोडला तर सर्वाधिक मुद्दा कोणता चर्चिला जात असेल, ज्याची सर्वाधिक झळ सर्वसमान्य जनतेला बसत आहे तर तो मुद्दा म्हणजे महागाई! गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकाच्या तोंडी महागाई हा शब्द आहेच. जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकाला महागाईचा आक्रोश ऐकायला मिळतोय. मध्यमवर्गीय समाजाला तर सध्याची महागाई म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच आहे. आज पर्यंत किती सरकारं आली आणि गेली परंतू महागाई काही कमी झाली नाही. अनेक पक्षांनी आजवर महागाई कमी करण्याची आश्वासन दिली आणि निवडणुका जिंकल्या, सरकारं स्थापन केली. पण महागाई काही ते कमी करू शकले नाही. महागाई म्हणजे काय? ती कशी वाढत जाते? महागाईचा संबंध आणखी किती बाबींसोबत आहे? महागाई प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कुटूंबांवर शिवाय महिलांवर कसे बरे वाईट परिणाम करते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
महागाई म्हणजे नेमकं काय?
महागाईचे परिणाम जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला महागाईची संकल्पना जाणून घ्यावी लागेल. महागाईलाच आपण चलनवाढ असंही म्हणतो. चलनवाढ म्हणजे कालांतराने वापरात असलेल्या चलनाची खरेदी क्षमता कमी होणे. खरेदी क्षमतेची घट याचा अर्थ चलनाचे एकक प्रभावीपणे पूर्वीच्या कालावधीपेक्षा कमी खरेदी करते. ही खरेदी क्षमतेची घट ज्या दराने होते त्याचा एक परिमाणवाचक अंदाज काही कालावधीत अर्थव्यवस्थेत निवडलेल्या वस्तू आणि सेवांच्या टोपलीतील सरासरी किंमत पातळीच्या वाढीमध्ये परावर्तित होऊ शकतो. किमतींच्या सामान्य पातळीतील ही वाढ, अनेकदा टक्केवारी म्हणून व्यक्त केली जाते. त्यामुळे चलनवाढ ही संज्ञा महागाई दराला पर्याय म्हणून देखील वापरात येते. चलनवाढ (Inflation) ही चलनक्षयाच्या (Deflation) विरोधाभासी असू शकते. पैशाची खरेदी क्षमता वाढते आणि किंमती घसरतात तेव्हा निर्माण होणारी परिस्थिती ही चलनक्षय (Deflation) असते.
महागाई / चलनवाढीची संकल्पना काय?
महागाईचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. मागणी-प्रेरित महागाई (Demand-Pull Inflation), खर्चजन्य महागाई (Cost-Pudsh Inflation) आणि अंतर्निमित महागाई (Built- In Inflation)
चलनवाढीचे स्वरूप दर्शविण्यासाठी, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि घाऊक किंमत निर्देशांक (WPI) हे सर्वाधिक वापरले जाणारे महागाई निर्देशांक आहेत.
वैयक्तिक दृष्टिकोन आणि बदलाच्या दरावर अवलंबून महागाईला सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते.
महागाईच्या झळा सर्वांना बसत असल्या, तरी काहींसाठी तो उबदार दिलासाही ठरतो. म्हणजे ज्यांच्याकडे मूर्त मालमत्ता आहे, जसे की मालमत्ता किंवा साठा केलेल्या वस्तू, त्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढवल्यामुळे काहींना महागाई वाढत जाणे आवडण्याची शक्यता असते.
तथापि, वैयक्तिक उत्पादनांच्या किंमतीतील कालानुरूप बदल मोजणे सोपे असले तरी, मानवी गरजा अशा एक किंवा दोन उत्पादनांपुरत्या सीमित नसतात, त्या पलीकडे त्या निरंतर वाढत असतात. आरामदायी जीवन जगण्यासाठी व्यक्तींना उत्पादनांचा मोठा आणि वैविध्यपूर्ण संच तसेच अनेक सेवांची आवश्यकता असते. त्यामध्ये अन्नधान्य, धातू, इंधन, वीज आणि वाहतूक यांसारख्या उपयुक्ततेच्या सेवा आणि आरोग्यसेवा, मनोरंजन आणि श्रम यासारख्या सेवांचा समावेश होतो. या सर्वांच्या किमतीतील एकत्रित बदलाला प्रतिबिंबित करणारे एकल मूल्य म्हणजे महागाई निर्देशांक होय.
अर्थकारणाची भाषा असल्याने ती समजायला कठीण असली तरी देखील ती समजुन घेणे आपल्या सगळ्यांसाठी क्रमप्राप्त आहे. चला आता वळूयात सध्याच्या वाढलेल्या महागाईकडे... २०१४ च्या आधी वाटणारी महागाई भारतीयांना आता स्वस्ताई वाटू लागली आहे कारण वर्तमानातल्या महागाईने खरंच उच्चांक गाठला आहे. २०१४ पुर्वी ७० ते ७५ रूपये प्रती लीटर दराने मिळणारं पेट्रोल आता १२० रूपये प्रती लीटर दराने मिळू लागलं आहे. इतर गोष्टींचेही दर इतकेच महागले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढल्याने गृहीणींचं आर्थिक बजेटच कोलमडलं आहे. या बाबत मुंबईत राहणाऱ्या महिलांशी बातचित करून त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
महागाईने आमचं पार कंबरडंच मोडलं....
मुंबईच्या चेंबुर परीसरात राहणाऱ्या सुनिता हलवाई यांच्याशी आम्ही महागाईविषयी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या सिलेंडर पुर्वी ४५० रूपयांना मिळत असे आणि सबसिडीदेखील पण आता १००० रूपयांच्यावर सिलेंडर मिळू लागलं आहे शिवाय सबसिडीही बंद केली आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्यांनी काय करायचं. ९० रूपये लीटर मिळणारं तेल आता २०० रूपये लीटर मिळू लागलं आहे. आमचं तर पार कंबरडंच मोडलं आहे या महागाईनं... पुर्वी ५००० रूपयांत चालणारं घर चालवायला आता २०,००० रूपयेही कमी पडू लागले आहेत."
तर लवकरच भारताचा श्रीलंका होईलं!
महागाईचे वर्तमानात आणि भविष्यात आणखी किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही विश्वास उटगी यांच्याशी संपर्क साधला. यावर ते म्हणाले, " आत जो महागाईचा निर्देशांक आहे तो मुख्यतः सर्व जीवनावश्यक वस्तूंचा आहे. अखिल भारतीय ग्राहक निर्देशांक हा भयानक पध्दतीने वर गेलेला आहे. हा निर्देशांक जर आपण पाहिला तर तो ८ टक्क्यांपर्यंत आलेला आहे. रिझर्व बँक जरी ७.१९ टक्के सांगत असली तरी तो वस्तूतः ८ टक्क्यांच्या वर गेलेला आहे. तर घाऊक निर्देशांक हा जवळपास १९ टक्क्यांच्या वर गेलेला आहे. सरकारी आकडे आणि रिझर्व बँकेचे आकडे यात प्रचंड तफावत आहे.
महागाई जी लोकांना भेडसावतेय ती आपण एका उदाहरणातून पाहू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीला १० हजार रूपये महिना पगार आहे, किमान ५ व्यक्तींचं त्याचं कुटूंब आहे. सहा महिन्यापुर्वी त्या १० हजारात त्या व्यक्तीचं घर ज्या पध्दतीने चालत होत तसंच आता चालत नाहीये. अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. ज्या गोष्टी ते सहा महिन्यापुर्वी १० हजारात विकत घेत होते त्याच गोष्टी विकत घेण्यासाठी त्यांना किमान १५ हजार रूपये तरी लागतील पण प्रश्न हा आहे की अचानक वाढलेल्या या महागाईमुळे त्या व्यक्तीने घर चालवायला १५ हजार आणायचे कुठून?
रिझर्व बँक म्हणतेय की आम्ही व्याजदर वाढवला तर भविष्यात महागाई नियंत्रीत करण्यासाठी आम्हाला सोपं जाईल. हे तत्वं त्यांच्या गणिती भाषेत जरी बरोबर असलं तरी वस्तूतः सरकार माझा खर्च अजिबात कमी करू शकत नाही. त्यामुळे आपल्या देशातील सर्वसामान्य मनुष्य हा दिवसेंदिवस दारीद्र्य रेषेखाली जाऊ लागला आहे. भारतातील १४० कोटी लोकसंख्येपैकी ८० कोटी लोक सध्या दारीद्र्य रेषेखालचं जीवन जगतायत. असंच जर सुरू राहीलं तर सध्या श्रीलंकेत जी परिस्थिती सुरू आहे तीच परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही.", असं ते म्हणाले.
एकुण काय तर वाढत्या महागाईमधून आपल्या कुणाचीही सुटका होणार नाही हे निश्चित आहे त्यामुळे जी परिस्थिती समोर येईल तिला सामोरं जाण्या पलिकडे कौटुंबिक बजेट कोलमडलेल्या गृहिणींकडे दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही हेच खरं!