Home > Max Woman Blog > मृत्यूसोबत तिची झुंज, मी हतबल साक्षीदार ठरलो!

मृत्यूसोबत तिची झुंज, मी हतबल साक्षीदार ठरलो!

मृत्यूसोबत तिची झुंज, मी हतबल साक्षीदार ठरलो!
X

घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी...!

आज मनात खूप अस्वस्थपणा जाणवतोय. आपण माणूस म्हणून खूप हतबल झालोय. तडफडत असलेल्या व्यक्तीचे प्राण जेव्हा आपण वाचवू शकत नाही. तेव्हा मन सुन्न झालेलं असतं. मी ज्या कोविड वार्डात उपचार घेत आहे. तिथं बरीच रुग्ण कोव्हिडसोबत युद्ध करत आहेत. प्रत्येक जण ही लढाई लढतोय, पण त्यातील काही जण लढता लढता अपयशी सुद्धा होत आहेत. मात्र, तिची लढाई जेव्हा अपयशी ठरली. तेव्हा खूप वाइट वाटलं.

कारण काल दिवसभर तिची जगण्यासाठी धावपळ मी जवळून पाहत होतो. रंजना सोनोने. रंजनाताई या भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांच्या लहान बंधूच्या पत्नी. अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून रंजनाताई यांची ओळख.

मृत्यूशी सुरु असलेल्या या झुंजीत देखील रंजनाताईचं लक्ष तिच्या मुलांकडे जास्त होतं. सारखा मला आवाज देत... ‘पत्रकार भाऊ माझा अक्षय आलाय का? त्याला आत बोलवू नका, तुम्ही त्याला खिडकीत बोलवा’ त्यांच्या सांगण्यावरुन मी अक्षयला कॉल करुन बोलवून देखील घेतले होते.

पण आईची माया मन भरत नाही. रंजनाताई ज्या बेडवर होत्या. त्यापुढे एक दूर अंतरावर खिडकी होती. ती बंद करू नका. उघडीच ठेवा. असं त्या सतत सांगायच्या...

त्या तिथून आपल्या पोटच्या गोळ्याची वाट पाहात ऑक्सिजन घेत होत्या. मृत्यू सोबत 2 हाथ करणाऱ्या रंजनाताई मला म्हणाल्या.. पत्रकार भाऊ मी विपश्यना केली आहे. त्यामुळे मी घाबरत नाही. फक्त घसा कोरडा पडतोय. खायची इच्छा होत नाही. तेव्हा त्यांना मी जेवण दिले, पाणी दिले, जास्त काही त्यांनी खाल्ले नाही. मग त्यांनी दुधात ड्राय फ्रूट मिक्स करून आणायला सांगितले. मी ते पिऊन घेईल आणि नंतर औषधं घेईल असे म्हंटलं.

लगेच त्यांच्या अक्षयला मी कॉल केला. दूध गरम करून घेऊन ये असे सांगताच थोड्यावेळाने अक्षय दूध घेऊन आला. रंजनाताईने औषधं घेतली. रिस्पॉन्स व्यवस्थित होता. तिकडे अशोकभाऊ सुद्धा सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहून अपडेट घेत होते. त्यांना आवश्यक असलेल्या मेडिसिन, इंजेक्शन सर्व व्यवस्था अशोकभाऊ यांनी केली होती. दवाखान्यात सुद्धा डॉ. टापरे, डॉ. राहुल खंडारे, व संपूर्ण स्टाफ रंजनाताई यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होता.

मध्यरात्री रंजनाताईची प्रकृती खूप खालावत चालली होती. त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यांचा घसा सुद्धा ऑक्सिजनमुळे कोरडा पडला होता. तरी हिंमतीने त्या झुंज देत होत्या. मी मध्यरात्री 1 वाजता पुन्हा त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारत होतो.

तेव्हा ते मला म्हणाल्या पत्रकार भाऊ आमचे अशोकभाऊ सोनोने यांनी लहानपणापासून सर्वांचे खूप काही केले आहे. आज ही तेच आहेत. त्यांची आम्हाला खूप मदत आहे. मग मी मुद्दाम तेवढ्या रात्री अशोक भाऊ सोनोने यांना कॉल केला.

त्यांचं बोलणं करून दिले. तोंडाला ऑक्सिजन लावल्यामुळे त्या तुटक तुटक बोलत होत्या. पण त्यांना समाधान वाटत होतं. ते बघून मला बरं वाटलं. विचार केला बहुतेक उद्या या बऱ्या होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरु करतील. आणि मग मी झोपून गेलो.

सकाळी उठलो आणि बघतो तर काय रात्री छान बोलत गोष्टी सांगणाऱ्या रंजनाताई अचानक बेडवर शांत पडून आहेत. कोणतीच हालचाल करत नाही. आता त्यांना त्रास कमी झाला असेल. असा मी सुरुवातीला विचार केला. मात्र. त्या माऊलीनं मी झोपेत असतानाच रात्रीच जग सोडलं होतं.

कोरोनाच्या अवकाशात उडता उडता ती मृत्यू सोबत लढत होती. पण तरी तिचं लक्ष तिच्या मुलांकडे होतं.

घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी...! आत्तापर्यंत अनेक अपघातात, कोणी आजारी असेल तर पत्रकार मी माझे सहकारी धाऊन गेलो. मात्र, आज मी स्वत: हतबल झालो. रंजनाताई माफ कराल तुमच्या मृत्यूसोबतची झुंड बघणारा मी काही करु शकलो नाही. फक्त तुमच्या हतबलतेचा साक्षीदार ठरलो!

Updated : 17 Sept 2020 3:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top