आदिवासींचा आधारवड: ज्योत्सना विसपुते
X
ज्योत्सना सुनील विसपुते. एक आदर्श शिक्षिका. अभ्यासू व्यक्तीमत्व. मात्र खरी ओळख मिळाली आदिवासी आणि स्त्रीयांच्या हक्कासाठी खेड्यापासून अगदी मंत्रालयापर्यंत खुबीने वावरणाऱ्या कॉग्रेस कार्यकर्त्या म्हणून. लहानपणी आजीचा हात धरुन भल्या मोठ्या गर्दीतून इंदिरा गांधींच्या भाषणाला जाणारी मुलगी, भविष्यात थेट गांधी कुटुंबातील व्यक्तींसमोर बसेल याचं कोणालाही सुतोवाच नसावं.
( कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आदिवासी महिला शेतमजुरांसाठी शासनाने योजना चालू करावी म्हणून निवेदन दिलं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला. राज्य महिला आयोगात काम करण्यासाठी २०१३ साली सोनिया गांधींनी शिफारस केली. माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील याचा अहवाल देण्याची जबाबदारी सोपवली. पुढे तोच अहवाल राहुल गांधींच्या हस्ते कॉंग्रेसचा प्रोग्राम फ्लॅगशिप म्हणुन राबवला गेला. योजनांचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा या हेतुने प्रकल्पाची आखणी करण्यात आली. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे त्या जळगाव जिल्ह्यातलं एक महत्वपुर्ण असं राजकीय व्यक्तीमत्व ठरतात.
( माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार स्विकारताना )
ज्योत्सना विसपुते यांचा जन्म धुळे जिल्ह्यातला. आई- वडील दोघेही सुसिक्षित, त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण फारच उत्तम पद्धतीने झालं. मात्र, लग्नानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी मिळाली. शिक्षिका म्हणून काम करत असतानाच त्यांच्या सामाजिक आयुष्याला सुरुवात झाली आणि या कार्यात त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पुरेपुर साथ दिली. सुरुवातीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सुत्रसंचलन आणि कथाकथन करुन समाजप्रबोधनाचं काम केलं. पुढे काही नाट्यछटा लिहील्या. यापैकी ‘छकुली’ भृणहत्येवर आधारीत नाट्यछटेचे प्रयोग गावोगावी केले.
( माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबत )
आधारवड हे ज्योत्सना विसपुते यांच्या सामाजिक कार्यातलं सोनेरी पान... या प्रकल्पाअंतर्गत जळगावपासून जवळच वसलेल्या एकलव्य नगर नावाच्या आदिवासी टोल्याच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. निर्णय तसा मोठी होता. मात्र, कुटुंब आणि पतीची साथ लाभल्यामुळे काम करण्याचा विश्वास मनात होता. आपल्या कामाची सुरुवात कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता कारण मदत करण्याची इच्छा असली तरी निवडणुकीशिवाय आपली कोणी मदत करत नाही हे वस्तीवरच्या लोकांच्या मनात ठासून भरलं होत. “मग हाई बाई बिना इलेक्शननी उनी कशी?” (म्हणजे ही बाई विना इलेक्शनची आली कशी?) असा प्रश्न पाड्यावरच्या बायांसमोरही होताच. शनिवार ते रविवार या आदिवासी टोल्यावर त्यांनी शाळा भरवायला सुरुवात केली. कोणीच येईना दिवसभर शेतमजूरी करुन संध्याकाळ नवऱ्या- मुलांसाठी जेवण करण्यात सगळ्या व्यस्त. अशावेळी मग त्याच्या हाताला धरुन चुलीवरून शाळेत नेवून त्यांना बसवावं लागलं. हळूहळू संख्या वाढू लागली. विश्वासही वाढू लागला. आता शाळेत नऊ महिन्याच्या गरोदर बाईपासून अगदी म्हाताऱ्या बायकाही थोडीशी गावठी दारु पिलेल्या अवस्थेतही येऊन बसू लागल्या. त्यांच्या दारु पिण्याच्या सवयीकडे व्यसनाधिनतेपेक्षा आदिवासी संस्कृतीचा भाग म्हणुन पाहणं गरजेचं होत. अशी ही शाळा सुरु झाली. घरातून गोणी भरुन पाटी आणि पेन्सिल त्यांच्यासाठी भरुन नेत असत. पण पाटी धरायची कशी इथुनच खरी सुरुवात होती. मग त्यांना सांगितलं “आपल्या बाळाला जसं कुशीत धरता तसं पाटीला धरा” आणि हातात पाटी धरली. पुढची पायरी शुन्याची होती. शुन्य काय असतो हेच माहिती नाही, मग कपाळावरच्या कुंकूवासारखा गोल तो शुन्य ही काढला असं करत करत त्यांना जमेल, रुचेल असं त्यांचं शिक्षण सुरु झालं. शिक्षणानंतर हळूहळू गावात दारुबंदीसाठी काम सुरु केलं. सोबतच त्यांना योजनांची माहिती देणं, योजना मिळवून देण्यासाठी त्यांची कचेरीची काम करणं, गरोदर स्त्रियांच्या नोंदी करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, बाळंतपण, कुपोषण, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न या सर्व जबाबदारी हळूहळू अंगावर घेतल्या.
( माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह )
एकदा गावात शाळेसाठी येत असातानाचा अनुभव त्यांनी सांगितला, गावात जात असताना साधारम ४ वाजताची वेळ होती. पाड्यावर कोणीही नव्हतं सर्व स्त्रिया आणि पुरुष अजून शेतमजुरीच्या कामातून मोकळे झाले नव्हते. अचानक वाटेवर एक लहान मुलगी माझ्याकडे धावत येताना दिसली. माझ्या वर्गात शिकायला येणाऱ्या एका महिलेची ती मुलगी होती. ती धापा टाकत आली आणि रडतच म्हणाली “मनी मायले कसं तरी व्हयी ऱ्हायनं. मना जीव घाबरी ऱ्हायना.” (माझ्या आईला कसं तरी होतय. मला भीती वाटतेय ) तडक तीच्या घराकडे धाव घेतली. पाहिलं तर तीचं घरातच बाळंतपण झालं होत. तीला असह्य वेदना होत होत्या. काय करावं आणि काय नाही तेच सुचेना. वाहनाची काहीच सोय नव्हती. मग रस्त्यावर जाऊन ट्रॅक्टर अडवला आणि तिला त्यावर टाकुन रुग्णालयात नेलं. योग्यवेळी उपचार झाल्यामुळे तिला आणि तिच्या बाळाला काही धोका झाला नाही. जेव्हा तीचा नवरा आला तेव्हा त्याला कसलीच शुध्द नव्हती. दारुच्या नशेत त्याला आपल्या पत्नीची अवस्थाच कळेना. मग तीला घरी सुखरुप पोहचवल्यानंतर माझ काम संपलं.
टोल्यावर पाण्याची भीषण समस्या होती. गावात नळ होते पण पाणी नव्हतं. वस्तील पाणी मिळायचं नाही. पाण्यासाठी गावातील एका शेतकऱ्याच्या विहरीवर जायचे. पण एक दिवस त्याने रागाच्या भरात विहीरीत शेण ओतलं मग तीथेही पाणी बंद... मग प्यायचं काय? संध्याकाळी वर्गात बसलेल्या असताना त्यांची चिडचिड, राग लक्षात आला. त्यांना कारण विचारल्यानंतर घडला प्रकार बायकांनी सांगितला.
मनाशीच त्यांना पाणी मिळवुन देण्याचं ठरवलं. नगरपालिकेत चौकशी केली असता कळल की, वस्तीवर नळपाणी योजना आहे. पण गावात नळाला पाण्याचा एक थेंब नाही. पाण्याचा शोध घेतला तेव्हा कळालं की पाणी पाच वर्षांपासून एका जमीनदाराच्या शेतात केळीच्या शेताला चाललंय. त्याने मध्येच पाईप फोडला होता. आदिवासी पाड्यापर्यंत पाणी पोहचतच नव्हतं आणि हे त्या लोकांच्याही लक्षात येत नव्हतं. मग अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा स्वतंत्र पाईप टाकून वस्तील पाणी सुरु झालं.
याच वस्तीतली सरलाबाई एकदा माझ्याशी बोलत बसली होती. तेव्हा माझी नजर तिच्या फाटक्या लुगड्यावर पडली. तिला विचारलं, ‘तु नवं लूगड का नाही घेतलं?’ तर ती म्हणाली, “या वर्षी मी लुगडं नाय घेतलं माझ्या लुगड्याचे पैसे घराचा फॉर्म भरायला दिले. पैश्याशिवाय काम होत नव्हतं.” “बरं म झालं का आता काम?” तर म्हणे ”नाही तो आलाच नाही दोन तीन महिन्यांपासून इकडे”
अशा पद्धतीने त्यांच्याच वस्तीतला थोडा बहुत शिकलेला, ज्याला ते त्यांचा म्होरक्या समजतात असा माणुस कामासाठी पैसे घेतो आणि कामही करत नाही. हे काम विनापैश्याचं होतं हे त्यांना माहितच नसत. म्हणजे आपलं घर व्हावं म्हणुन ती बकऱ्या पाळणारी महिला दोन वर्ष तेच पातळ वापरते. लुगडं नाय पण घर तरी मिळेल या भाबड्या आशेत दिवस काढते. आदिवासींना मुळात आपलं कोणी शोषण करतय? किंवा शोषण म्हणजे नेमकं काय? याचीच जाणिव नसते मग ते लढणार कोणाविरुद्ध? त्यांचा लढा स्वत:शीच आहे. अज्ञानाशी आणि गरीबीशी आहे. या जाणिवेतून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. आता मात्र गावाचा कायापालट झालाय. सगळीकडे पक्की घरं आली आहेत.
समाजकारणातून पुढे राजकारणात येणं झालं याचं मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय यंत्रणांवर राजकारण्यांचा असणाऱ्या दबावातून चपळाईने हलणाऱ्या या व्यवस्थ्चा चेहरा इतक्या वर्षानंतर आता समजला होता. जर सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारणात येण भाग होत. कारण एक समाजसेवक म्हणुन अधिकाऱ्यांकडे दाद मागून तीला पटकन न्याय मिळत नव्हता. अनेकदा कोणातरी नेत्याचा एक फोन यायचा आणि आम्हाला अधिकाऱ्यांची सहानुभुती मिळायची पण न्याय नाही. मात्र राजकीय प्रवास सुरु झाल्याबरोबर लोकांची कामही चटकन होऊ लागली. प्रशासकीय यंत्रणा धाऊन येऊ लागली. कारण आता कोणताही नेता अधिकाऱ्यावर दबाव टाकत नव्हता. लोकप्रतिनिधींची ऑर्डर आल्याशिवाय ही यंत्रणा जागी होत नाही. शिक्षीत व्यकतींचं राजकारणात येणं फार गरजेचं आहे या ठाम विश्वासातून त्यांनी राजकारणाचा मार्ग अवलंबला.
सुरुवातीच्या काळात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक राजकीय सभांमध्ये आपल्या वकृत्व गुणांची चुणुक दाखवली. आमदार गिरिश महाजन शाळेच्या संचालक मंडळावर होते. तेव्हा त्यांनी कायम पक्षाच्या कार्यक्रमांचं सुत्रसंचलन करण्याची जबाबदारी ज्योत्सना यांच्यावरच सोपवली. मात्र, राजकारणात येताना पक्ष निवडीच्यावेळी त्यांनी कॉंग्रेसची कास धरली. त्याला कारणही तसचं होत, या पक्षासोबत पुर्वीपासुनच त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यांची आजी इंदिराजींच्या काळात, त्यांच्या खेड्यात कॉंग्रेसचं नेतृत्व करायची. एकदा जळगावच्या कॉलेजमध्ये इंदिरा गांधींचं भाषण होणार होत. त्या हॅलीकॉप्टरने आल्या होत्या. ज्योत्सना तेव्हा साधारण १० वर्षांच्या असतील, तेव्हा आजी त्यांना भाषणाला घेऊन गेली होती. इंदिराजींची ती गुलाबी रंगाची साडी आजही त्यांच्या डोळ्यात असल्याची आठवण त्यांनी सांगितली.