Home > रिपोर्ट > चिकित्सक पुष्पाबाई...

चिकित्सक पुष्पाबाई...

चिकित्सक पुष्पाबाई...
X

व्यासंगी, चिंतनशील व्यक्तीसोबत गप्पा करत तिचा विचार समजून घेणं, त्या गप्पांना पुस्तकरूप देणं, हा मस्तच अनुभव. पुष्पा भावे यांचं पुस्तक करताना तो मला भरपूर मिळाला. २०१४ साली मनोविकास प्रकाशनाने पुष्पाबाईंच्या पुस्तकाचा घाट घातला. तोवर कित्येक जण कित्येकदा, तुम्ही लिहा, लिहा असं बाईंना सांगत आले होते. बाई ते मुळीच मनावर घेत नव्हत्या. त्यांचं म्हणणं असायचं की, माझ्याकडे विशेष काही सांगण्यासारखं नाही. मात्र, मनोविकासच्या अरविंद पाटकरांनी युक्ती काढली. बाईंशी कुणीतरी बोलायचं, गप्पा मारायच्या, प्रश्न विचारायचे आणि त्यातून त्यांचं पुस्तक आकाराला आणायचं. हे कुणीतरी म्हणजे मी असावं, असं बाईंनी ठरवलं. हे मला कळलं, तेव्हा आनंदच झाला. बाईंनी अनुभवलेल्या काळाची नोंद केली जाणार. मलाही तो काळ समजून घ्यायला मिळणार, म्हणून. मी काही आखणी केली, मुद्दे काढले, होमवर्क केलं आणि आम्ही दोघींनी उत्साहाने भेटी ठरवून बोलायला सुरूवात केली.

रुइया कॉलेजात गेल्यावर बाईंशी ओळख झाली. १९७५-७७ चा तो काळ. निर्णायक सामाजिक राजकीय घडामोडींचा. तेव्हापासून आजपर्यंत काही ना काही कारणाने आणि विनाकारणानेदेखील बाईंशी माझा संपर्क राहिला. त्यामुळे, त्या करत असलेली कामं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या भेटीगाठी वगैरे मला समजत राहिलं. ते सगळं आमच्या चर्चेत असायचं. म्हणूनच, पुस्तकासाठी आखणी करताना बाईंशी कशाबद्दल बोलायचं हे ठरवणं मला सोपं गेलं. अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

बाईंना बोलतं करणं अवघड जाईल का, अशी किंचितशी शंका माझ्या मनात होती. त्या स्वतः बरोबरीच्या नात्याने वागवत असल्या तरी शिक्षक-विद्यार्थिनी या नात्याचं दडपण होतंच. अवघडलेपणही होतं. कारण बाई मोजकं बोलणार्याअ, गोष्टीवेल्हाळ मुळीच नाहीत. पण ती शंका पहिल्या दोन तीन भेटींनंतर निमाली. मला जाणवलं की, काही घटना, व्यक्ती, कामं याबद्दल त्यांना खूप मनःपूर्वक सांगायचं आहे. स्वतःविषयी बोलणं हे एरवीही संकोचाचं असतं. आणि बाईंच्या बाबातीत तर तसं खूपच होतं. सामाजिक क्षेत्रात वावरणार्याय असल्या तरी त्या स्वतःचं खाजगीपण जपणार्याण. त्यांचं लहानपण, कुटुंबातलं वातावरण, त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबरचं त्यांचं नातं अशा विषयांवर अगोदर काहीशा संकोचाने आणि नंतर गप्पांच्या ओघात बोलताना त्या मोकळं होत गेल्या. आणखी एक अडचण आली, काही नावं, गावं, सालं त्यांना नेमकी स्मरत नव्हती. मग ते संदर्भ इंटरनेटवर, संबंधित माणसांशी बोलून पक्के करून घ्यावे लागले. माझ्याकडूनही काही राहून गेलं ते वैशाली रोडेने पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात पूर्णत्वाला नेलं.

आमच्या या कामात सगळ्यात मोठा अडथळा आला, महिनोन् महिने चाललेल्या बाईंच्या आजारपणाचा. त्यातही, आम्ही गप्पा, मुलाखत चालू ठेवण्याचा प्रयत्न करतच राहिलो. रहेजा हॉस्पिटल, कॉलनी नर्सिंग होम इथल्या त्यांच्या दीर्घ वास्तव्यातदेखील पुस्तकासाठी आमच्या भेटी झाल्या. मधुमेहामुळे त्यांच्या दोन्ही पायांचं झालेलं नुकसान, त्यासाठी पुन्हा पुन्हा कराव्या लगणार्याझ तपासण्या, प्रोसिजर्स, त्यांच्या हालचालींवर आलेल्या मर्यादा, हे सारं त्यांना भोगायला लागलं. ते अजूनही सुरूच आहे. आयुष्यभर सक्रीय राहिलेल्या व्यक्तीला असं जखडून गेलेलं बघणं, ही बघणार्यां साठीही शिक्षाच. पण या सर्व काळात, बाईंचा कमालीचा संयम आणि सोशिकपणा बघायला मिळाला. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा पुस्तकात आहेच.

मराठी वाङ्मयाचा इतिहास शिकवताना चक्रधरांपासून मर्ढेकरांपर्यंतचा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासही त्या सहज उलगडत असत. देवलांचं संगीत शारदा नाटक शिकवताना स्त्रीसमस्यांचा ऎतिहासिक संदर्भ आणि त्याकडे बघण्याची नजर त्यांनी दिली. एकूणच वाङ्मय-समाज यांचे संबंध, सामाजिक समस्यांचं ऎतिहासिक परिप्रेक्ष्य हे सारं त्या शिकवण्याच्या ओघात समजावत. त्यांचं शिकवणंही वेगवान प्रवाही. तसं तर कविवर्य वसंत बापट यांनीही आम्हाला कॉलेजच्या पहिल्या वर्षी शिकवलं. तेही वर्गाला मंत्रमुग्ध करून टाकायचे. पुष्पाबाईंनी आम्हाला त्यापलीकडे नेत विचार करायला शिकवलं. विचारांची दिशा दाखवली. परंपरेचं भान देता देता नवता आणि विद्रोह याचंही मोल सांगितलं.

अध्यापनाखेरीज नाटक, सिनेमा, समीक्षा, समाजकारण आणि राजकारण या सार्याेशी त्या जोडलेल्या राहिल्या. गतिमान काळ होता तो! आणीबाणी, दलित साहित्याचा बहर, वाङमयीन अनियतकालिकं, माणूस साप्ताहिकातले गाजणारे विषय, ग्रंथालीच्या चळवळीची सुरूवात, आधी जुलूस आणि नंतर घाशीराम कोतवाल अशी नाटकं, भरात असलेलं छबिलदास, नवा प्रायोगिक सिनेमा, जोशातल्या स्त्री संघटना, दलितांचे लढे, मुंबईत गिरणी कामगारांचा पेटलेला विषय - या सगळ्याशी माणसाच्या आणि स्त्रीत्वाच्या नात्याने माझाही संबंध आहे, याची जाणीव माझ्यासारखीला झाली त्याचं एक महत्वाचं कारण पुष्पा भावे आमच्या शिक्षिका असणं हेही होतं.

रुइयात अभ्यासापेक्षा अभ्यासेतर उपक्रमच जास्त असायचे. खरं तर अशाच उपक्रमांतून अभ्यास पक्का व्हायचा. परिक्षेतल्या गुणांच्या स्पर्धेत मागे राहाणार्या माझ्यासारखीला याच उपक्रमांत अधिक रमायला व्हायचं. त्यावेळी नव्या नाटक-सिनेमाची चर्चा घडवून आणणारा एक उपक्रम बाईंनी सुरू केला होता. त्यात डॉ लागू, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर अशांना भेटायची, त्यांना ऎकायची संधी मिळायची. रविवारी एकेका कवीवर आणि कवितेवर चर्चा करायची असाही बाईंनी सुरू केलेला एक उपक्रम. त्यातून पु शि रेगे, विंदा करंदिकर, बा सी मर्ढेकर यांच्या कविता उलगडत गेल्या, ते आजही आठवतं.

रुइयाचा मानबिंदू असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेला पुष्पाबाईंनी कालसुसंगत परिमाण दिलं. कॉलेजची वर्षं भुर्र्कन संपून गेली तरी ही शिदोरी अमच्याजवळ राहिलीच. म्हणूनच आमच्यापैकी अनेकजणी बाईंच्या संपर्कात राहिल्या. त्यांच्या आजारपणात मदतीला धावल्या. पुष्पाबाईंना फार न ओळखणार्यांलना त्या कडक वाटतात. आणि तशा त्या आहेतदेखील. स्वतःचा अवकाश जपणार्याई. त्यांना फार लिप्ताळा नकोच असतो. पण, त्यांच्या व्यक्तिमत्वातला मृदुपणा निकटच्या सहवासात जाणवतो. विद्यार्थ्यांची त्यांना वाटणारी काळजी, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातल्या चढ-उतारात सोबत करणं हेही त्या कडकपणाच्या पलीकडे आहे.

कॉलेजच्या नोकरीतून मुक्त होताहोता पुष्पाबाई अनेक अनेक कामांमध्ये गुंतत गेल्या. विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यासाची स्वतंत्र शाखा, सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र फाउंडेशन, केशव गोरे ट्रस्ट, य दि फडके संशोधन केंद्र, साने गुरूजी स्मारक ट्रस्ट, साहित्य अनुवाद केंद्र वगैरे वगैरे. मोबाइल फोन वापरणं त्यांनी चटकन अवगत केलं. गडहिंग्लजपासून गडचिरोलीपर्यंत कुठेही त्यांचे दौरे सुरू असायचे.

काही वर्षांपूर्वी बाईंसोबत बेळगावला जाणं झालं. म्हणजे कार्यक्रम बाईंचा आणि मी सोबतीला. तिथल्या बसवराज कट्टीमनी प्रतिष्ठान आणि वाङ्मय चर्चा मंडळ या कन्नड आणि मराठी संस्थांनी एकत्रितपणे आयोजलेला कार्यक्रम. पुष्पाबाईंना ऎकण्यासाठी तिथले श्रोते किती उत्सुक होते; ते पाहिलं. काहीतरी नवं, सकस, विचारप्रवण ऎकायला मिळणार यासाठी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, विद्यार्थी यांनी बाईंच्या भाषणाला गर्दी केली होती. लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम त्या करत आल्या. जमिनीवर केल्या जाणार्या् कामाइतकंच हेही महत्वाचंच. आताआतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवा उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाविना पुढे जात नसे. खरोखरच, पुष्पाबाइतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.

- मेधा कुळकर्णी

Updated : 16 Sept 2020 2:58 PM IST
Next Story
Share it
Top