‘माझ्या कुटुंबाचा लढा मी बहिष्कृत बारबालांच्या लढ्या इतकाचं निकराने लढणार’
X
बारबाला आणि डान्सबार या विषयावर मी 2003 पासून सामाजिक काम सुरू केलं. अनेक प्रकारच्या हेटाळणी, बहिष्कार, टिंगल टवाळी, बदनामीला सामोरं जावं लागलं. अनेक सामाजिक मंच, संघटना, व्यक्ति, ओळखी आणि अनोळखी लोकं यांच्याकडून मिळालेली अस्पृश्यतेची वागणूक मी सहन केली. बारबालांसाठी काम करताना त्यांच्याकडून झालेला मनस्ताप सहन करायला लागला तो वेगळाच. मी या प्रश्नावर सातत्याने 17/18 वर्ष काम केल्यावर अनेकांना स्वतःचा बहिष्कार बहुदा स्वतःच मागे घेण्याचं लक्षात आलं. पण म्हणून आजही माझे काही सत्कार किंवा गुणगौरव करण्यात आलेले नाहीत आणि याचं मला भान आहे. मी "नेकी कर दर्या में डाल" या अंकुशच्या उक्तीवर चाललेय. पिंपळनेरला आल्यापासून माझे काही सासरचे चुलत नातेवाईक स्त्री-पुरूष मला बारबाला, नाचणारीण, ठेवलेली बाई, हिजडी, वळू, टवळी, जातीवंत वेश्या, सडलेल्या पायाची बाई, हलक्या जातीची बाई असे शब्द वापरत असतात. म,भ,च,झ अशा अक्षराने सुरू होणा-या घाणघाण लैंगिक अर्थाच्या शिव्या सतत तोंडावर देत असतात. मी समजावून विनंती करूनही हे उच्च शिक्षीत स्त्री-पुरूष ऐकत नाहीत. अर्थात एवढ्याने मी काही खच्ची होत नाही. मात्र या लोकांनी गेले 10 वर्ष गावभर अनेकांच्या घरी जाऊन माझी घरोघर बदनामी आरंभली आहे. आता त्याचे पडसाद मला ऐकू येऊ लागलेत. त्यांच्या "कुजबुज कॅम्पेनचे" परिणाम काय होतील कोण जाणे? मी शेती करणं सोडणार नाही किंवा गाव सोडून रहाणार नाही. माझ्या कुटुंबाचा हा लढा मी बहिष्कृत बारबालांच्या लढ्या इतकाचं निकराने लढणार आहे. हा लढा केवळ माझा नाही. हक्कांसाठीच्या सर्व लढ्यात स्त्री विरूद्ध चारित्र्य हननाचं हत्यार वापरण्याची पद्धत नवीन नाही. कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम न करणा-या माझ्या सासू विरूद्धही हेच हत्यार चाळीस वर्षांपूर्वी वापरलं गेलं होतं आणि त्यांना देशोधडीला लावण्यात आलं होतं. त्याच कुटुंबातली दुसरी लोकं पुन्हा तीच खेळी माझ्याशी करत आहेत. मी बारबालांची लढाई कायदेशीर सनदशीर मार्गाने लढले आणि जिंकले. हि लढाई कायदेशीर, सनदशीरच मार्गाने मला जिंकायची आहे. प्रचंड मानसिक बौद्धिक ताकदिची गरज लागणार आहे मला...
वर्षा काळे, सामाजिक कार्यकर्त्या