कोरोनाची भीती योग्य की अयोग्य...
X
माझे पती रवि आणि मुलगा रजत १५ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कळलं. रविला त्यापूर्वी 2 दिवस ताप आणि अंगदुखी होती. फॅमिली डॉक्टरांनी दिलेली औषधं सुरू केली. कोरोनामुळे शिंक आली तरी हल्ली भिती वाटते. वाटतं की टेस्ट करून घ्यावी. पण मग डॉक्टर सांगतात की उठसुट टेस्टिंगसाठी धावपळ करणं योग्य नाही. आताशा तर कोरोनाचं भयही संपल आहे. सर्वांना एकदा होऊनच जाणार असंही अनेकांनी मान्य करून रूटीन सुरु केलंय. त्यामुळं माझा अनुभव शेअर करावा की नाही असंही वाटलं. पण ऑफिसमध्येही ३ टप्प्यांत कोरोनाग्रस्त आढळले.
२४ मार्चपासूनच अनेक बातम्या करतानाही प्रत्येक रुग्णाविषयी विविध अनुभव वाचनात आले.विविध डॉक्टरांच्या मुलाखतीतूनही वेगवेगळे अँगल समोर आले. आसपास पाहिलं तर ढोबळमानाने दोन प्रकारचे लोक पॅनिक निर्माण करत आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे हो जाने दो.. आम्ही सामोरे जाऊ म्हणणारे आहेत. बिनधास्त राहून रुटीन सुरु केलेले म्हणतात की आमची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. ही मंडळी बेफिकीर आहेत. दुसरा एक वर्ग आहे तो म्हणजे अति बाऊ करणारा. कोरोनाग्रस्त कुटुंबियालाही वाळीत टाकणारे त्यांचे नातलग. घाबरून जाणारे आणि व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून वाट्टेल ते भ्रम पाळलेले काही लोक आहेत. ते ही कोरोनाच्या परिस्थितीला अधिक पॅनिक करत आहेत. हे दोन्हीही टोकाचे गट कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी घातकच ठरत आहेत. लस येईपर्यंत अतिभय आणि अति आत्मविश्वास भोवणार आहे. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर करत आहे.
२ दिवस रविला ताप होता. मी त्वरीत सुटी घेतली. 24 ×7 मॉनिटरिंग सुरू केलं. माझा मुलगा रजत तर लक्षण नसलेला पेशंट होता. तिसऱ्या दिवशी रात्री रवि मध्यरात्री अस्वस्थ होऊन उठला. अडीचच्या सुमारास त्याला वाटलं की आपल्या घशाला आतून काही तर करकचून पकडतंय. त्यानं वाफ घेतली. मग घसा नॉर्मल वाटला. मात्र सकाळी उठल्या उठल्या म्हणाला की रात्रीचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच घेतलाय. मी टेस्टिंग करून येतो. ब्रेकफास्ट घेऊन तो टेस्टिंगला गेला. पॉझिटीव्ह आल्यानं मला आणि रजतलाही टेस्टिंगसाठी लगेच फोन आला. दोघंही अँटीजनमध्येच पॉझिटीव्ह आढळले. माझी अँटीजन निगेटीव्ह आल्यानं आरटी-पीसीआर साठी नमुना घेतला. माझा हा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता.
पॉझिटीव्ह आहे म्हटल्यावर रजत गांगरून गेला.. कारण त्याला वाटलही नव्हतं की त्याची टेस्ट पॉझिटीव्ह येईल. आदल्या दिवशी भरपूर खेळला होता. सायकलिंग केली होती. दोघांच्या तोडांची चवही चांगली होती. सर्व फुड इनटेक नॉर्मल होता. रजतला क्वारंटाईन होण्याची कल्पनाही सहन होत नव्हती. मनपा कोविड टेस्टिंगच्या औपचारिकता पूर्ण करून आम्ही तिघांनी खास रेफरन्समधलं रूग्णालय गाठलं. क्वारंटाईनविषयी इतर सर्व टेस्टिंग झाल्यावर कळवतो, असं मनपातील संबंधितांना सांगितलं. त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्र घेऊन खासगी रुग्णालयात एचआरसीटी, सीटीस्कॅन, सीबीसी, सीआरपी, serum feri, डी-डीमर, आयएल6 या आणि इतर जी नावंही मला टेक्निकली माहित नव्हती त्या रिकमंड केलेल्या सर्व टेस्टिंग केल्या.
रविला २ दिवसापासून ताप असल्यानं टेस्टिंगमध्ये कोणतीही तडजोड असू नये असं वाटलं. कारण त्याचा वावर घरात सर्वत्र होता. म्हणजे रजतच्याही टेस्टिंगमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तडजोड केली नाही. याचे रिपोर्ट रात्री येणार होते. त्यानंतर होम क्वारंटाईन की हॉस्पीटल क्वारंटाईन असा निर्णय घ्यायचं ठरलं. रात्री ७ च्या सुमारास सर्व रिपोर्ट आले. यादरम्यान क्वारंटाईन करायचंच असेल तर कुठं आणि कसं याविषयी सर्वांशी बोलणं सुरु होतं. रविचे जवळचे मित्र आणि माझे ऑफिसचे अनुभवी कलिग्ज, माझी बहिण प्रीती आणि कोविड कंट्रोल रूमच्या इन्चार्ज वर्षा ठाकूर या सर्वांचा सल्ला आणि अनुभव खूप मदतीचे ठरले. या सर्वांनी विविध ठिकाणी फोन करून संभ्याव्य व्यवस्थेसंबंधी सर्व पर्याय मला सांगितले. यापैकी काय ते निवड असंही सांगितलं.
शक्यतो रिपोर्ट नॉर्मल असतील तर होम क्वारंटाईनचा पर्याय सर्वांनी सूचवला. ७ वाजता रुग्णालयातील ३ डॉक्टर्सशी चर्चा केली. पैकी २ सिनिअर डॉक्टर्सचं मत होतं की रवि २ दिवस तापात होता. या स्थितीत तुम्ही होम क्वारंटाइनची जोखीम पत्करू नये. तुम्ही सतत त्यांच्या सहवासात आहात. उद्या तुमचा आरटी-पीसीआर पॉझिटीव्ह आला तर होम क्वारंटाईन कसे काय सोयीचे ठरणार? असाही प्रश्न होता. श्वासांचे त्रास कोणाला कसे कसे झाले आहेत हे मी ऑफिसमधल्या कलिग्जकडून त्यांचे अनुभवही ऐकले होते. त्यामुळे हॉस्पिटल क्वारंटाईनचा निर्णय घेतला. रविचा मित्र दिपक पवारने सर्व सोय केली. प्रशासकीय अधिकारी आणि मोठी बहिणच असलेल्या वर्षा ठाकूर या तर सतत अपडेट्स घेत होत्या. यांच्या सल्ल्यानं हॉस्पिटल क्वारंटाईन केलं.
१५ ते २५ सप्टेंबरपर्यंत दोघं हॉस्पिटल क्वारंटाईन होते. ३ दिवसा नंतरच्या रक्तचाचणीतच सर्व नॉर्मल आलं. रजतने हॉस्पीटल क्वारंटाईनमध्ये ऑनलाईन शाळाही केली. तो रिलॅक्स झाला रात्रीपर्यंत म्हणून माझाही जीव भांड्यात पडला. रजत अस्वस्थ असल्यानं मी डिस्टर्ब झाले होते. म्हटलं की हा हॉस्पीटल क्वारंटाईनमध्ये अधिक वैतागू नये! पण तसंही काही झालं नाही. ५ तास त्याचे ऑनलाईन शाळा करण्यात जात होते. दोघांच्या जीभेची चव असल्याने आहारही व्यवस्थित होता. तिसऱ्या दिवशी रक्त चाचणी नॉर्मल आल्यानंही तणाव निवळला. २५ सप्टेंबरनंतर घरी परतल्यावरही त्यांच आहाराचं रुटीन आणि एकूणच ऑक्सिजन लेव्हल इत्यादी व्यवस्थित होतं.
आज अँटीबॉडीजचे रिपोर्ट आले. दोघांच अँटीबॉडीजचं पर्सेंटेज ४ ते ६ दरम्यान आहे. दरम्यान माझ्याही टेस्टिंग नॉर्मल आल्या. माझ्या अँटीबॉडीज निल आहेत. याविषयी डॉक्टरांशी चर्चा करणारच आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची मुलाखत दिव्यमध्ये वाचली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना रुग्णांना प्रभावी फायदा झाल्याचं दिसलं नाहीये. ठणठणीत झाल्यानंतर अँटीबॉडीज किती दिवसापर्यंत राहते हे अद्याप स्पष्ट नाही. बरे झालेल्या सर्वच रुग्णांत अँटीबॉडी तयार होतं असाही काही अनुभव नाही. रुग्णाला कोणत्या वेळी प्लाझमा दिला जावा यावरही आणखी अभ्यासाची गरज आहे. आता अँटीबॉडीज पर्सेंटेज कमी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असाही निष्कर्ष काढता येत नाही. कारण हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देताना सर्वच चाचण्यांचे रिपोर्ट दिले जातात. त्यात रुग्णाच्या शरिराला आफ्टर कोविड कशाची गरज आहे हे स्पष्ट कळतं. त्यामुळं हा अनुभव व्यक्तीपरत्वे वेगळा आहे.
रविच्या प्लेटलेट्स अल्पशा प्रमाणात कमी आहेत. त्यामुळं त्याचा आहार संतुलित असणं हेच आता प्राधान्याचं. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. रजतचे रिपोर्ट तर पूर्ण नॉर्मल आहेत. माझ्या रिपोर्टमध्ये अँटीबॉडीज निल म्हणजे मला काही कोरोना सुप्तपणे जसा अनेकांना होऊन गेलाय तसंही नसावं.
ही सर्व प्रक्रिया सुरु असताना मन शांत ठेवणं आणि पॉझिटीव्ह असलेल्यांना अधिक पॅनिक होऊ न देणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण मनातून भेदरून गेलं की आजार अधिक बळावतात, असं मला तरी वाटतं. तसा माझा अनुभवही आहे. त्यामुळं पेशंटच्या घरातील, जवळच्या सर्वांच एक काम आहे की स्वतः शांत राहा. कोरोनाचे व्यक्तीगणिक अनुभव वेगवेगळे आहेत. अधिक फोनाफोनी करून इतरांचे अनुभव ऐकूनही अनेकजण विनाकारणच भेदरून जातात. अनुभवी, मोजक्या आणि तज्ज्ञांच्या मतांना यावेळी प्राधान्य द्या. विश्वास त्यांच्यावरच ठेवा. "भीत्यापाठी ब्रम्हराक्षस" हे मनात पक्क राहू द्या.
आपला आहार चांगला ठेवा. लक्षण आढल्यावरही जर आपण चांगले चालते फिरते आहोत तर घाबरून जाऊ नका. श्वसनाला काही त्रास नाही म्हटल्यावर तर आपण या दिव्यातून निश्चितपणे बाहेर पडू शकतो. या दरम्यान आहार चांगला ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला ऐकणे, आपल्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थाकडे लक्ष पुरवणे , काळजीनं काळवंडण्यापेक्षा काळजी घेणे, मन प्रसन्न ठेवणे हे जरी पेशंटने केलं तर खूप चांगला प्रतिसाद आपण देऊ शकतो.
कोरोना अनप्रेडीक्टेबल आहे मान्य! पण आपल्या शरिराच्या डिमांड ऐकण्याची क्षमताही आपल्यात असली पाहिजे. ते विश्रांती मागत आहे तर संपूर्ण विश्रांती घ्या. कोरोनाविषयी फालतू काहीही वाचत बसूनही अनेकांनी आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडाच मारून घेतला आहे. एक असं की किमान व्यायाम गरजेचा आहे. चालणे, योगासनं किंवा अॅरोबिक्स ज्यांना जे जे शक्य आणि आवडीचा व्यायाम प्रकार आहे त्यांनी तो केला पाहिजे. श्वास महत्त्वाचा. ह्रदयाचा भाता उत्तम सक्रिय ठेवला पाहिजे. जे आपल्या हातात आहे ते आपण केलंच पाहिजे. इतकं करूनही कोरोना शिरलाच शरिरात तर मुकाबला करावाच लागणार. मास्कवादी आणि मास्कविरोधी असे दोन गटही आहेत. मास्कवादी लस येईपर्यंत तरी राहा. कामाच्या ठिकाणी हा कटाक्ष ठेवा.
रविला संसर्ग कुठून झाला असावा यावर माझं असं एक निरिक्षण आहे की कारमध्ये विविध लोकांना घेऊन तो फिरला. कार एसी असते. मित्र परिवारावर प्रेम दाखवयाचं असेल तर एकमेकांच्या कारने प्रवास करू नये. अनोळखी व्यक्तींना तरी कारमध्ये घेऊन फिरू नये. ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये संवाद साधण्यापेक्षा जो भाग क्रॉस व्हेंटीलेशन देतोय तिथं बसून चर्चा करा. न्यू नॉर्मलमध्ये आपण हे केलं तर चांगल आहे.
मास्क वापताना त्याला कारच्या डॅशबोर्डवर ठेवणे, ऑफिसच्या मेजावर ठेवणे टाळा. दररोज स्वच्छ मास्क वापरा. कारमध्ये ठेवलेले मास्क कृपया परत वापरू नका. छोट्या छोट्या गोष्टी न्यू नॉर्मलमध्ये महत्त्वाच्या आहेत. अनेकांना गप्पात जीव रंगला की मास्क हातात गोल गोल घेऊन फिरवण्याची सवय आहे. मास्कच्या दोन्ही बाजूला तुम्ही हात लावताय, मग तो निर्जंतूक कसा राहाणार? शाळकरी मुलांना सांगाव लागतं तस मोठ्या मंडळींनाही हे वारंवार समजावून सांगाव लागत आहे. मास्कमधून श्वसन कस करायचं याचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, ते पाहा... लस येईपर्यंत दक्षताच हाच उपाय आहे...
- तृप्ती डिग्गीकर