Fact Check | व्हॉट्सअपमध्ये तिन्ही टिक √√√ लाल झाल्या तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा? वाचा 'Red Tick√' चं सत्य
X
सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन अफवा समोर येत आहेत. सध्याया व्हॉट्सअपसंदर्भात एक जुनी पोस्ट पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे.
व्हॉट्सअपमध्ये नवीन फिचर आलं असून आता पाठवले गेलेले सर्व मेसेज शासकीय यंत्रणा वाचणार असल्याच्या पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाल्या आहेत. या यंत्रणांना मेसेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास पाठवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात येतोय.
व्हॉट्सअपवर मेसेज पाठवल्यानंतर एक टिक √ येते. समोरच्या व्यक्तीला मेसेज पोहोचल्यानंतर दोन टिक √√ होतात आणि मेसेज वाचल्यानंतर दोन्ही टिक निळ्या होतात. मात्र आता यासोबत तिसऱ्या लाल टिकचा √ पर्याय येणार असून याचा अर्थ शासकीय यंत्रणांनी तुमचा मेसेज वाचला असा होईल. तिन्ही टिक √√√ लाल झाल्या तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा असून शासकीय यंत्रणांना मेसेजमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला असून तुमच्यावर कारवाई होऊ शकते असा त्याचा अर्थ असेल, असं या पोस्ट्समध्ये म्हटलंय.
२०१५ पासून अशाप्रकारे मेसेज व्हायरल आहेत.
https://twitter.com/nehadoodles/status/646267691288801280?s=19
तथ्य पडताळणी :
व्हायरल पोस्टमधील माहिती ही वास्तविकतेला धरून वाटत नाही. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने दोन जणांचे मेसेज वाचणं हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्यासारखं आणि गुप्ततेचा भंग करणारं आहे. त्यामुळे व्हॉट्सअप किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा अशाप्रकारचे पाऊल उचलणार नाही.
हे ही वाचा
Fact Check: अवकाशातून दिवे लागलेला भारत खरचं असा दिसतो?
Fact Check | ‘या’ फोटोतील महिला खरंच तृप्ती देसाई आहेत का?
ही माहिती व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाकडून (PIB) याबाबत खुलासा करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी असून सरकारकडून अशाप्रकारची कोणतीही कृती केली जात नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलंय. अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलंय.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1247473384293715971?s=19
निष्कर्ष :
व्हॉट्सअपवर तिसऱ्या लाल टिक √ चं फिचर येणार नाही किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणांकडून मेसेज वाचले जाणार नाहीत. असा दावा करणारी पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.