Home > Max Woman Blog > दिल्ली जळत होती.. आणि एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम बहुल भागात झाला

दिल्ली जळत होती.. आणि एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम बहुल भागात झाला

दिल्ली जळत होती.. आणि एका हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम बहुल भागात झाला
X

इस हिम्मत को भी दाद देनी पड़ेगी...

ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीत आतापर्यंत मृतांचा आकडा 39 वर पोहोचला असून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. हिंसाचारावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही रंगू लागल्या आहेत. ईशान्य दिल्लीतल्या भजनपुरा, चांदबाग, जाफ्राबाद, भजनपुरा, गोकुलपुर, करवल नगर, मौजपूर, बदरपूर या भागात परिस्थिती तणावपूर्ण होती. सध्याच्या परिस्थितीमुळे 1984 ची दंगल १९९२,९३ आणि २००२ च्या दंगलीची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही. राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेताना दिसत आहेत. मात्र ही पोळी फिरवली नाही तर ती करपून जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली दंगल.

People coming for marriage Courtesy : Social Media

दिल्लीच्या या जातीय हिंसाचारात मशिदीवर झेंडा घेऊन घुमटाचं टोक गाठणाऱ्या तरुणासोबतच अमानुषतेनेही वरच टोक गाठलं होतं. मात्र दहशतीच्या वातावरणातही एक घटना अशी घडली की, हरवलेली माणुसकी पुन्हा गवसली. या घटनेने दाखवून दिलं की, कोणीही कितीही हिंदू-मुस्लिम केलं तरीदेखील माणुसकीचा ओलावा अजुनही शाबुत आहे. दिल्लीच्या घटनेला धर्माचे रंग देणाऱ्या अशा तथाकथित लोकांना ही माणुसकीची सणसणीत चपराकच म्हणावी लागेल.

Delhi Riots Chand bagh Courtesy : Social Media

घटना आहे नवी दिल्लीतील चांदबाग जिल्ह्यातील एका मुस्लिम बहुल भागात राहणाऱ्या हिंदू मुलीची. या आठवड्यात दिल्लीमध्ये काही भागात तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे मुस्लिम बहुल भागात राहणाऱ्या एका हिंदू कुटूंबातील 23 वर्षीय सावित्री प्रसाद हिला आपलं लग्न रद्द होण्याची चिंता सतावत होती. सोमवारी संध्याकाळी २४ फेब्रुवारीच्या दिवशी दिल्लीतील परिस्थिती अधीकच चिघळली होती आणि २५ फेब्रुवारी (मंगळवार) हा तिच्या लग्नाचा दिवस. तरीदेखील सोमवारी संध्याकाळी हिंदू परंपरेनुसार सावित्रीचे रीतिरिवाजाप्रमाणे हात मेंहंदीने भरले होते. शरीर हळदीने रंगून गेलं होत. दुसरा दिवस नव्या आयुष्याची सुरवात करणारा होता. दिल्लीच्या या सर्व घटना बघून मनात चलबिचल होत असल्याने ती काळोखी रात्र तिने काढली. दुसरा दिवस २५ फेब्रुवारी (मंगळवार) हा तिच्या लग्नाचा दिवस. सकाळी या दंगलीची लाट तिच्या घरापर्यंत आली. घराबाहेर हिंसक जमावाने सर्व वस्ती घेरलेली होती. मनामध्ये सुरु असलेली चलबिचल अखेर समोर प्रत्यक्षात घडत होती. लग्नाचा दिवस असल्यामुळे नवीन साडी परिधान करून, हातावर काढलेल्या त्या सुरेख मेंहंदीकडे बघत ती रडत होती. एका क्षणात या आनंदावर विरजन पडलं होत.

मंगळवारचा दिवस सरताना सकाळपेक्षा परिस्थिती वेगळी होती. मात्र अजूनही मनामध्ये मुस्लिम बहुल भागात राहत असल्यामुळे धाकधूक होतीच. सावित्री प्रसाद हीच्या वडिलांनी मंगळवारी संध्यकाळी हिम्मत करून ही सर्व गोष्ट तिथल्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम लोकांच्या कानावर घातली. त्यांच्यासोबत चर्चा करून अखेर मंगळवारी रात्री सावित्रीचं लग्न २६ फेब्रुवारी (बुधवारी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मुस्लिम शेजाऱ्यांनी सावित्रीच्या वडीलांना लग्नाचं नियोजन करण्यास सांगितलं. त्या दिवशी एकीकडे दिल्लीत हिंसाचार उसळत होता तर, दुसरीकडे सावित्री प्रसाद हिचा लग्न मुस्लिमांच्याच उपस्थितीत पार पडत होता.

"माझ्या मुस्लिम बांधवांनी आज माझे रक्षण केले आहे," सावित्रीने लग्न सोहळ्याच्या दिवशी या सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. जेव्हा रॉयटर्सची टीम सावित्रीच्या लग्नाच्या दिवशी तिच्या घरी गेली तेव्हा तिने ही सर्व कथा सांगून आभार मानले. चांदबाग जिल्ह्यातील एका इमारतीमध्ये सावित्रीचा लग्न समारंभ पार पडला.

"आम्ही मुस्लिमांसमवेत बरीच वर्षे या भागात वास्तव्य केले आहे. याआधी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. हिंसाचारामागचे लोक कोण आहेत हे आम्हाला अजुन माहिती नाही, परंतु ते माझे शेजारी नाहीत. इथं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कोणतेही वैर नाही" असं सावित्रीचे वडील भोदय प्रसाद यांनी सांगितलं. या लग्नासाठी सर्व मुस्लिम एकत्र येऊन त्या सर्वांच्या साक्षीने सावित्री प्रसाद हिचं लग्न झालं.

सावित्रीला याबद्दल सांगितलं की, "आम्हाला बाहेर खूप गोंधळ ऐकू आला, पण दुसर्‍या दिवशी परिस्थिती चांगली होईल या आशेने मी मेंहंदी लावली होती. त्या दिवशी घरी राहायला देखील भीती वाटत होती."

"लग्नाच्या दिवशी ती रडत होती हे बघून आम्हाला वाईट वाटलं, लग्नाच्या दिवशीच असं दुःख पाहायला कोणाला आवडेल?" समीना बेगम या सावित्रीच्या मुस्लिम शेजार्‍यांपैकी एक.

"हिंदू -मुस्लिम, आपण सर्व एक आहोत मात्र या आठवड्यात घडलेल्या घटना पाहून आम्ही सर्व घाबरलो होतो. हा धार्मिक लढा नव्हता पण तो तसा केला गेला." असं सावित्रीची बहीण पूजा हिने सांगितलं.

तिथे राहत असलेल्या आमिर मलिक यांनी सांगितलं "आम्ही अनेक वर्ष इथल्या हिंदू बांधवांसोबत राहत आहोत. आम्ही त्यांच्यासाठी सर्व काही आहोत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी येथे आहोत."

शेवटी भोदय प्रसाद म्हणाले, या सर्व परिस्थितीमुळे “आज आमच्यातील कोणीही नातेवाईक माझ्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. पण आमचे मुस्लिम शेजारी इथे आहेत. ते आमचे कुटुंब आहेत."

... लवकरच दिल्ली पूर्वपदावर येईल आणि हा एकोपा संपू नये हीच आशा

( सदर वृत्त Reuters या वृत्त संस्थेने दिलं आहे )

Updated : 28 Feb 2020 6:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top