डेडली डेंग्यू!
X
डेंग्यूने सगळीकडे अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आणि काळजीचं कारण म्हणजे ,अलीकडील दोन वर्षात डेंग्यू झाल्यानंतर त्याच्या कॉम्प्लिकेशनमुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढले आहे. कदाचित डेंग्यूच्या विषाणूमध्ये जनुकीय बदल(जेनेटिक म्युटेशन) होऊन त्याचा विखार( व्हीरुलन्स) वाढला असण्याची शक्यता आहे.
डेंग्यूमध्ये पहिले पाच दिवस खूप जास्त ताप,अंगदुखी,डोकेदुखी,रॅश,सांधेदुखी असते. त्यानंतर ताप कमी होतो, पण साधारण पाच टक्के पेशंटना काही सिरीयस कॉम्प्लिकेशन्स संभवतात . डेंग्यूचा विषाणू खूप मोठ्या प्रमाणात टॉक्सिन्स तयार करतो आणि त्यामुळे शरीरातील जवळजवळ सगळ्याच अवयवसंस्थांचा दाह होतो.
शरीरातील द्रव कमी होणे(डीहायड्रेशन)रक्त गोठवणाऱ्या पेशी(प्लेटलेट्स)कमी होणे आणि त्यामुळे आतड्यात,मेंदूत,फुफ्फुसात रक्तस्त्राव होणे, किडनी निकामी होणे,छातीत पाणी भरणे,हृदयाच्या स्नायूंचा दाह होणे,मेंदूच्या आवरणाचा दाह होणे,बीपी कमी होणे इत्यादी
हे कॉम्प्लिकेशन्स कोणामध्येही होऊ शकतात,पण लहान मुले,गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये जरा जास्त शक्यता असते.
डेंग्यूच्या विषाणूच्या चार प्रजाती आहेत. एकदा डेंग्यू होऊन गेल्यानंतर परत दुसऱ्या प्रजातीच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर आधीच्या विषाणूविरुद्ध तयार झालेली प्रतिकारशक्ती नवीन प्रजातीवर अटॅक करत असताना आपल्या नॉर्मल पेशींवरसुद्धा हल्ला चढवते ,दाह करते आणि त्यामुळे रुग्णास जीवास धोका संभवतो. आपण काय करू शकतो या साथीमध्ये?
डेंग्यू एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्याने होतो,हा डास स्वच्छ साठलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि तिथेच त्याची प्रजा वाढते,हा डास दिवसा चावतो आणि गुढघ्याखालील उघड्या त्वचेला चावतो. पहिली गोष्ट डास चावू नयेत म्हणून रिपेलंट ,मच्छरदाणी,धूर निर्माण करणाऱ्या कॉईल्स वापरणे.हात पाय झाकले जातील असे कपडे,आणि पायमोजे वापरणे.
जास्त ताप आणि अंगदुखी असल्यास त्वरित रक्ताची तपासणी करणे,वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वेदनाशामक म्हणून सर्रास वापरले जाणारे डायक्लोफेनॅकचे एक इंजेक्शनसुद्धा रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरु शकते. पहिल्या पाच दिवसात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते,या साठी खूप द्रवपदार्थ शरीरात जाणे गरजेचे असते,पाणी,फळांचा रस,शहाळे,सूप असा आहार आणि तोही साधारण चोवीस तासात तीन ते चार लिटर असा द्यायला हवा.
रुग्णास उलटी किंवा पातळ संडास होत असल्यास सलाईन देणे गरजेचे असते.या सलाईन चढवण्यामागेही एक शास्त्र असते.पेशंटच्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी सांभाळत, फ्लूईड ओव्हरलोड न होऊ देता हे सलाईन द्यावे लागते.
फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे ते विषाणूने सोडलेल्या टॉक्सिन्सना निष्प्रभ करतात.
प्लेटलेट वाढवण्यासाठी काही विशीष्ट फळे उपयोगी आहेत असे साधारण म्हणले जाते,पण तसं काही संशोधनातून सिद्ध झालेले नसल्याचे फिजिशियन्स सांगतात.
आणि प्लेटलेटचा काऊंट अगदी 10,000पर्यंत जाईपर्यंत प्लेटलेटच्या पेशी चढवण्याची गरज नसते. तिकडे सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी डासांची पैदास रोखण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे.त्यांनी प्रयोगशाळेत अब्जावधी नवीन डास तयार करून ते सगळीकडे मुद्दाम सोडलेत.
आश्चर्य वाटलं ना?
हे डास न चावणारे आहेत,आणि ते नपुंसक आहेत,त्यामुळे इतर डासांशी संयोग झाला तरी ते डास पुनरुत्पादन करू शकत नाहीत.प्रयोगशाळेत तयार केलेले हे डास बाहेर सोडल्यानंतर डासांच्या पूर्ण प्रजातीलाच नामशेष करत आहेत.
आपल्याकडे हे असे काही करणे गरजेचे नाही का?
व्हायरॉलॉजीमध्ये (विषाणूशास्त्र)खूप संशोधन करणे गरजेचे आहे.पण धर्मजातीअस्मितावादाचा संसर्ग झालेल्या आपल्या भारतीय समाजातून संशोधन हा प्रकार खूपच दुर्लक्षित राहिलेला आहे.
आणि वाईट याचं वाटतंय की ,ह्या आजारामुळे तरुणवर्गाचे इतके कामाचे तास बुडत असताना,हजारो कुटुंबांवर मानसिक आर्थिक ताण येत असताना आपल्या एकाही लोकप्रतिनिधी ला याची फिकीर आहे असे वाटत नाही.
मलातरी सध्या डेंग्यूच्या प्रतिबंध आणि उपचाराबाबत खूप मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता वाटली म्हणून हा लेखन प्रपंच..
https://youtu.be/cH57Oo-FYQ8