CoronaVirus: मुंबई पोलिसांना जेवणाच्या डब्यातून येणारं ‘ते’ भावनिक पत्र...
X
कॉन्स्टेबल सोमनाथ सिंग राजपुत कल्याण पश्चिम येथे वास्तव्यास आहेत. मुंबईच्या गोवंडी पोलिस स्थानकात सध्या आपली ड्युटी बजावतायत. सध्या त्यांची ८ वर्षाची मुलगी प्राची हिचं बाबांसाठी लिहलेलं पत्र खुप व्हायरल होत आहे. या पत्रातील मुलीची आपल्या बाबांना भेटण्याची तळमळ खुपचं जिव्हारी लागते.
प्राची राजपुत ही ८ वर्षाची मुलगी आहे. दुसरीच्या वर्गात शाळेत आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधी पासून या बाप लेकीची भेट झालेली नाही. या पत्रात प्राचीने ‘माझे बाबा घरी येत नाहीत. बाबा माझं ऐका प्लीज घरी या.’ असं लिहलंय. हे पत्र राजपुत यांच्याकडे गावाकडून मुंबईत फळ विक्रीसाठी येणाऱ्या ट्रक चालक मित्राने पोहचवलं. लेकी इतकीच या बापालाही आपल्या मुलीला भेटण्याची तळमळ लागली आहे. मात्र, कर्तव्य बजावण्यासाठी राजपुत आपल्या भावनांना दडपत आहेत.
कोरोनाच्या संकटाची चाहूल लागलेली असतानाच राजपुत यांनी परिस्थितीचा आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा अंदाज घेत त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींची रवानगी गावी केली. यानंतर त्यांची भेट केवळ फोनवर बोलताना आणि व्हॉट्सएप कॉलींगच्या माध्यामातून होत असते. फोनवर त्यांच्या दोन मुलींचं रडणं, बाबाची वाट पाहत असल्याचं सांगणं त्यांच्याही काळजाचा ठोका चुकवत.
राजपुत सांगतात की, “आम्हाला आमच्या कुटुंबाला पाहायलाही मिळत नाही. फक्त फोनवर बोलताना माझ्या काळजीने त्यांच्या रडण्याचा आवाज आणि लवकर घरी येण्याची कळकळ ऐकू येते. मग जर लोकांना स्वत:च्या कुटुंबासोबत राहता येतंय. मग घरातून बाहेर पडायची काय गरज आहे. घरात आपल्या कुटुंबासोबत राहा.” अशी कळकळीची विनंती ते करत आहेत.
राजपुत पुढे भावनिक होत म्हणाले, “काही लोकांना वाटतंय की कधी लॉकडाऊन संपेल आणि आम्ही घराबाहेर पडू पण, आम्ही विचार करतोय की कधी एकदा लॉकडाऊन संपेल आणि कमीत कमी एकदा तरी घरी जाऊ.” असं म्हणत त्यांनी पुर्ण पोलिस खात्याची व्यथा माडंली आहे.
राजपुत यांची ८ वर्षाची चिमुकली आपल्या वडिलांबरोबर फोनवर बोलताना बाबांना फक्त घरी कधी येणार हा एकच प्रश्न विचारत असते. मात्र, या प्रश्नाचं उत्तर फक्त आपण सामान्य नागरिकांच्याचं हाती आहे. आपल्या सारखे सुजाण नागरिक घरात सुरक्षित राहुन कोरोनाशी लढा देतील तरच या गोष्टी शक्य आहेत.
आज राज्याभरात असेच कित्येक राजपुत कोरोनाला पराभूत करण्यासाठी चौकाचौकात, गावकुसाबाहेर गस्त घालत आहेत. त्यांची मुलंही अगदी प्राची सारखाचं प्रश्न आईला विचारत आहेत. बाबा घरी कधी येणार. आपण घरात राहिलो तरचं अशा कित्येक बाप लेकींची भेट लवकरात लवकर होणं शक्य आहे. नाही तर आपल्यामुळे या चिमुकल्या प्राचीला पुन्हा आपल्या बाबाला असं पत्र लिहावं लागेलं.