कंगना समोर महिला आघाडी फेल
X
कंगना राणावत (kangana ranaut) मुंबईत आली, ती तिच्या घरी गेली, दुसऱ्या दिवशी तिच्या तुटलेल्या ऑफिसची पाहणी ही तिने केली. या संपूर्ण काळात ट्वीटरवर तिने उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी थेट पंगा ही घेतला. सध्या मुंबईमध्ये ऐ उध्दव असं म्हणत उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या (shiv sena) दहशतीच्या राजकारणाला चॅलेंज देणारे दोन लोकं चर्चेत आहेत. कंगना आणि अर्णब यांनी शिवसेनेला थेट चॅलेंज दिलंय. आपल्या हातात असलेल्या माध्यमांचा, साधनांचा आणि राजकीय पाठबळाचा पुरेपूर वापर करून त्यांनी आपला आवाज चढता ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणात पक्ष म्हणून शिवसेना हतबल दिसतेय. कंगना प्रकरणानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणातील महिलांचा सर्वांत सक्रीय फ्रंट असलेली शिवसेना महिला आघाडी मात्र फेल झाल्याचं दिसतेय.
महिला आघाडीचं नेतृत्व कोण करतंय?
शिवसेनेने आक्रमक अशी महिला आघाडी तयार केली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या आक्रामक मानल्या जातात. आजपर्यंत अनेकदा सत्तेशी टक्कर द्यायचं काम त्यांनी केलं आहे. काँग्रेसचं सरकार असताना मुंबईबाबत राहुल गांधीनी (rahul gandhi ) केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना पोलीसांच्या लाठ्या खात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत असताना महिला आघाडीच्या कार्यकर्तीचा डोळा फुटला होता. इतकी आक्रमक महिला आघाडी कंगना प्रकरणावर मात्र फेल झालेली दिसली. महिला आघाडीचं नेतृत्व नेमकं कोण करतंय, इतर पक्षांप्रमाणेच फक्त व्होट बँक साठीच ही आघाडी आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रियांका चतुर्वेदी नेमकं काय करतात…
रस्त्यावर लढणाऱ्या आक्रामक महिला नेत्यांना डावलून शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांना राज्यसभेची तिकीट दिली. कंगनाचं संपूर्ण युद्ध सोशल मिडीयावर सुरू आहे. शिवसेनेतील एका ही महिला नेत्याकडे सोशल मिडीयावर इतकं फॉलोईंग नाही. त्यातल्या त्यात प्रियांका चतुर्वेदी यांना मात्र सोशल मिडीयाची ही भाषा माहित आहे, त्याचा वापर कसा करायचा हे ही माहित आहे. प्रियांका चतुर्वेदी यांचं बॉलीवूड कनेक्शन ही चांगलं आहे. मग अशा वेळी राज्यसभा मिळालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आवाज का नाही उठवला, त्यांनाच का नाही बोलायला सांगितलं असा प्रश्न महिला आघाडीत चर्चिला जात आहे. सत्तेची पदं वाटायला ग्लॅमरस चेहरे हवे असतील तर मग लढायचं काम ही त्यांनाच दिलं पाहिजे ही सामान्य शिवसैनिकांची भावना आहे. केवळ याच मुळे रस्त्यावर संघर्षरत असलेले अनेक हाडाचे शिवसैनिक कंगना प्रकरणात शांत बसून आहेत. मातोश्रीवरून आदेश आला की हाल-चाल करू, बाकी पक्ष आणि नवीन सल्लागार बघून घेतील अशी शिवसैनिकांमध्ये भावना आहे.
नवीन वॉरफेअर मध्ये महिला आघाडी अपयशी
सध्या शिवसेनेला सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेजार करण्याचं काम सुरू आहे. दररोज उध्दव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ट्रेंड चालवले जातात. नाही म्हणायला संजय राऊत हे या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत असतात. असं असलं तरी सध्या या लढाईत कंगना राणावत ला सोशल मिडीयावर जास्त प्रतिसाद मिळत आहे. तिच्यामागे रिसर्च ची मोठी टीम काम करत आहे असं एकूणच तिच्या ट्वीट आणि फेसबुक पोस्ट वरून दिसतंय. महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतिकं वापरायची आणि प्रश्न विचारून छेडत राहायचं असा उपक्रम कंगनाने चालवला आहे. अनेकवेळा तर संजय राऊतांना ही तिने चीत केलेले आहे. अशा वेळी या नवीन वॉरफेअर मध्ये सोशल मिडीया स्ट्रॅटेजीचं ज्ञान असलेली एकही महिला नेता मैदानात उतरू शकली नाही, कंगना ला उत्तर देऊ शकली नाही हे वास्तव आहे. महिला आघाडी केवळ शोभेच्या आघाडी बनून राहिलीय की काय, असा प्रश्न मला आता पडायला लागला आहे.
शिवेसनेने सत्ता आहे म्हणून संयम बाळगला असं स्पष्टीकरण हल्ली दिलं जातंय. पण ते ही काही योग्य स्पष्टीकरण नाही. सध्या कंगनाची तोड शिवसेनेकडे नाही, म्हणून तिचं ऑफिस तोडायचा प्रकार शिवसेनेनं केला. संयम असता तर हे काम ही शिवसेनेनं केलं नसतं. कंगनाच्या मागे प्रचंड मोठी स्ट्रॅटेजी आणि रिसर्च उभा केलेला आहे. शिवसेना मात्र अजूनही चाचपडताना दिसतेय. प्रियांका चतुर्वेदी सारखे प्रयोग करून शिवसेनेने आपल्या आक्रमक आघाडीचे दात आणि नखचं काढून घेतलीयत.