बाळाला बॅगवर झोपवून प्रवास करणाऱ्या आईकडे बघून सरकारला जाग येईल का?
X
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एक आई तिच्या लहान मुलाला बॅगवर झोपवून ती बॅग ओढत आपल्या गावाकडचा रस्ता कापताना दिसत आहे. हे हृदयद्रावक दृश्य़ पाहिल्यानंतर देशभरात मजूरांच्या या कठीण परिस्थितीवर दु:ख व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ पंजाबमधून उत्तरप्रदेशच्या झांसीपर्यंत पायी प्रवासाला निघालेल्या मजूरांचा आहे.
हे ही वाचा...
- ''कधी पर्यंत आमदार विकत घेऊन सरकार बनवणार?', विद्या चव्हाणांचा घणाघाती टोला
- पंकजा मुंडे, खडसे, तावडे यांच्या तगमगीतून भुकंपाची वात पेटू नये- सामना
- Lockdown 4.0 : राज्यांनी केंद्र सरकारला सांगितल्या 'या' गोष्टी
असे लाखो कामगार आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रवासात अनेक अडचणी आहेत. आपल्या लहान मुलाबाळांना, पत्नीला, बहिणीला सोबत घेऊन रात्रीच्या काळोखात हे मजूर जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. कोणी खांद्यावर आपल्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन चालतो आहे. जे अन्न सोबत घेतलं होतं ते संपलं आहे आणि वाटेत कोणी मदत करण्यासाठी म्हणून उभा आहे का याची वाट पाहत रस्ता कापत आहेत. शहरात भुकेने मरण्यापेक्षा गावी जाऊन आपल्या लोकांमध्ये आपल्या मातीत मेलेलं बेहत्तर अशी त्यांची भोळी आशा आहे.
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही हा व्हिडीओ शेअर करत मजुरांना होणाऱ्या यातनांवर दु:ख व्यक्त केलं आहे. अशा लहान मुलांचा आणि महिलांचा आपल्या घरी जाण्यासाठी चाललेला संघर्ष पाहून उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाला त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारने स्थलांतरीत प्रवाशांसाठी रेल्वे आणि बससेवा सुरु केली असली तरीही प्रवासाचं टिकीट या गरिबांच्या खिशाला न परवडणारं आहे. सोबतच कागदपत्रांची पुर्तता करणं आणि वेगवेगळ्या परवानग्या मिळवणं यावेळी मजुरांना अशक्य असल्याचं अनेक पायी चालत जाणाऱ्या मजुरांनी सांगितलं आहे.