CoronaVirus: मास्क कोणी, कसं आणि का घालावं?
X
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये एकच चित्र पहायला मिळतय. रस्त्यावरून चालणारा प्रत्येक व्यक्ती हा मास्क घालून फिरताना दिसतोय. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, बेस्ट बसमधून प्रवास करणारे, जवळपास सर्वच तोंडाला मास्क लावून बसलेले पहायला मिळतायत.
कोविड-१९ म्हणजे कोरोना या आजारामुळे भारतात रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचलीये. लोकांच्या मनात भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे. आपल्याला कोरोना होईल या भीतीने सर्व प्रवासी मास्क वापरण्याची खबरदारी घेत आहेत.
- मुंबईच्या 'या' १० खाजगी रुग्णालयात आहे कोरोना वॉर्ड
- कोरोना व्हायरस: आता तरी ‘सिरीअस’ होऊया…!
- कोरोनाची सुट्टी... सोनाली कुलकर्णी आणि मुलीची उद्योग मालिका
मात्र, या मास्क वापरणाऱ्यांच्याही भारीच तऱ्हा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने अनेक फॅन्सी मास्कही पाहायला मिळत आहेत. आपण वापरत असलेल्या मास्कने खरंच कोरोना विषाणूपासूुन संरक्षण होणार आहे का? याविषय़ी नागरिक पुर्णपणे अनभिज्ञ आहेत.
मास्क लावून कोरोना व्हायरसपासून संरक्षण होईल हे खरं आहे पण, तो मास्क कोणता असावा? मास्कचा वापर कसा करावा? मास्क कोणी वापरावा? याची माहिती घेणं आवश्यक आहे.
सध्या वापरात असणारे मास्कचे प्रकार आणि उपयुक्तता
- रुमाल
आपण भारतीय मास्क म्हणून रुमालाचाच सर्रास वापर करतो. त्यातही सफेद रंगाचा रुमाल वापरल्यास रोगापासून आपण दूर राहू अशी धारणा असते. खरं तर हा रुमाल आपण हात पुसुन, तोंड पुसुन मग विषाणूपासून संरक्षणासाठी थेट तोंडावर बांधतो आणि एकप्रकारे विषाणूंना मोकळी वाट देतोय. मास्क म्हणून रुमालाचा वापर करण्यापेक्षा तो न वापरलेलाच अधिक बरा.
- फॅन्सी मास्क
या मास्कमुळे विषाणूंपासून सुरक्षित राहण्यापेक्षा धोका अधिक आहे. असे मास्क मेडीकल मधून न घेता रोडसाईड मार्केटमधून घेतलेले असतात. हे मास्क आपण बरेच दिवस वापरतो जे फारच घातक आहे. बऱ्याच वेळा मास्कला काढून घालून आपण रोगाला नकळत आमंत्रण देत असतो. त्यामुळे असे मास्क वापरणे टाळले पाहिजेत.
- सर्जिकल मास्क
या प्रकारचं मास्क रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि रुग्ण वापरतात. हे मास्क आतल्या आणि बाहेरच्या सर्व विषाणूंपासून संरक्षण करतात. परंतु हे मास्क ३ ते ८ तासांहून अधिक काळ वापरणे योग्य नसते. मात्र, आपण या मास्कचा चा सर्रासपणे २-३ दिवस तरी वापर करतो. त्यामुळे या मास्कची योग्यवेळी योग्यपद्धतीने विलेहवाट लावणं आवश्यक आहे.
- N95 मास्क
या प्रकारचं मास्क कोरोना विषाणूंपासून बचावासाठी उपयुक्त असते. याच कारण म्हणजे हे मास्क नाक आणि तोंड पुर्णपणे झाकून घेते. तसेच अती लहान विषाणूंच्या कणांनाही म्हणजेच हवेतील ९५ % कणांना रोखण्यासाठी सक्षम आहे. म्हणूच या मास्कला N-95 म्हटलं जात. परंतू कोरोनाचे विषाणू ०.१२ माइक्रॉन इतके लहान असल्याने या मास्कलाही काही मर्यादा आहेत.
- गॅस मास्क
या प्रकारचे मास्क हे कोणत्याही विषाणू कणांपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. गॅस लीकेज सारख्या गंभीर परिस्थितीत हे मास्क वापरले जातात. हे मास्क तुम्हीही नक्कीच वापरु शकता मात्र, तुम्हाला दहशतवादी समजलं जाण्याची शक्यता जास्त आहेत.
मास्क कोणी वापरावा?
- सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडथळा असणाऱ्या व्यक्तींनी
- कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी
- संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत असलेल्यांनी
- श्वसनाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्स, डॉक्टरांनी
मास्क कसं वापरावं?
- किमान सहा तासांनी मास्क बदलावं
- मास्क लावल्यानंतर त्याला हात लावू नये
- मास्क काढताना बाहेरील बाजूला स्पर्श करू नये
- गळ्याभोवती मास्क लटकवून ठेवू नये
- मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धूवून घ्यावे
ही माहिती तुमच्या आप्तजनांपर्यंत पोहोचवा आणि कोरोनापासून दुर रहा.