..तर लोक कोरोनाने नाही पण भूकेने मरतील
X
असं म्हणतात की, दुसरं महायुद्ध हे पहिल्या महायुद्धापेक्षा भयंकर घातक होतं. पण आजचं हे कोरोना युद्ध दुसऱ्या महायुद्धापेक्षाही घातक ठरणार असे दिसुन येत आहे. कारण यात अख्खं जग या कोरोनाच्या विळख्यात इच्छा नसताना अडकत चाललयं. संकटं नैसर्गिक असली काय किंवा मानवनिर्मित असली काय पण याचा परिणाम हा गरीब आणि श्रीमंत सर्वांवर होत असतो.
आज याच कोरोना युद्धाशी संपुर्ण भारत देश लढा देतोय. इथे कुठल्याही बंदुका, बाँम्ब, रणगाडे अशा युद्धसामग्री नाहीत. या युद्धात डॉक्टर, नर्स आणि पोलीस यंत्रणा चार हात करत आहेत. नागरिकही आपली कर्तव्य निभावत असताना सरकारला सहकार्य करत आहेत. महाराष्ट्र सरकार ही प्रयत्न करत आहे पण, या परिस्थितीचा विचार करता कोरोनामुळे भंयकर परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही हे चित्र स्पष्ट दिसत आहे.
■स्थलांतरांची समस्या
मुंबई आणि पुणे या दोन शहरात राज्यातील अनेक खेडेगावातुन मोठ्या प्रमाणात माणसं कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. या कामगारांच्या जीवावर ही शहरं वेगाने धावत आहेत. त्यांच्याही हाताला काम मिळालं आणि चांगला रोजगारही मिळाला. मात्र, आज हाच कामगार वर्ग कोरोनाच्या भीतीने पुन्हा खेड्याकडे धावतो आहे. त्यांना रोजगाराचं साधन नाही. हातावर पोट चालवणाऱ्या या कामगारांना बिनारोजगार शहरात राहणं अशक्य आहे.
कोरोनाने शहर बंद पाडली आणि रोजगार गेले. भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांना घरभाडे फुकट भरण्याची वेळ आली. त्यात गावाकडे परतताना पुणे- मुंबई वरून खाजगी ट्रँव्हल्स वाल्यांनी प्रत्येक माणसामागे २००० ते ३००० हजाराची लूट लावली आहे.
माजलगाव मधील सादोळा, हिवरा, केसापुरी कँम्प या गावात पुणे- मुंबई वरून मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाली. सरकारी कर्मचाऱ्यांनी यांच्या नोंदीही घेतल्या आहेत. आरोग्य अधिकारी तपासण्याही करत आहेत. शहरातून आलेल्या लोकांमुळे कोरोनाची लागण होईल अशी भीती गावकऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या जवळपासही कोणी भटकायला तयार नाही. खरोखरीच यांच्य़ामार्फत कोरोनाचा फैलाव झाला तर आरोग्य यंत्रणा अशा गरीब लोकांसाठी महागड्या टेस्ट आणि औषधोपचार करण्यासाठी सज्ज आहे का?
■खेडेगावात काम शोधावं बीड जिल्हाधिकारी
याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, सरकारच्या अशा काही सुचना नसल्याचे सांगत गावात लोकांनी रोजगार शोधावा असं म्हटलं आहे. मात्र प्रत्यक्षात उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीची सगळी काम झाली आहेत. अशा स्थितीत कायमचे गावकरी आणि स्थलांतरित कामगार वर्ग यांना काम मिळणं फारचं अवघड आहे.
एका घरात ८ ते १० माणसं असल्याने अन्नधान्य कमी पडत आहे. किराणा आणि अत्यावश्यक दुकाने उघडी आहेत असं सरकार जरी म्हणत असलं तरी सामान घेण्यासाठी हातात पैसे नसल्याने लोकं परेशान आहेत. तसेच घरातुन लोक बाहेर पडत नसल्याने ऑटो वाल्यांचेही धंदे बंद आहेत.
हातावर पोट असणाऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एक दोन महिन्यांचं राशन, किराणा सामान श्रीमंत नोकरदार लोकांनी भरून ठेवलं आहे. पण विधवा, जेष्ठ नागरिक, गंवडी काम करणारे मिस्त्री, घरेलु कामगार या लोकांकडे पुरेसा पैसा नसल्याने ते अन्नधान्य खरेदी करू शकत नाहीत.
■१९७२ च्या दुष्काळापेक्षा करोना भयंकर ठरू शकतो
१९७२ च्या दुष्काळाच्या झळा भोगणारी काही माणसं आजही गावात त्यांच्या कटू आठवणींसह जगतायत. त्यापैकीच एकनाथ सुरवसे, जमुनाबाई धबाले, राधाबाई चांदमारे यांनी आपले त्या दुष्काळातले अनुभव सांगितले. तो भयंकर दुष्काळ होता. लोकांना कामं नव्हती. गरीब लोकं उपाशी मरत होते. तेव्हा रानातील बरबड्याच्या भाकऱ्या,सराट्याची भाजी कधीकधी तरवटाच्या भाजीचे, कुंजीर, तांदुळ, भाजीचे पिळे खात असत. पिठाच्या गिरणीतील पडलेलं धान्य वेचुन आणत. त्याच्या कन्या जात्यावर भरडून खात असत. ही परिस्थिती बघुन सरकारने चऱ्याची कामं (कॅनल खंदण्याची) लोकांना उपलब्ध करून दिली होती. यात खायला सुगडीचा एक डब्बा आणि दिड रुपया रोजगार दिला जायचा. तसेच राशन दुकानावर नऊवारी लुगडं आणि धोतर कमी पैशात दिलं जात असे आणि लोकांकडून कष्टाची कामे करून घेतली जात.
पण आज धान्य उपलब्ध असले तरीही मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाली आहेत. लोकांचे रोजगार सुटले आहेत यामुळे पैसे नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली तर गरीब लोक घरात भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं बरं असं म्हणत घराबाहेर पडतील.
■ सरकारने गरीबांना राशनची सोय करावी
कोरोना व्हायरस दिवसागणिक रौद्र रुप धारण करतोय. या परिस्थितीत कर्फ्यू अधिक दिवस लांबण्याचे संकेत दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने राशन दुकानावर अन्नधान्य, कडधान्य, तेल, मीठ लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. अन्यथा लोकं करोना ने नाही तर भुकेने मरतील.
■राजकीय,दानशूर सामाजिक कार्यकर्ते यांनी गरीबांना अन्नधान्य मदत करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था बीड च्या वतीने आम्ही करत आहोत.
सत्यभामा सौंदरमल
निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था बीड