Corona Virus: आरोग्यमंत्री पोहोचले थेट सीएसएमटी स्थानकात
X
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढेतय. सध्या राज्यात 64 रूग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांना गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. यासंदर्भात माय मेडिकल मंत्रा ने वृत्त दिलं आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध आखून दिले आहेत. सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीएसएमटी स्थानकाला भेट देत रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असं आवाहन केलं आहे.
पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “कोरोनाच्या भीतीने लोकं आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अनेक ठिकाणी गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी करताना दिसत आहे. ही गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचं आहे. त्याचशिवाय ज्यांना होम कॉरंटाईन सांगण्यात आलं आहे त्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरू न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.”