Home > Max Woman Blog > Corona : 'कॅलिफोर्नियामधला कोरोना' ! With अभिनेत्री अश्विनी भावे

Corona : 'कॅलिफोर्नियामधला कोरोना' ! With अभिनेत्री अश्विनी भावे

Corona : कॅलिफोर्नियामधला कोरोना ! With अभिनेत्री अश्विनी भावे
X

प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे गेली अनेक वर्षे कॅलिफोर्नियात तिच्या लग्नानंतर राहतेय, पण अमेरिकेत राहूनही भारतात तिचं अभिनय करियर छान सुरु आहेच. सध्या 'voot select च्या 'रायकर केस ' ह्या वेब शो मध्ये अश्विनीने 'साक्षी रायकर 'ची व्यक्तिरेखा निभावलीये त्या भूमिकेसह ह्या मुलाखतीत तिने कॅलिफोर्नियामधील 'कोरोना 'चे दिवस देखील वर्णन केले आहेत.

अश्विनी, तुझ्या विवाहानंतर तू अनेक वर्षे अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहतेस. भारतात, इथे मुंबईत जे रिपोर्ट्स आलेत त्यात अमेरिकेत कोरोनाने उच्छाद मांडलाय. पण तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? सगळंच लॉक डाऊन केलं आहे का? अमेरिकेने फार नंतर प्रिकॉशन घेण्यास सुरुवात केली असं वाटलं !

'अश्विनी -कॅलिफोर्नियामध्ये सध्या सगळंच बंद आहे.. पण इथल्या गव्हर्नर गेविन नुसम यांनी खबरदारी म्हणून कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याआधीच खबरदारीचा उपाय म्हणून लोकवस्त्या-शाळा-ऑफिसेस सार्वजनिक स्थळं-पार्क्स गार्डन्स, शॉपिंग मॉल्स आदि क्वारंटाईन केलं आहे. गव्हर्नरने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव होण्याआधीच सतर्कता अंमलात आणली म्हणून अन्यथा अनेक रुग्ण वाढले असते ! इथला प्रत्येक नागरिक सोशल डिस्टनसिंग काटेकोरपणे पाळतोय. आम्ही म्हणजे मी, माझा नवरा, मुलगा आणि मुलगी आम्ही चौघं नियमांची अंमल बजावणी करतो. जी केलीच पाहिजे .इथे काही अंतरावर नातेवाईक, फ्रेंड्स सर्कल आहेत पण त्यांना आम्ही भेटण्यास जात नाही. फोनवर बोलतो, आणि संपर्कात राहतो . क्वारंटाईन कालावधीत कुणाकडेही मदतनीस -सहाय्यक -मोलकरीण नाहीत, अन्यथा घरी कुणी मदतीला येते.

सकाळी उठून घर स्वच्छ करण्यापासून न्याहारी, कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत अखंड काम चालूच असते. एक ना दोन लॉक डॉऊन काळात अनेक अडचणी आहेत, जग थांबल्यासारखं झालंय ,पण मी ह्यातूनही सकारात्मकता पाहते.. घरच्या सदस्यांना ह्या काळात छान शिस्त लागलीये . आपापल्या रूम्समध्ये रिडींग -चॅटिंग किंवा आपल्या विश्वात रमणाऱ्या दोन्ही मुलांना मी निक्षून सांगून ठेवलंय, लंच आणि डिनरच्या वेळेला खाली येऊन डायनिंग टेबलवर आला नाहीत तर नंतर वाढणं -अन्न काढून ठेवणे, भांडी घासणं ही जवाबदारी माझी नसणार आहे ! त्यामुळे ठराविक वेळेस कामं होतात, मलाही माझा 'मी टाइम' मिळतो. किमान एक तास मी योगा करतेच. व्यायाम -योगा, श्वसनाचे व्यायाम अनेक वर्षे करतेय. मला गार्डनिंग खूप आवड आहे . गार्डनिंगमध्ये मी स्वःताला हरवून जाते. शिराळ, दोडकी, कारली, फरसबी, दुधी भोपळा ,मुळा पालक, मेथी अशा अनेक भाज्या मी लावल्या आहेत. फुलझाडं आहेत. दिवसाचे २४ तास अपुरे पडावेत इतके व्याप आहेत, मी त्यात स्वेच्छेने गुंतलेय..

माझ्या १२वीत असलेल्या मुलाने कालच एक पनीर डिश बनवली होती, त्यांचं सगळं जीवन अमेरिकेत गेलंय, आणि म्हणून तो जेंव्हा किचनमध्ये ओवा शोधत होता तेंव्हा मला आश्र्चर्य वाटलं.. माझे पोट दुखत असताना तू ओवा दिलास, हे मला लक्षात आहे, हे त्याने मलाच सांगितलं ! हल्ली सगळेच घरी आहेत मग दररोज नवी डिश करतोय आम्ही. बिर्याणी, इडली चटणी, पाणी पुरी, ब्रेडचे पकोडे कुठे व्हिडियो पाहिला होता, मग तेही बनवलेत.. गार्लिक नान केली, चिकन जम्बो केलं.. तरी अजून मला जुने चित्रपट पाहायचे आहेत.. माझा चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' ला ३२ वर्षे झालीत, मी एकदा पाहिन म्हणतेय.. माझ्या मुलांना माझे जुने चित्रपट दाखवायचेत.. घरातच राहून वेळ छान जातोय..

कोरोनामुळे आपण सगळेच क्वारंटाईन झालोय, हे संकट दूर होईलच पण ह्यापूर्वी इतका प्रदीर्घ काळ कुटुंबाना एकत्र राहण्याची-वेळ एकत्र घालवण्याची-गप्पा-हास्यविनोद-गेम्स -कोडी -पत्ते खेळणे असं चित्र बघायला मिळत नव्हतं. टिन एजर्स मुलं झालीत की त्यांच्या समवयस्क मुलांमध्ये गर्क असतात.. पण ह्या वेळेस लॉक डाऊनमुळे लेकाशी गप्पा मारतोय आम्ही, त्याचा आयुष्यविषयक दृष्टिकोन काय आहे हे जणू नव्यानं कळतंय मला ! माझा नवरा आणि आमची मुलगी एकत्र व्यायाम करताहेत असं यापूर्वी घडलं नव्हतं.. कोरोना संकंटाने कुटूंब एकमेकांच्या जवळ आलीत ,त्यांच्यात निवांत क्षण निर्माण झालेत..

कोरोनाच्या आस्मानी संकटानं असंख्य जागतिक समस्या निर्माण झाल्यात हे ही तितकंच खरं ,पण शिक्षण क्षेत्रात असुरक्षेतेची भावना वाढीस लागली.. बुद्धिमान मुलांना आणि साधारण मुलाना ऑन लाईन शिक्षण अथवा परिक्षा द्यावी लागेल ज्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा कस कसा लागेल? बुद्धिमान विद्यार्थी कसे स्टॅन्ड आऊट होतील? '

'तुझ्या मुलांना तुझे आवडलेले सिनेमे कोणते ?'

अश्विनी - 'ज्या नव्या फिल्म्सना सबटायटल्स आहेत असे माझे चित्रपट माझी मुलं पाहू इच्छितात . माझे जुने चित्रपट त्यात मराठी स्पीडमध्ये बोललं गेलं असे सिनेमे त्यांना समजतील की नाही हे कुणास ठाऊक ? माझे 'ध्यानीमनी , मांजा , आजचा दिवस माझा , कदाचित हे सिनेमे मुलांना आवड्लेत .. एकूणच सिनेमा माध्यमाविषयी त्यांच्या जाणिवा प्रगल्ल्भ होताना मी पाहतेय . माझ्या सिनेमावर मुलाची चर्चा मला सुखावतेय ..'

'अश्विनी, तुझ्या करियरला ३५ वर्षे उलटून गेलीत.. गेल्या ३-४ वर्षांपासून वेब सीरीजचा काळ सुरु झालाय. वूट सिलेक्ट वर लागणारी रायकर केस ' हा वेब शो करावासा का वाटला तुला?'

अश्विनी - ' गेली दोन वर्षे मला वेब सिरीजसाठी विचारणा होतेय. पण जर वेब सिरीज करायची तर ती हिंदीत करावी, असा विचार होता. कारण अर्थातच हिंदी भाषेचा 'रिच ' मराठीपेक्षा मोठा आहे. जगात अनेक ठिकाणी हिंदी शोज पाहिले जातात. voot select तर्फे 'रायकर केस ' हिंदीत आहे आणि कथानक, माझी व्यक्तिरेखा मला पसंत पडली . कथानकात रहस्य, थरार आहे. कथा गोव्यात घडते. ह्या वेब शोच्या शूटिंगसाठी गेल्या वर्षी गोव्यात गेले होते. आदित्य सरपोतदार ह्याने उत्तम दिग्दर्शन तर दिलंच आहे पण अतुल कुलकर्णी, नील भूपलम, कुणाल करण कपूर ,पारुल गुलाटी असे एक से एक कलाकार आहेत. अतुल कुलकर्णीसोबत यापूर्वी मी काम केलं नव्हतं, 'रायकर केस 'ने ही संधी मला मिळवून दिली. माझ्याकडे ही स्क्रिप्ट प्रथम आली तेंव्हाच मला आवडली. माझ्या कामाची एक साधी पद्धत आहे. कथानक आणि माझी व्यक्तिरेखा याचा विचार मी आधी प्रेक्षक म्हणून करते.'

'वेब सिरीजमध्ये लिबर्टी घेतली जाते, अंधाधुंद हिंसा, सर्रास शिवीगाळ, कामूकदृश्यं यांची रेलचेल असते. वेब सिरीज करण्यापूवी तुला याची कल्पना असेलच. तुझी 'कम्फर्ट लेव्हल ' काय आहे ?'

अश्विनी - 'नार्को ' ही मी पाहिलेली पहिली वेब सिरीज. ही वेब सिरीज पाहताना माझ्या मनात आले, आता बहुधा मी देखील शिव्या द्यायला लागणार !

कसं असतं -कथा आणि कथेचा बॅकड्रॉप यावर त्या शो किंवा वेब सिरीजचे टेकिंग असते, आणि सुद्न्य कलावंताला असा शो करण्यापूर्वी त्याची चाहूल लागते ! 'गँग्स ऑफ वासेपूर 'सारख्या पार्श्वभूमीच्या सिनेमात शिव्या ह्या कथेचा भाग बनल्या .. त्यातील 'रॉ-नेस' ह्यातील शिव्या अधोरेखित करतात.. ह्या कथेच्या बाजावर गुळमुळीत भाषा शोभणार नाही ! गुडी गुडी भाषा कानांना पचनी पडणार नाही. पण कथेची स्क्रिप्ट आवश्यकता कधी आहे व कधी अनावश्यक आहे हे लेखक -दिग्दर्शकाला जाणवलंच पाहिजे पण कधी कधी मेकर्स अभिरुचीहीन होतात, संवंगतेच्या आहारी जातात हेही खरंच ! पण मला त्यातील सत्य काय ते ठाऊक आहे.. म्हणून काय स्वीकारावे आणि कशाला नकार द्यावा हे भान आहेच .

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनावश्यक वाटतील असे मोठाले सेट्स उभारले जायचे, आता लक्षात येतंय , त्याची गरज नसल्याची.. वेबशोज -वेब सिरीज हे बंधनमुक्त माध्यम आहे. ह्या स्वैर स्वातंत्र्यचा प्रत्येकाने किती फायदा घ्यावा.. पण हे भान यायला देखील थोडा वेळ लागेलच .

मला कधी असं ही वाटतंय कि आपल्या समाजात अशा व्यक्ती आहेतच की ज्यांना असं काही 'हॉट ' बघणं आवडतं, आवडत असेल !

हल्ली टीव्हीवर 'सास -बहू ' छाप मालिका दिसत नाहीत पण ह्या मालिकांनी छोट्या पडद्यावर कोण थैमान घातलं होतं ! अशाच मालिकांना टीआरपी मिळत होती म्हणून त्या बनत राहिल्या. मला असे टीव्ही शोज कधीही आवडले नाहीत, मी बघितले नाहीत, पण म्हणून काय बिघडलं ? 'सास बहू ' मालिकांचा मोठा प्रेक्षक वर्ग होताच हे नाकारून कसं चालेल ? '

अश्विनी, विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झालीस पण अभिनयाची नाळ सोडली नाहीस, हे आव्हान नाही का ?'

अश्विनी - 'आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात साधं-सोपं-आखीव रेखीव असं काही नसतं .. आयुष्यात जे करावंसं वाटते ते करण्यासाठी श्रम, महत्वकांक्षा, चिकाटी, संयम, नशीब ह्या सगळ्याची जोड लागते, त्यासाठी हवी असते सकारात्मक वृत्ती.. अभिनय करायचाच असं मी लग्नानंतर ठरवून अमेरिकेत गेले नाही.. पण मुलं काहीशी मोठी झाल्यावर आलेल्या उत्तम सिनेमांच्या ऑफर्स मी केल्या. माझा नवरा किशोर बोपार्डीकर याने मला मोलाची साथ दिली. शूटिंगसाठी मी मुंबईत आले तेंव्हा त्याने मुलांची आई आणि बाबा बनून ते घर सांभाळलं. माझ्यातील इच्छाशक्ती अशी साध्य झाली. माझं अस्तित्व प्रेक्षकांपुढे कायम असलंच पाहिजे ह्याची मी पर्वा न करताही माझ्या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. म्हणूनच अभिनय -संसार असं समतोल आयुष्य मी जगतेय, ज्याचं श्रेय माझं कुटुंब, नवरा, आई-वडील, प्रेक्षक, माझे मेकर्स या सगळ्यांना आहे.'

'सोशल मीडियावर सेलेब्रिटी म्हणून ट्रोलिंग होतं, तुला कधी असा अनुभव आला का ?'

अश्विनी - ट्रोलिंग झाल्याची उदाहरणं पहाटे अधून मधून .. पण ट्रोलिंग फार काळ राहत नाही . सामाजिक किंवा राजकीय विषयावर माझी ठाम मतं नक्की आहेत पण ती सोशल मीडियावर पोस्ट करणं मला आवडत नाही. सोशल मीडिया हे देखील स्वातंत्र्य आहे आणि कुणी त्याचा कसा वापर करावा हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. इलेक्शन्स देखील ह्या ट्रोलिंगमुले गड़बड्तात तिथे इतरांचं काय? सोशल मीडिया तसा 'रियालिटी चेक' देखील आहे.. कधी सोशल मीडियातून खूप चांगुलपणा देखील समोर येतो. आमच्या मेसेज बोर्डवर मेसेज आला की सध्या कोरोना-बचाव साठी लागणारे मास्क फिट बसत नाहीत.. झालं ! काहींनी ३ डी प्रिंटरवर डिझाइन्स बनवून नवे मास्क बनवले आणि हॉस्पिटल्सला पुरवलेत !

सोशल मीडिया वाईट नाही, हा एक महासागर आहे, 'The way you look at it ! '

माझ्या पोस्ट्स मी सोशल मीडियावर टाकते, माझे गार्डनिंग पाहून अनेकांना प्रेरणा मिळते हे पाहून मी नक्की सुखावते.. माझ्यासाठी हेच अपडेट्स असतात .. !

मी अभिनयात आहे त्यालाही आता ३३-३४ वर्षे झालीत, पण ह्या प्रदीर्घ कालावधीत मी खरोखरीच आवडतील असे सिनेमे केलेत.

पूजा सामंत, जेष्ठ पत्रकार

Updated : 19 April 2020 7:12 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top