जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी
Max Woman | 12 Dec 2019 10:56 AM IST
X
X
बुलडाणा, :- जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत. सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
सुमन चंद्रा 2010 च्या महाराष्ट्र कॅडेर मधील आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 2010 मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2012 मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कामकाज त्यांनी सांभाळले. सन 2014 मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे त्यांनी स्वीकारली. त्यानंतर 2017 मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदाचे त्यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर त्यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडून स्वीकारली.
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा जन्म 10 मे 1984 रोजी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून मास्टर इन फिलॉसॉफी पदवी प्राप्त केली आहे. तसेच अमेरिकेतील युनीर्व्हसिटी ऑफ कॅलीफोर्निया येथून पीएचडी पूर्वीची ‘प्री डॉक्टरेट’ पर्यावरणीय अभ्यासक्रमात मिळविली आहे. अशा उच्च विद्याविभूषित जिल्हाधिकारी जिल्ह्याला लाभल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे. शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकाला अत्यंत सहजतेने उपलब्ध करून देणे, नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध येाजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवच्या निर्मितीवर विशेष लक्ष देवून हा प्रकल्प विनाअडथळा पुर्ण करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व अधिकारी उपस्थित होते.
Updated : 12 Dec 2019 10:56 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire