'पवित्र रिश्ता'नंतर माझा प्रवास सोपा नव्हता ! -अभिनेत्री अंकिता लोखंडे
X
लावण्यवती म्हणावी असं सौंदर्य लाभलेली आणि अंगीभूत अभिनय असलेल्या अंकिता लोखंडेला प्रेक्षक तिचे चाहते तिच्या 'पवित्र रिश्ता ' ह्या मालिकेसाठी ओळखतात .. जवळजवळ ७-८ वर्षे ह्या मालिकेने झी वाहिनीवर ठाण मांडले होते . छोट्या पडद्यावर मी हायेस्ट पेड अभिनेत्री होते शिवाय अनभिषिक्त सम्राज्ञी ! असं आजही अंकिता म्हणते.
'पवित्र रिश्ता' मालिकेदरम्यान सुशांत सिंग राजपूतशी तिची मैत्री -प्रेम आणि 'लिव्ह इन ' घडले , अनेक वर्षांच्या सहवासानंतर हे दोघेही विभक्त झालेत त्यानंतर आलेल्या नैराश्यामुळे अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साली यांचा 'पद्मावत ' सिनेमाही सोडला. कंगना रणावतसोबत 'मणिकर्णिका ' ह्या फिल्ममध्ये 'झलकरी बाई'ची भूमिका केली. सध्या अंकिता ३ वर्षानंतर चर्चेत आहे तीच्या 'बागी -३' या सिनेमाच्या निमित्ताने. श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ या रोमँटिक जोडीसोबत अंकिता लोखंडे आणि रितेश देशमुख ही आणखी एक जोडी यात असेल.
Courtesy :Social media
अंकिता लोखंडेंसोबत मारलेल्या काही गप्पा...
अंकिता , तुझ्या पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेनंतर तू काही वर्षांचा ब्रेक घेतलास आणि 'मणिकर्णिका' फिल्मद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंस. आता 'मणिकर्णिका' रिलीज होऊन ३ वर्षे होताहेत आणि तुझा पुढील सिनेमा 'बागी -३' येतोय. इतका दीर्घ ब्रेक ही तुझी जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी आहे का ?
अंकिता - हा भाग्याचा आणि योगाचा भाग आहे असंच मी म्हणेन. 'पवित्र रिश्ता' हा डेली शो होता ८-९ वर्षे मी सतत अखंड शूटिंग करत होते. सततच्या कामातून मी मनाने -शरीराने थकले होते म्हणूनच मी आलेल्या ऑफर्सचा विचार केला नाही. 'मणिकर्णिका ही पिरियड फिल्म , ऐतिहासिक व्यक्तिरेखा, सोबत कंगना रणावत अशा अनेक कारणांमुळे मी 'मणिकर्णिका' केला. ह्या सिनेमाला यश मिळालं, माझ्या भूमिकेचं कौतुक झालं. पण नंतर आलेल्या भूमिका मनाजोगत्या नव्हत्या. मिळेल ती भूमिका आणि बेधडक हिंदी सिनेमे करत सुटायचे नाहीत हे मी मनाशी ठरवलं होतं आणि म्हणूनच माझ्या दोन प्रोजेक्ट्समध्ये मोठा गॅप दिसतो. मला अर्थपूर्ण भूमिका हव्यात , त्यासाठी माझी प्रतिक्षा आहे.
Courtesy: Social Media
पण मग 'बागी -३ ' ह्या सिनेमाची निवड कोणत्या कारणांसाठी केलीस ?
अंकिता - 'मणिकर्णिका' फिल्म नंतर मी सुयोग्य स्क्रिप्टची वाट पाहत होते. बॉलिवूडचे प्रख्यात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा मला बहीण मानतात. त्यांनी मला 'बागी -३' करण्यास सांगितले. त्यांचे मत होते, बागी हा सिनेमा साजिद नाडियादवाला यांचा फ्रेंचायजी असून तो एक प्रमुख ब्रँड बनला आहे. कथानक, तुझी भूमिका उत्तम असून श्रद्धा कपूर ,टायगर श्रॉफ, रितेश देशमुख असे सगळे बिनीचे कलावंत आहेत. कसली वाट पाहातेस ?' तरीही मला वाटत होतं, बागी -३ हा श्रद्धा -टायगर यांचा सिनेमा आहे !
Courtesy : Social Media
पण मग या सिनेमात काम करायला तयार कशी झालीस ?
अंकिता - 'बहुतेक फिल्म्समध्ये एकाच वेळी २ ते ३ कथानकं समांतर पातळीवर घडत असतात . श्रद्धा -टायगर , रितेश आणि मी. शिवाय कथेप्रमाणे माझे आणि टायगरचे अजिबात पटत नाही, सारखे वाद घडत राहतात. वाद होतात आणि हा देखील एक कॉमेडी ट्रॅक आहे. उपकथानक हे मुख्य कथानकाशी जोडलेलं असतं. श्रद्धाची मी बहीण आहे आणि तिचे नाव सिया तर माझे नाव रुची आहे. साजिद नाडियादवाला यांचा महत्वाचा ब्रँड बनलाय बागी हा सिनेमा. त्याला महत्व असल्याने मी तो केलाय. रितेश ,श्रद्धा आणि मी छान आपल्या मातृभाषेत गप्पा मारत असू. मराठी फिल्मध्ये मला काम करण्याचा फील 'बागी -३ ' करताना आला ..
Courtesy : Social Media
आजवरच्या तुझ्या अभिनय प्रवासावर तू संतुष्ट आहेस का ? संजय लीला भन्साली यांच्यासारख्या नामवंत मेकरचा सिनेमा हातून गेल्याची हूरहूर तुला जाणवते का ?
अंकिता -माझे आई-वडील त्यांच्या नोकरीनिमित्त रतलाम येथे राहत असत. माझं पालनपोषण माझी आजी, मावशी यांनी इंदोर येथे केलं. मी स्टेट लेव्हल बॅडमिंटन खेळत असून अभिनय करण्याचे माझे पॅशन मला स्वस्थ्य बसू देईना. आई, वडील, आजी या सगळ्यांनी मला मुंबईला येण्याची खुल्या दिलाने परवानगी दिली. आईला सोबत घेऊन मी प्रथम मुंबईत आले तेंव्हा ह्या अनोळखी शहरात आम्ही राहणार कुठे हा मोठा प्रश्न होता ! फ्लॅट भाड्याने घेऊन मी कास्टिंग डायरेक्टर्सना भेटू लागले, काही रियालिटी शोज मिळालेत, बालाजी प्रोडक्शन्स अर्थात एकता कपूरने 'पवित्र रिश्ता 'शो दिला, ह्या शोला अमाप यश मिळालं आणि माझं नाव झालं .म्हणूनच मी अभिमानाने म्हणतेय , मी स्वतःला छोट्या पडद्याची राणी मानलं आणि तसं मानधनही मिळवलं.. अर्थात कुठलाही गॉडफादर-मेंटॉर नसताना इंदोरमधून महाराष्ट्रात आलेल्या मराठी मुलीसाठी हा संघर्षमय प्रवास सोपा नव्हता ! १२ तास शूटिंग रोजच चालतं . त्या काळात मला डेंग्यू झाला , आणि हॉस्पिटलमधून ऍम्बुलन्ससह मी 'पवित्र रिश्ता 'च्या सेटवर येऊन हाताला ड्रीप लावून शूटिंग पार पाडलेले आहे.
भन्साली यांची फिल्म तू सोडलीस कारण सुशांत सिंग याच्याशी तू विभक्त झालीस ! भविष्यात सुशांत सोबत सिनेमा ऑफर झाला तर करशील का ?
अंकिता - त्या विषयावर बोलू नये अशी माझी इच्छा आहे ! हो , मी वेगळी झाले, त्या दरम्यान भन्साली यांनी ऑफर दिली पण काहीही प्रोफेशनल डिसिजन घेण्याची माझी मानसिक स्थिती नव्हती ! असो , जे घडून गेलं त्याविषयी मी बोलणार नाही ! माझ्या आजीचा इंदोर शहरात अन्नपूर्णा देवी असा लौकिक आहे ,पण उतारवयात तिला अर्धांगवायू झाला तरीही ती एका हाताने लाटणे धरून पूर्वीसारखाच १०० माणसांना सहज जेवू घालते .. माझ्या मागे माझी आई,मावशी , आजीसारख्या मनाने सशक्त असलेल्या महिलांची विरासत मला लाभलीये तेंव्हा अडचणी ,मानसिक धक्के यातून मी पुन्हा उभारी धरली , पुन्हा उभी राहिले ! मला जर प्रोफेशनली त्या ऍक्टरसोबत (सुशांत सिंग राजपूत ) फिल्म ऑफर झाल्यास मी करेन. व्यक्तिगत आयुष्य हे व्यावसायिक आयुष्याशी जोडू नये हे नक्की !
आपल्या वयक्तिक जीवनाचा दोर आपण कधीही इतरांच्या हाती सोपवू नये, माझ्या आयुष्यातील आनंद हा सर्वस्वी माझ्या हाती असलाच पाहिजे, हा धडा मी शिकलेय आता नव्याने सुरुवात केलीये.. एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन -इम्रान हाश्मी यांच्या सिनेमात 'चेहरे' मध्ये मी आहे ..त्याविषयी पुढे बोलूच !
-पूजा सामंत