महिलांवर विनोद पसरवताय ?
Max Woman | 14 Aug 2019 6:42 PM IST
X
X
ATM च्या समोर उभे राहून हातातील ढोल वाजवत भिक्षा मागणारी एक भटक्या विमुक्ताची महिला हा video सध्या सोशल मीडियावर विनोदी video म्हणून फिरतोय. हे किती संतापजनक आहे. काही विपरीत परिस्थितीतून विनोद निर्माण होतात पण पोटासाठी भिक मागणारी महिला तिचे तुमच्या तथाकथित विकसित व्यवस्थेविषयीचे अज्ञान असणे हा विनोदाचा विषय होऊ शकतो. ATM च्या आत कोणी व्यक्ती नसते हे तिला माहीत नाही व ती तिथे भिक्षा मागते आहे म्हणून तिची खिल्ली उडवली जात आहे.अशी खिल्ली उडविणारे लोक असंवेदनशील व वृत्तीने नीच आहेत.
तिच्या हातातच पैसे समाज म्हणून आपण कधी पोहोचू दिले नाहीत तर ती कधी बँकेत पोहोचणार आणि कधी बचत करणार व तिला कधी ATM मिळणार आणि कसे वापरतात हे कळणार ? तुम्ही शिक्षणाचा आणि रोजगाराचा पासवर्ड च तिला दिला नाही त्यामुळे तिला ATM वापरणे सोडाच पण वापरही माहीत नाही,याचे हसू येण्यापेक्षा या माणसांना आपण अजून किती कोसो मैल दूर मागे ठेवलं आहे याची माणूस म्हणून लाज वाटायला हवी, एकीकडे डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारताना इकडे त्या सेवा वापरणे सोडा पण त्या अस्तित्वात असणेही ही माहीत नसलेले लोक आहेत, हे डिजिटल क्रांतीचे वास्तवावर हसले पाहिजे.. केवळ पैसे असलेले हे मशीनच निर्जीव नाही तर पैसे असणारी माणसेही निर्जीव आहेत
हे लोक आणि या महिला कोण आहेत हे आपण समजावून घेणार नाही का ? कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नाही, शिक्षण नाही,पिढ्यानपिढ्या घरात कोणी शिकलेले नाही. रोजगाराचे कोणतेही साधन नाही. अशा भटक्या विमुक्तातील हे लोक. स्वत:चे गाव हे लोक सोडून शहरात भिक्षा मागायला येतात.शहराबाहेर कुठेतरी रिकाम्या जागेत राहतात. तिथे पाल टाकून उघड्यावर या महिला सर्व गैरसोयी झेलत जगतात. दिवसभर देवाचा देव्हारा घ्यायचा आणि ढोलके वाजवत फिरायचे अशी यांची दिनचर्या. जी भिक मिळेल त्यावर गुजराण. पुन्हा मुले पळवणारी टोळी आली म्हणून राईनपाडा त ५ भटके लोक मारले ही घटनां ताजी आहे. या सर्वांना अतिशय संशयाने लोक बघत असतात. अशा स्थितीत गावोगाव हे लोक फिरत राहतात आणि सहानुभूती सोडाच पण खिल्ली उडवली जाते आहे.
https://youtu.be/5Ndwdyh-2uA
या महिलांनी कष्ट करावे ,भिक कशाला मागतात असा खास मध्यमवर्गीय प्रश्न विचारला जाणारच. मुळात कोणत्या महिलेला असे वाटेल की आपण भर रस्त्यात उभे राहून भीक मागावी ? तिलाही आत्मसन्मान आहेच ना ? भीक मागताना तिलाही लाज वाटतेच ना ? पण हे सगळे एका दिवसाचे नाहीये. तिच्या कित्येक पिढ्या हेच करीत होत्या त्यामुळे यापलीकडे काही करायचे असते हेच तिला ज्ञात नाही पुन्हा या कामात आपण धर्माचे काम करतो देवाचे काम करतो अशी तिची भावना असल्याने कर्तव्यभावना जास्त आहे. कष्टाची कामे पालावर राहणाऱ्या यां महिलांना लगेच कोण देईल ? तुम्ही द्याल का तुमच्या घरातील काम ? तेव्हा त्यांची मानसिकता बदलून ती यां धार्मिकतेतून बाहेर काढावी लागेल. त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आणून द्यावा लागेल. काही कौशल्ये शिकवावी लागेल. ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत ? कधीतरी थांबून या माणसांशी आपण काही बोललो का ?समजून तरी घेतले का ? खिल्ली उडवण्यापेक्षा ते नक्कीच कठीण आहे
(हेरंब कुलकर्णी )
Updated : 14 Aug 2019 6:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire