किती दिवस केवळ बघत राहणार?
X
गेले दोन -तीन दिवस मन खूपच उदास झालंय. काय आणि कसं व्यक्त व्हावं हेच समजत नाहीये. पण स्वस्थ पण बसवत नाहीये. संक्रांत हा शुभ दिवस पण एका चिमुकलीच्या जीवनात हा अत्यंत काळा दिवस ठरला. एका विशेष मुलांच्या शाळेत जाणारी ८ वर्षांची कोवळी पोर सामाजिक विकृतीचा भीषण बळी ठरली. या विषयावर खूप चर्चा होईल, संताप व्यक्त होईल आणि काही दिवसांनी हे सगळं विस्मृतीत जाईल. पण ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय याना मात्र आयुष्यभर सोसावं लागेल.
समाजात किती घाण भरली आहे. एकीकडे आपण महिला सबलीकरण , स्वसरंक्षण यासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. पण मला नेहमीच वाटत आलंय की आपल्या समाजातील जोपर्यंत पुरुषी अहंकार आणि पुरुषी मनोवृत्ती संपत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही. मुलग्यांसाठी पण असे कार्यक्रम बरोबरीने घेतले गेले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचे आई-वडील , कुटुंबीय, शिक्षक यांना सोबत घेऊन ही स्त्री-पुरुष समानतेची चळवळ चालू ठेवली पाहिजे. मला माहिती आहे की स्त्री मुक्ती हा आपल्याकडे चेष्टेचा विषय आहे. पण स्त्रीला एक व्यक्ती म्हणून वागणूक मिळालीच पाहिजे. Gender Equality हा विषय सर्वच स्तरावर आणला गेला पाहिजे.
वरील केस मध्ये आरोप -प्रत्यारोप चालूच रहातील. शाळा म्हणेल ते वाहन पालकांनी ठरवले होते आणि पालक म्हणतील ती शाळेेची जबाबदारी आहे. पण झालेली घटना ही अतिशय वाईट आणि धक्कादायक आहे. यातील दोन संशयित मुले ही अल्पवयीन आहेत असे वाचले. कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईलच पण अशा लहान वयात ही असली विकृती मुलांच्या मनात कुठून येते ? आपण सर्वानीच आता जागे व्हायची वेळ आली आहे. मी स्वतः या क्षेत्रात ३४ वर्षे काम केले आहे. आपण सर्वानी एकत्र येऊन काम करुया. ज्यांना जोडायचा आहे त्यानी कृपा करून मला संर्पक करा किंवा फेसबुकवर संदेश पाठवा. किती दिवस केवळ बघत राहणार?
-सुनिता टागरे
094231 47288