अरुणाच्या मुसफिरितून … दुसरा दिवस “UNPLAND ट्रीपचा
X
दिवसभराचा प्रवास,दगदग,नंतर दोन तीन तास महिलांसोबत विविध विषयांवर चर्चा ,यामुळे खाटेवर अंग टाकताच झोप तर लगेच लागली. पण अगदी पहाटे साडे तीन लाच जाग आली, तेव्हा शरीर सगळ आखडल होत.खूप दिवसांनी खाट बघून छान जरी वाटले असले तरी आता आपल्याला ती सवय कुठे राहिली आहे? खरे तर आपला पलंग,आपली गादी, अगदी आपलच पांघरूण या साऱ्या सवयींचे आपण गुलाम झालेले असतो. साडे तीन ला जाग आल्यावर इकडून तिकडे, तिकडून इकडे असे सारखे कड फेरणे सुरू होते. झोपेला आळ वण्याचा प्रयत्न सुरू होता.मला झोप येण्याऐवजी हळूहळू गाव जागे होत असल्याची जाणीव मला होत होती. सरपंच बाईंच्या घरी मागच्या भागातल्या बकर्यांच ब्या ब्यां आणि गाईंच हांबरण ऐकायला यायला लागलं.मला आमच्या गावची पहाट आठवली. आता मी बाई कधी उठतात,याची वाट बघत होते.कारण मला टॉयलेट ला जायचे होते.त्यांचा संडास कुठे आहे, याची मला कल्पना नव्हती. कारण काल तसे कामच पडले नाही. मला बाथरूमला जायला त्यांनी त्यांच्या घरची मोरी दाखवली होती. बाई लवकर उठाव्यात यासाठी काय करावे? त्यांना आवाज देणे तर बरे दिसणार नव्हतेच.काय करावे, पाण्याचा रिकामा ग्लास खाली पाडावा का,म्हणजे आवाजाने त्या उठतील ,हा विचार करीत असतानाच बाई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्याची चाहूल मला लागली.मी लगेच उठून बसले.
"झाली का झोप?"
"हो.मला संडासला जायचे आहे.कुठे आहे संडास? मला दाखवता काय?"
"संडास नाही ताई आमच्याकडे.चला, आपण बाहेर जाऊ."
"बाहेर? बापरे. बाहेर कसे जायचे? बाहेर तर मला संडास करताच नाही येणार."
"त्यात काय एवढं? चला, जरा लांब जाऊ. आमराईत.तिकडे कुणी येत नाही फारस."
हे एक भयंकरच संकट होते.याची तर मी कल्पनाच केलेली नव्हती. विदर्भात माझ्या गावातल्याही नातेवाईकांकडे किमान संडास होतेच.आजपर्यंत गावात नातेवाईकांशीवाय अन्य कुणाकडे रात्रीचा राहण्याचा प्रसंग आलाच नव्हता.आता काय भयंकर प्रसंगाला तोंड द्यावे लागणार, याची कल्पनसुद्धा मी करू शकत नव्हते. आमच्या खेड्यावर मी लहानणापासूनच संडास बघितला होता.आता बाहेर जायचं या कल्पनेमुळेच की काय माझी आलेली पॉटी गायब झाली.मी बाईंना म्हणाले," नको, आता नाही जायचं मला.अजून संडास लागायची आहे मला."
"अरे, असं कस.असं नका करू मॅडम.काही घाबरु नका. काही होत नाही आणि तिकडे कुणी येतं ही नाही.चला.आता जास्त उशीर झाला त गाव जागा होईल."
ही त्यांची मात्रा बरोबर लागू पडली.शिवाय उजाडताच इथून पुढल्या प्रवासाला सुरुवात करायची होती. पुढे तर संडास, तो ही स्वच्छ मिळणे फारच अशक्य होते.त्यापेक्षा हेच बरे, असा विचार करून आम्ही निघालो.त्यांनी माझ्या हातात एक पाणी भरलेला डब्बा दिला आणि आमची दोघींची वरात आमराई कडे निघाली.त्यातल्या त्यात त्यांनी मला बऱ्यापैकी झाडं असलेल्या जागेवर बसायला दिलं.पण खूप भयंकर प्रकार होता तो. आयुष्यात पहिल्यांदा मी बाहेर उघड्यावर संडास ला बसले होते.मला माझं बाथरूम,माझा स्वच्छ कमोड डोळ्यासमोर दिसत होता. मनात विचारही येऊन गेला,कुणी सांगितले हे उपद्व्याप अरुणा? आणि माझ्या कमोडच्या किंवा दुसऱ्या बाथरूम मधला साध्या संडासच्या आठवणीने मला चक्क रडू आले.पण आता डोकं उखळात दिलंच होत, तर घ्या बदडून.कसाबसा ड्रेस सावरत मी एकदाची तिथून उठले आणि मागे वळूनही न पाहता रस्त्यावर येऊन बाईंची वाट बघत उभी राहिले.पण अवघडून का होईना, पोट साफ झाल्यामुळे बरे वाटत होते.
आंघोळ करून, आणि त्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे नाश्ता करून त्यांच्याकडून बाहेर पडून थेट फाट्यावर येऊन बसची वाट बघत उभी राहिले.बाईंच्या नवर्याने त्यांच्या बाईकवर स्टँड पर्यंत लिफ्ट देण्याचा आग्रह केला ,पण आपल तर ठरलं आहे, कुणाचीच मदत घ्यायची नाही आणि लाल डब्बा शिवाय बसायचं नाही
पुढला प्रवास ब्रेक के बाद