Home > Max Woman Blog > इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता!

इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता!

डॉक्टरांनी काही पेशंट्सना आणि नातेवाईकांना त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कितीही घसाफोड करून कळकळीने सांगितल्या तरीही न ऐकता आपलंच खरं मानणारा एक वर्ग असतो. अगदी अर्धा तास जरी आपण पेशंटच्या स्थिती बद्दल सांगितलं तरी ते "यात काहीतरी डॉक्टरचा फायदा असेल" असं म्हणून आपलं तेच खरं करतात. पण लोकहो जरा विचार करा वैतागून डॉक्टरांनी सांगीतलं "जा करा काय करायचं ते" तर जिव गमावण्याची वेळ येऊ शकते. अशाच हेकड लोकांची कान उघडणी करणारा डॉक्टर साधना पवार यांचा 'इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता!' हा लेख..

इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता!
X

आधीच स्पष्ट करते की हे गाणं तसं टुकार आहे आणि त्याला काही डबल मीनींग वगैरे असेल तर मला माहित नाही. पण हे वाक्य बाकी मला ज्याम आवडलंय.

आम्ही डॉक्टरांनी, काही पेशंट्सना आणि काही नातेवाईकांना त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कितीही घसाफोड करून सांगितल्या, कळकळीने सांगितल्या तरीही न ऐकणारा,आपलंच खरं मानणारा असा एक वर्ग असतो. पंधरा मिनिटे, अर्धा तास जरी आपण पेशंटची स्थिती, एखादया टेस्टची गरज किंवा ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी वगैरे समजावून सांगितली, पुन्हा पुन्हा मातृभाषेत सांगितली तरीही या मंडळींचे काहीतरी पूर्वग्रह असतात. ठाम समजुती असतात त्या बदलतच नाहीत.

अश्या वेळी समजावून सांगण्याचं आपलं कर्तव्य बजावूनही जर, पेशंटच्या नातेवाईकांच्या 'कानपें जुं' रेंगली नसेल, 'पालथ्या घडयावर पाणी' असे झाले असेल तर डॉक्टरांनी स्वतःचा बी. पी. जास्त वाढवून न घेता मनोमनी बरं बाबा, बरं बाई, ठिकाय! करा तुम्हाला जे योग्य वाटेल ते पण, 'इसमे तेरा घाटा,मेरा कुछ नहीं जाता! हा मंत्र मनोमनी जपावा, खरं सांगते,बरं वाटतं.

उदाहरणार्थ, अहो मावशी,बाळाला इतकं तेल का लावताय? पार अगदी डोकंभरून खपल्या झाल्या आहेत,किती खाजत असेल बाळाला? असं विचारताच, "पण मग, बाळाची टाळू कशी भरणार तेल नाही भरलं तर?" असा प्रतिप्रश्न येतोच.

"अहो पण, टाळू आपोआपच दीडेक वर्षात भरते, तेलाचा काहीएक रोल नसतो हो यात." असं छान समजावून सांगूनही डॉकटरना काय कळतंय! अश्या अर्विभावात बायका मग त्यांना जे पटतं तेच करत राहतात.

बऱ्याचदा बाळंतिणीला पुरेसं दूध येत असतं, बाळ दिवसभरात पाच सहा वेळा शू करत असत,पण ते इतर काही कारणाने रडत असेल तर, 'हिला दूधच नाही बघा मॅडम', असं फसकन त्या ओल्या बाळंतिणीसमोर तिच्या आईने, सासूने म्हंटलं की, ती बिचारी लगेच डिप्रेशनमध्ये जावून तिचं दूध खरंच कमी होतं. आम्ही किती जरी समजावलं की, "दूध पुरेसं आहे. आपण इतर काही कारण आहे का? बाळाच्या रडायचं ते शोधू पण तुम्ही वरचं दूध इतक्या तान्ह्या बाळाला पाजू नका, ते डेंजरस आहे." असं सांगितलं तरी त्या आपला हेका सोडत नाहीत.

मूल होत नाहीत म्हणून आलेल्या जोडप्यांमध्ये पुरुषाची वीर्य तपासणी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट असते पण कितीही समजावून सांगितलं तरी 80 टक्के पुरुष इगो मुळे ती करून घेत नाहीत. दोष एकात आणि उपचार दुसऱ्यावर असं सुरू राहतं मग, ज्याचा काहीच फायदा होत नाही. तुमचाच घाटा आहे ना मग, हमारा इसमे क्या जाता?

काही जोडप्यांना सांगितलं ना की, "तुमच्या गर्भामध्ये चुकून सुद्धा मतिमंदत्व वगैरे काही नाही ना हे तपासण्याची टेस्ट करून घ्या, बरं असतं, टेस्ट नॉर्मल आली की आपण निर्धास्त होतो." तर त्यांना वाटतं, "हे उगाचच काहीतरी विनाकारण टेस्ट आपल्यावर थोपवली जातेय, डॉक्टरला नक्की काहीतरी कमिशन असणार याच्यात."

विज्ञानाने इतके चांगले शोध लावले असून, आपल्या डॉक्टरांनी ते आपल्याला सांगितले असून आर्थिक दृष्ट्या शक्य असतानाही आपण उगीच आपलं डोकं नको तिथे चालवून स्वतःचेच नुकसान करून घेत असतो. हे या लोकांच्या लक्षात येत नाही.

काही जण असतात त्यांनी कुठंतरी इंटरनेटवर, गुगलींग करून काही ज्ञान मिळवलेलं असतं त्यावरून ते डॉक्टरांसमोर ते पाजळत असतात. त्यांना प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येक केस वेगळी असते, क्लिनिकल कोरीलेशन नावाचा एक प्रकार असतो. डॉक्टरांनी आपल्या शिक्षण, बरेवाईट अनुभव यामधून ट्रीटमेंटची काही दिशा आखलेली असते हे कळत नसतं.

अश्या ओव्हर परफेक्शनिस्ट, डोकेखाऊ लोकांनाही त्यांच्या 'हाल पे' सोडून इस्मे तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता म्हणून दुर्लक्ष केलेलं बरं!

चाळिशीच्या आत, लहान सहान कारणांसाठी गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन करून घेण्याचा अट्टाहास करू नका बायांनो. त्यामुळे तुम्ही म्हातारपण लवकर ओढवून घेताय. शिवाय ऑपरेशन आणि भुलीचीही रिस्क राहते. "आम्ही औषधे देवून बरं करू तुम्हाला" असं कितीजरी सांगितलं तरी काही बायकांना पिशवी काढल्याशिवाय चैनच पडत नाही.

एकदा माझी पिशवी काढायची असं त्यांच्या डोक्यात बसलं की अशक्तपणापासून ते रस्त्यावर घसरून पडून होणाऱ्या अपघातापर्यंत सगळं पिशवीमुळेच होतं असं त्यांना वाटतं. मग त्या लगेच एखादा पिशवी काढणारा डॉकटर गटकावून त्या पिशवी काढूनच दम घेतात.

कुणाचा घाटा ? कुणाचं नुकसान? अशी कित्येक उदाहरणे आहेत की जेंव्हा डॉक्टर मंडळी अगदी हात टेकतात पेशंट आणि नातेवाईकांसमोर.

लक्षात घ्या, तुम्ही व्यसन सोडायला हवं. तुमच्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत. तुम्हाला व्यायामाची गरज आहे. तुम्हाला मानसोपचारांची गरज आहे. तुम्हाला अधिक मोठ्या सेंटरला उपचारांची गरज आहे. असे सल्ले जेंव्हा आपले डॉक्टर देतात,तेंव्हा त्यामागे त्यांची तुम्हाला आजारांपासून वाचवण्याची बरं करण्याची तळमळ असते. त्यांचे सल्ले धुडकावून लावणे म्हणजे तुमचाच घाटा, यात आम्हा डॉकटर मंडळींचा 'कुछ नहीं जाता'!

- डॉक्टर साधना पवार

Updated : 30 Oct 2020 2:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top