Home > Max Woman Blog > स्त्रीला कामसुखाची गरज नसते का?

स्त्रीला कामसुखाची गरज नसते का?

स्रीला पुरुषांप्रमाणे कामसुखाची गरज नसते. असं पुरुषांना वाटतं. मात्र, नक्की सत्य काय आहे? पुरुषांना स्त्रीला नेमका काम आनंद कसा मिळतो! आणि तिच्या कामेच्छा व कामभावना काय आहेत हे समजतं का? जाणून घ्या स्री पुरूष संबंध बाबत डॉ. प्रदीप पाटील यांचं मार्गदर्शन

स्त्रीला कामसुखाची गरज नसते का?
X

"माझ्या नवऱ्याने दुसरे लग्न केले तरी चालेल मला, मीच त्याला सुचवले आहे तसं, कारण रोज रात्री मला त्याचा खूप त्रास होतो. आता आम्हाला दोन मुलं आहेत पण त्याची कामेच्छा काही कमी झालेली नाही आणि त्याचं जवळ येणं आता सहनही होत नाही"...

माझ्यासमोर बसलेल्या स्त्रीचे मनोगत.

सल्ला मार्गदर्शनासाठी ती माझ्याकडे आली होती. तिच्या पूर्वेतिहासातून कळले की, कामजीवन हा शब्द देखील तिच्या घरी वर्ज्य होता. संस्कारातून कामभावना आणि काम क्रिया या विषयी प्रचंड गैरसमज डोक्‍यात भिनले होते. स्वतःहून पुढाकाराने काम क्रिया करणे हा प्रकार लग्नानंतर आजतागायत तिने केला नाही हे तिने मान्य केले. ती असे का वागत असावी? कामजीवनाविषयीच्या गैरसमजुती तीचे आयुष्य उध्वस्त तर करणार नाहीत ना?

मुलगा किंवा मुलगी लहानाचे मोठे होताना जननेंद्रियांची माहिती पालक देतात ती अशी..

"शी, ते घाणेरडे आहे" "वाईट असते ते" "नालायक, तिथे काय हात लावतेस?" "हे कसले चाळे? "..

हे असले संस्कार घेऊनच कामजीवनाची माहिती डोक्यात बसते.

अगदी इंग्लंड, युरोपात देखील 1960 च्या दशकात कामक्रांतीच्या काळात 'ईव्ह की मेरी' असा प्रश्न ऐरणीवर आला होता. आज-काल टीव्हीवरून आणि नेटवरून विकृत काम ज्ञान दिले जाते. त्यातही स्त्रीचे देहप्रदर्शन करून कामभावना बिघडविल्या जातात. पुस्तके, मासिके, यातून अर्धवट माहिती मिळाली की गैरसमजांची मालिकाच तयार होते. अर्थातच यात बळी जातो स्त्रीचा! स्त्रीत्वाचा!!

स्त्रीला कामसुखाची एवढी गरज नसते. मात्र, पुरुषाला तिने कामसुख द्यायला हवे असे पारंपारिक अंधश्रद्ध मत प्रचलित आहेच. स्त्रीला स्वतःच्या शरीराची ओळख खूपदा उशिरानेच होते. आम्ही घेत असलेल्या 'कामज्ञान' शिबिरातून ध्यानात असे आले आहे की, ७५ टक्के प्रश्न हे पाळीविषयी असतात. पाळी येणे हा एक शाप आहे. असे समजून आजही अनेक ठिकाणी स्त्रीला पाळी आल्यावर बाहेर बसविले जाते किंवा वेगळे बसविले जाते.

ज्यू लोकांमध्ये पाळी आल्यावर संबंध ठेवण्यास सात दिवस मनाई आणि सातव्या दिवशी विधियुक्त अंघोळ (ज्यास 'मिकवाह' म्हणतात) ती केली जाते. पाळी विषयी नीट माहिती वयात येणाऱ्या मुला-मुलींना दिली जात नाही. त्यामुळे तिच्या पहिल्या पाळीचा अनुभव गोंधळलेला, विचित्र, नाहीतर वाईट असतो.

पहिल्या रात्री बायकोच्या योनीतून रक्तस्त्राव झाला नाही म्हणजे ती 'प्युअर' नाही; या समजुतीतून दारूच्या आहारी गेलेल्या नवर्‍यास सुमारे दोन महिने मला कौन्सिलिंग करावे लागले. इटलीत काही वर्षांपूर्वी आपण कुमारिका आहोत हे दाखविण्यासाठी योनी पटलाची शस्त्रक्रिया स्त्रिया करून घेत. योनीपटल म्हणजे योनीमार्गात असलेला पडदा.

शेरे हाईट या कामव्यवहार संशोधिकेस असे आढळले आहे की, सुमारे ७५ टक्के पुरुषांना हे माहिती नसते की स्त्रीस नेमका काम आनंद कसा मिळतो! आणि तिच्या कामेच्छा व कामभावना काय आहेत व असतात?

काम व्यवहाराचा निरोगी पाया दोघांच्या कामपूर्तीत असतो. पुरुषाची कामपूर्ती वीर्यस्खलनातून होते. स्त्रीच्या कामपूर्ती विषयी पुरुषाला काहीच देणे घेणे नसते. अलीकडील भारतातील एक संशोधन असे सांगते की, सुमारे ६८ टक्के पुरुष त्यांची कामपूर्ती झाल्यावर पत्नीकडे पाठ करून घोरू लागतात.

स्त्रीची कामपूर्ती नावाचा प्रकार नसतोच असे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानले जायचे. अमेरिकेतील सुमारे ८६ टक्के स्त्रिया कामपूर्ती साठी शिश्निका उद्दीपन किंवा क्लायटोरीस स्टीम्युलेशन यामार्गे हस्तमैथुनाद्वारे कामपुर्ती मिळवतात असे एका सर्वेक्षण चाचणीत आढळले आहे.

हस्तमैथुन हे घाणेरडे, वाईट आणि शरीर दुर्बळ करणारे असते असे सर्रास मानले जाते. खरेतर पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही हस्तमैथुन करणे यात गैर, घाणेरडे काहीच नाही. कामव्यवहाराची सुरुवात गरज, इच्छा, क्षमता यातून होते आणि प्रेम व जवळीक हा त्याचा पाया बनतो.

आज पुरुष म्हणतो, 'सेक्स नाही मग प्रेम नाही' तर स्त्रीचे सांगणे असते, 'प्रेम नाही तर मग सेक्स नाही'. वास्तवात जवळीक, आत्मीयता, प्रेम, विश्‍वास, प्रामाणिकपणा आणि कामजीवन हे एकमेकांबरोबर चालतात.

ज्या जोडप्यांमध्ये संवादाचा अभाव असतो तेथे कामजीवन फुलत नाही. कामसंबंध हा दोन व्यक्तींमधील एक व्यवहार आहे. यात दोन व्यक्तींमधील नातेसंबंध फार महत्त्वाचे असतात. एकमेकांचे हे एकमेकात असलेले व्यवहार निरोगी ठेवणे गरजेचे असते. नाहीतर काम संबंधांमध्ये आक्रमण सुरू होते. पुरुषांकडून बलात्कार तर स्त्रियांकडून कामक्रियेस नकार देऊन शरीराचा साधन म्हणून वापर सुरू होतो. एकमेकांना फसवून नातेबाह्य संबंध सुरू होतात...

स्वतःच्या शरीराची ओळख स्त्रीने नीट करून घेणे गरजेचे आहे पण त्याहूनही महत्त्वाचे आहे स्त्रीच्या कामभावना, कामजाणिवा, कामक्षमता तिने ओळखणे.

काम संबंधांना मान्यता हवी म्हणून विवाह केला जातो. पण विवाहातून कामसंबंध निरामय राहतात. याची खात्री देता येत नाही. याचाच अर्थ निरामय कामजीवनासाठी परिपक्व मानसिकता आणि निरोगी शारीरिकता गरजेची असते. काम संबंध हे जसे अपत्य जन्माला घालण्यास गरजेचे असतात. तसेच, तेवढेच, ते आनंद मिळवण्यासाठीही असतात..

आणि म्हणूनच स्त्रीने कामजाणिवा रुंदावणे आवश्यक आहे..!

आणि पुरूषांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जाणिवा विवेकी होणे अपरिहार्य आहे!!

- डाॅ. प्रदीप पाटील

Updated : 11 Sept 2021 8:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top