समलैंगिकता म्हणजे नेमके काय ?
X
खरंतर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या समाजातील सर्व स्तरावरील महिलांचा गौरव केला जातो , त्यांना त्या दिवसाच्या मानकरी ठरविल्या जातात आणि शुभेच्छांचे वर्षाव केले जातात पण तिचा संघर्ष व तिची मानसिकता या गोष्टींचा फारसा विचार केला जात नाही आणि महत्वाचे म्हणजे , ती समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक असते तेव्हा तिचे समाजाविषयी व सभोवताली घडणाऱ्या घटनांविषयी मत मांडण्याची मोकळीक दिली जात नाही .
मग बऱ्याच वेळा आपण फक्त स्त्री आहोत किंवा आपल्याला काही मर्यादा आहेत याच कारणाने तिचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते . असे बरेच विषय आहेत जिथे स्त्रीने बोलणे हे फारसे ग्राह्य धरले जात नाही त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा संवेदनशील व न चर्चिला जाणारा विषय म्हणजे , 'समलैंगिकता' होय .
केवळ समलैंगिकता हा विषय अगदीच उघडपणे समाजासमोर आणून त्याविषयी असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोकळेपणाने करताना वाचकांच्या नजरा थोड्या विस्तृत होणारच यात काहीही शंका नाही मात्र या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समलैंगिकता ही एक नैसर्गिक क्रिया आहे . याला विकृती का मानावी . या विषयाचे अज्ञान किंबहुना चुकीचा समज हे मुळापासून नष्ट व्हायलाच हवे .
जेव्हा वृत्तपत्रांद्वारे , सोशल मीडियाद्वारे व विविध वाहिन्या द्वारे याचे विश्लेषण होते तेव्हासुद्धा या विषयाबाबत मते कधीही इतरत्र चर्चिली जात नसतात . समलैंगिकता या विषयाला ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता व याचा सखोल अभ्यास केला असता आपल्या लक्षात येईल की कित्येक मनामनाच्या आत रुजलेली व मुद्दामच अंधारात ठेवलेली नैसर्गिक क्रिया म्हणजेच समलैंगिकता आहे . याची जाणीव त्यासंबंधित लोकांना त्या-त्यावेळी होते मात्र या विषयाकडे पाहताना समाज आजही याचा खुल्या मनाने स्वीकार करत नाही .
वैयक्तिक व शारीरिक अशा गोष्टी उघडपणे मांडू नये असे प्रत्येकाला वाटते आणि एखाद्या स्त्रीने यावर लिखाण करणे अथवा उलघडून वास्तव मांडणे तेही कदाचित समाजातील जुन्या विचारसरणीला पटणार नाही .
मुख्यतः समलैंगिकता म्हणजे नेमके काय ?
समलैंगिकता म्हणजे Homosexuality ही जन्मजात असते ती नैसर्गिक क्रिया आहे . तो कोणताही आजार नाही . स्त्री-पुरूष आकर्षण जसे निसर्गनियम आहे . ते समाजाने मान्य केले आहे त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाला पुरुषाविषयी आकर्षण वाटणे सुद्धा तेवढेच नैसर्गिक आहे . यालाच GAY असे म्हणतात . याउलट जर एखाद्या स्त्रीला स्त्रीविषयी आकर्षण वाटते तेव्हा त्यांना लेसबिन LESBAIN असे म्हणतात .
भारत सरकारच्या एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये एकूण 25 लाख लोक होमोसेक्शुअल म्हणजेच समलैंगिक आहेत पूर्वी समलैंगिकता हा गुन्हा होता कलम 377 नुसार हा गुन्हा सिद्ध झाल्यास दंड ठोठावण्यात येत होता व गुन्हेगारांना 10 वर्षे शिक्षाही दिली जात होती. मात्र अलीकडेच भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेवर एक ऐतिहासिक निर्णय घेऊन समाजामध्ये माणुसकीचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. त्यानुसार आता समलैंगिकता हा गुन्हा नसून त्याला न्यायालयाची मान्यता आहे .
थोडसं अभ्यासपूर्वक पाहिलं तर हा काही काल-परवाचा विषय नाही यासंदर्भात कित्येक दाखले इतिहासातूनच वाचायला मिळतात त्याच आधारावर 1996- 98 च्या दरम्यान दिग्दर्शक दीपा मेहता यांनी शबाना आजमी व नंदिता दास यांचा 'फायर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या समोर आणून या सिनेमाच्या माध्यमातून समाजासमोर समलैंगिकता याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे . त्यानंतर 2008 मघ्ये प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड या चित्रपटातून दोन मुली मधील समलैंगिक संबंधावर भाष्य करण्यात आले आहे . तसेच सत्यघटनेवर आधारित असणारा मनोज वाजपेयी यांच्या अभिनयातील "अलिगढ "हा सिनेमा सुद्धा फार गाजला होता .
समलैंगिकतेला समाजामध्ये मान्यता मिळवून देण्यासाठी आजवर अनेक कलाकारांना , दिग्दर्शक व निर्मात्यांना खूप अभ्यासपूर्वक हा विषय हाताळावा लागला आहे. मात्र, कलम 377 अंतर्गत जेव्हा हा गुन्हा होता तेव्हा यासाठी संघर्षही करावा लागला होता . हिंदु व वैदीक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या लैंगिक कृतीचे दाखले आहेत अनेक पौराणिक भारतीय काव्यांमध्ये सुद्धा देवादिकांची समलैंगिक वर्णने केलेली आढळून येतात . कामसूत्र या ग्रंथांमध्ये याच विषयाचे विस्तृत लेखन केलेले आहे .
विष्णूचे मोहिनी रूप व शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप हे Transsexual ची उदाहरणे आहेत . समलैंगिकता हे ऐतिहासिक दृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतीमध्ये कायम अस्तित्वात होते व याच्या कित्येक खुणा प्राचीन साहित्यांमधून तसेच शिल्प व कला यांच्या माध्यमातून आजही पहावयास मिळतात . मात्र या अतिशय नाजूक विषयावर कुठेही खुले भाष्य केले जात नाही किंवा याचे अज्ञान दूर करण्यासाठी खुलेपणाने प्रश्न विचारले जात नाही.
1970 च्या दशकात अमेरिकेतील अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन व अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन या वैद्यकीय संस्थांनी समलैंगिकता हा मानसिक दोष नाही हे स्पष्ट केले . त्याहीपेक्षा हळुवारपणे स्पष्ट करायचे म्हटले तर उत्तम उदाहरण आहे लहान मुलांचे . काही लहान मुले डावखुरी असतात म्हणजेच निसर्गतः सर्वच गोष्टी डाव्या हाताने अगदी सहजपणे करू शकतात आणि उजव्या हाताने त्यांना ते शक्य नसते मात्र अशावेळी त्या मुलांना डावखुरा म्हणून हिणवणे किंवा कमी लेखणे म्हणजे त्यांच्या मनावर आघात करण्यासारखे आहे. ते विक्षीप्त आहेत याची जाणीव करून देत त्यांना कमकुवत बनवले जाते मात्र तसे न करता त्यांचे डाव्या हाताचे हस्ताक्षर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धती ही अचूक आहे असे त्यांना आत्मविश्वासाचे डोस दिले असता मुलांचे खच्चीकरण होत नाही .
अगदी त्याचप्रमाणे पौगंडावस्थेमध्ये मुला - मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल नैसर्गिक असतात . बऱ्याच वेळा मुलांवरती त्यांच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणामुळे सुद्धा अशा होमोसेक्शुअल भावना जागृत होण्याची शक्यता असते , मात्र ते क्षणिक असू शकते एकंदरीत काय आपल्या समाजामध्ये समलैंगिक व्यक्ती आहेत. मात्र ग्रामीण भागांमध्ये ते सहसा सुस्पष्ट होत नाही आणि शहरांमध्ये ते उघडपणे व्यक्त केले जाते .
काही दिवसांपूर्वी साधारणता 2018साली यवतमाळ शहरामध्ये पहिला समलिंगी विवाह झाला त्यानंतर 2019 मध्ये केरळमध्येही Gay marriage झाले . अर्थातच हा विषय झटकून टाकण्यासारखा नसून यासंबंधी समाजामध्ये जागृती करणे गरजेचे आहे जेणेकरून अशा समलैंगिक लोकांच्या मनावर समाजाच्या हास्याची ओरखडे ओढले जाणार नाहीत .
एक काळ असा होता जेव्हा 'एड्स' या आजाराविषयी बोलणे किंवा लिहिणे लज्जास्पद वाटायचे मात्र त्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यासंदर्भात माहिती लोकांच्या समोर मांडणे म्हणजे काळाची , समाजाची गरज झाली . त्याचप्रमाणे समलैगिककतेवर प्रकाशझोत टाकणे हे आजच्या पिढीतील मुलामुलींची गरज आहे . या विषयावर लिहिण्यासाठी स्त्री सरसावते की पुरुष हे महत्त्वाचे नाही. गरज आहे ती विषयाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याची !
✍लेखन - सौ .सविता जितेंद्र माने .