भोंगऱ्या बाजार काय आहे? जाणून घ्या...
X
महाराष्ट्रातील उत्तर भागात असलेला धुळे, नंदूरबार, जळगाव हा भाग खानदेश म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या उत्तरेस असलेला सातपुडा पर्वत म्हणजे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्यांतील नैसर्गिक सीमारेषा. येथे मुख्यतः आदिवासींची वस्ती आहे. पावरा, बोरेला, पारधी, पाडवी ह्या जमाती येथे वर्षानुवर्षे राहत आहेत. सातपुड्याच्या रांगेतील १६ गावांपैकी वैजापूर हे मध्यवर्ती व मोठे गाव. होळीच्या पार्श्वभूमीवर भरणारा शनिवारचा बाजार हा तेथल्या पंचक्रोशीत 'भोंगऱ्या बाजार' म्हणून ओळखला जातो. होळीचा हा भोंगऱ्या बाजार प्रसिद्ध आहे.
ह्या बाजारात महाराष्ट्रातील तसेच सीमेपलीकडील अनेक खेड्यापाड्यांतून हजारो आदिवासी स्वतः च्या सजवलेल्या वाहनाने सहकुटुंब येतात. पारंपरिक वेशात आलेले आदिवासी तरुण-तरुणी एकमेकांस पसंत करतात. आदिवासी युगुलांना हा भोंगऱ्या बाजार म्हणजे आनंदाची पर्वणी असते आणि मनासारखा जोडीदार निवडून वैवाहिक जीवन सुरू करण्याची संधी असते, संगनमताने पळून जाऊन ते आपल्या नातेवाईकांकडे निवाऱ्याला जातात. तेथूनच मुला-मुलीच्या घरी विवाहासंबंधी बोलणी करण्याबाबत निरोप धाडला जातो. काही दिवसांतच दोन्हीकडील पालक जातपंचायतीच्या पंचांसमक्ष त्यांच्या विवाहास मान्यता देतात. पंचांसमक्ष मुलीच्या वडिलांना हुंडा दिला जातो आणि विवाह निश्चित होतो. ह्या बाजारात येणाऱ्यांचे स्वागत दारू-बिडी देऊन केले जाते. अनेक पारंपरिक खेळ आणि कुस्त्यांचे फड हे ह्या बाजाराचे आकर्षण असते. महिलांसाठी 'कावल्या' आणि 'धोती' ह्या आदिवासी पेहरावांची दुकाने लावली जातात. चुरमुरे, डाळ्या आणि शेव अशी खास आदिवासींच्या न्याहरीला लागणारी 'मिरी भोजऱ्या'ची अनेक दुकाने लागतात. बाजाराच्या मध्यभागी ढोल आणि थाटी (पितळी ताट) वाजवले जातात आणि त्यावर आदिवासी स्त्री-पुरुष ताल धरून नाचतात. ढोल वाजवण्याची स्पर्धा असते. स्पर्धेत जिंकणाऱ्याला ठरावीक रोख रक्कम देण्यात येते.