अंगात येते की आणले जाते? देवीला, देवाला पुरुषांचे वावडे आहे का?
X
बायकांच्याच अंगात देव-देवी-सैतान जास्त प्रमाणात का येतात? देवीला, देवाला, पुरुषांचे वावडे आहे का? याचे उत्तर आपल्या येथील समाज रचनेत दडले आहे. स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा यांना कायम दुय्यम लेखण्याची परंपरा इथे वर्षानुवर्षे चालू आहे. स्त्रीचे स्थान ज्या समाजात मानाचे नाही तेथे तिने कसे जगावे? माझ्याकडे आलेल्या एका केसमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पुरुषप्रधानतेने कुठवर ताणत न्यावे याला सीमाच नसल्याचे दिसून आले. दर मंगळवारी त्या बाईच्या अंगात यायचे. माझ्याकडे तिला पाठवून देण्यात आले. जेव्हा तिची सखोल चौकशी केली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. घरात लग्न करून आल्यापासून दहा वर्षात नवऱ्याने स्वतःहून एकही साडी न आणून देण्यापासून आजारी सासू-सासर्यांचे करायचे वर त्यांच्या शिव्या खायच्या आणि नवऱ्याने काहीच बोलायचं नाही इथपर्यंत अनेक तऱ्हा समजल्या. अशावेळी स्त्रीला तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सहन करणे हातात असते. यामुळे होणारी मानसिक घुसमट कधीतरी स्फोटाचे रूप घेते. नवऱ्याला किंवा अन्य कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी बाई अंगात देव किंवा देवी 'आणते'. म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करण्याची ही चुकीची धर्म मान्य रीत म्हणावी लागेल! अशा वेळी स्त्रीने अंगात आणण्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करायला हवेत. कारण काही काळ ही मात्रा लागू पडेल. सदासर्वकाळ नाही.
दारुड्या नवऱ्याला धडा शिकविण्यासाठी..
छळणाऱ्या सासूला इंगा दाखवण्यासाठी..
नवऱ्याची मारहाण चुकविण्यासाठी..
नको असलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी..
अंगात आणणे पूर्ण चुकीचे आहे.
एका गावी मांत्रिकाला पकडण्यासाठी गेलो होतो. त्याच्या दरबारात तीन बायका अंगात देव आणून बसूनच घुमत होत्या. मी आत पोलिसांना घेऊन गेल्यावर एकच गलका झाला आणि त्या तिन्ही बायका जागेवरच बसून 'गप्प' झाल्या. पोलीस ओरडले, तशा तिघी उभ्या राहून हात जोडून गयावया करू लागल्या. एक पोलीस मिष्कीलपणे म्हणाला, "देव पोलिसांचे पाय धरू लागला तर उद्या पोलिसांची मंदिरं उभी राहतील!" म्हणजे काही वेळा बायका अंगात आणण्याचे ढोंगही करतात. त्यांना यातून एक तर पैसे किंवा सन्मान मिळवायचा असतो. दर्गा-मंदिरे या ठिकाणी अंगात आणणाऱ्या बायकांपैकी बहुसंख्य वेळा असे ढोंग केले जाते. आणि...अशावेळी या बायकांना इंजिनीयर, डॉक्टर्स, ऑफिसर्स, प्रश्न विचारत बसलेले दिसतात, समस्या सोडविण्यासाठी साकडे घालतात!! अंगात आलेल्या म्हणजे आणलेल्या बाईने दिलेले उत्तर खरे मानून तसे वागतात अन् करतातही!! मात्र अंगात आलेल्या काही बायकांचा एक गंभीर प्रकारही आढळतो. या बायकांचे आजूबाजूच्या परिस्थितीशी नाते पूर्णपणे त्या काळापुरते तुटलेले असते. त्यांना अंगावरच्या वस्त्राचे भान नसते. अतिशय वेगाने त्या नाचत असतात. या स्त्रियांच्या मेंदूत काही बदल घडलेले असतात. यास हिस्टेरिया व उन्माद विकृती म्हणतात. "डिसोसिएटीव्ह डिसाॅर्डर " असे वैद्यकीय भाषेत म्हणतात. स्कीझोटायपल पर्सनॅलिटी आणि हिस्ट्राॅयनिक पर्सनॅलिटी असा व्यक्तिमत्त्वाच्या दोषाचा प्रकार असलेल्या व्यक्तीही यामध्ये येऊ लागलेल्या आहेत. या वर्तन दोषाच्या प्रकारात या व्यक्तींना नेहमीच असे वाटते की अदृश्य आणि अज्ञात शक्तीच्या आपण संपर्कात आहोत आणि आपल्यात जादूटोणा शक्ती आहे. अर्थात या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये मेंदूतील रसायनात आणि काही केंद्रात बिघाड असतो असे अलीकडील संशोधनात आढळून आले आहे. या स्त्रिया गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असतात. अशावेळी त्या धार्मिक क्षेत्रात आणि यात्रा-जत्रांच्या ठिकाणी आपली मानसिकता गमावून घुमायला लागतात. या मानसिक स्थितीत त्या काही वेळा अनेकांना आवरत नाहीत इतक्या वेगात हालचाली करतात. साधारणपणे व्यक्ती विचित्र वर्तन करू लागली की आपल्याकडे देवाचं, बाहेरची बाधा किंवा बाहेर वास समजला जातो. खरे तर ती सर्व बिघडलेल्या मानसिकतेची लक्षणे असतात. पण अशा स्त्रीस किंवा पुरूषांना दर्ग्या-मंदिरात नेले जाते. तेथे पुजारी-मुजावर हे 'देवाचं आहे' असे सांगून खतपाणी घालतो. मग अंगारा भंडारा किंवा मंतरलेलं पाणी देणे असा अवैज्ञानिक उपचार केला जातो. बऱ्याच वेळा अशा व्यक्तींना मारहाणही केली जाते. हे उपचार योग्य नव्हेत आणि अंगात आलेल्या व्यक्तींवर ते जुलूम करणारे ठरतात. खरे उपचार आहेत मानसिक रोगावर उपचार करणार्या डॉक्टरांना दाखवणे आणि मानसोपचार करणाऱ्या समुपदेशकांना दाखविणे. अलीकडे यासाठी प्रभावी उपचार पद्धती आहे.
मात्र अंगात येणारं घालविण्यासाठी संयमाची गरज आहे. कारण दीर्घकाळ यासाठी उपचार घेणे गरजेचे असते. जर ढोंग असेल तर त्यामागील कारण शोधून काढणे महत्त्वाचे असते हे ढोंग विशिष्ट कारणासाठी असेल तर त्या कारणाचा निरास करणे गरजेचे असते. ढोंग करण्यामागे त्या त्या व्यक्तीचे विशिष्ट हेतू दडलेले असतात. ते हेतू पूर्ण करणे हा उपाय असतो. अंगात येते ते फक्त गरीब झोपडपट्टीतल्या बायकांच्या मध्येच हा एक मोठा गैरसमज आहे. गणपती-गौरीच्या वेळी श्रीमंत बायकांच्या अंगात येतेच. घागरी फुंकल्यानंतर बऱ्याच बायका घुमतात. वास्तवात घागरी फुंकताना तोंडावाटे कार्बन-डाय-ऑक्साइड वायू घागरीत सोडला जातो आणि ऑक्सिजन ऐवजी तोच पुन्हा नाकावाटे श्वास म्हणून घेतला जातो. अशावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला की ग्लानी येते. भ्रमल्यासारखे होते आणि ती स्त्री घुमू लागते. हा "मेंटल अॅसफायक्झिया" चा प्रकार असतो. अंगात येणे हा दैवी प्रकार निश्चितच नाही. त्यामागील कारणे शोधून काढली तर अंगात येणे पूर्णपणे थांबते. असा माझा अनुभव आहे. देवी-देव-सैतान अंगात आणणाऱ्यांपेक्षा त्यांच्या आजूबाजूस पसरलेल्या समाजाने हे लक्षात घ्यायला हवे...!
- डाॅ. प्रदीप पाटील