Home > Max Woman Blog > महिला हिंसा – दृष्टीकोन बदलण्याची गरज

महिला हिंसा – दृष्टीकोन बदलण्याची गरज

महिला हिंसा – दृष्टीकोन बदलण्याची गरज
X

एखादा नकोसा स्पर्श, एखादी थप्पड, मनासारखे शिकता न येणे, मनाविरुद्ध लग्न करायला लागणे, बाहेर घाणेरड्या नजरा-शेरेबाजी सहन करायला लागणे अशी हिंसा महिला सहन करत असतात. मात्र याकडे आपण हिंसा म्हणून पाहतो का? बाहेर पडायचंय ना मग शेरेबाजी/ नकोसे स्पर्श याकडे दुर्लक्ष करा म्हणजे बाहेर पडण्याची ती किंमत समजा आणि गप्प बसा. हा खरेतर लैंगिक छळ आहे मात्र त्यासाठी शब्द काय वापरले जातात; छेडछाड किंवा Eve Teasing - हे हिंसेचं मामुलीकरण झालं. ही हिंसाच आहे आणि त्याची जबाबदारी हिंसा करणार्‍याची आहे हे ठामपणे म्हणायला हवं. पत्नी ऐकत नसेल, चुका करत असेल तर नवरा मारणारच असं म्हणून या हिंसाचाराचं समर्थन केलं जातं. मात्र हिंसा ही सत्तासंबंधातून होते, अत्याचारी पती कधी त्याच्या बॉसवर हात उचलतो का? आधुनिक कायदा व्यवस्था असा अधिकार कोणालाही देत नाही हे पक्कं लक्षात ठेवायला हवं.

एकूणच टीव्ही, मनोरंजनाचे कार्यक्रम, सिनेमे यात बाईचं चित्रण कसं असतं? आदर्श स्त्री म्हणजे कशी तर सहनशील, त्यागी. नवर्‍याला मारझोड करणारी बाई हा हमखास विनोदाचा विषय असतो. ‘कबीर सिंग’ सारख्या चित्रपटात नायक अतिशय आक्रमक दाखवला आहे. मैत्रिणीला तो देत असलेली वागणूक हे सरळसरळ गैरवर्तन आहे; पण प्रेमाच्या नावाखाली त्याचं उदात्तीकरण करुन हा नायक अभिमानाने हिंसा करताना दाखवला जातो आणि हिट होतो हे दुर्दैवीच म्हणायला हवं. अशी मर्दानगी दाखवणारे अनेक सिनेमे आहे. सिनेमा/पोर्नोग्राफीमध्ये बहुतेकदा स्त्रिया उपभोग्य वस्तू म्हणून दाखवल्या जातात. या सगळ्यातून जे वातावरण तयार होतं, ते स्त्रियांवरच्या हिंसेला पोषक असतं हे लक्षात घ्यायला हवं.

महिला हिंसेचं वातावरण हे कामाच्या ठिकाणीही दिसतं. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळामुळे अनेकींना ताणतणाव, काम सोडावे लागणे किंवा तक्रार केल्यास विरोध सहन करायला लागणे अशा गोष्टी दिसतात. यासाठीच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. यासंदर्भात विविध कार्यस्थळी आम्ही कर्मचार्‍यांशी संवाद साधतो तेव्हा सांस्कृतिक फरकामुळे घडणार्‍या गोष्टी दिसतात; उदा. शहरी मुलींचं मोकळं वागणं हे अनेकदा त्या ‘उपलब्ध’ आहेत या पद्धतीने पाहिलं जातं. तोकडे कपडे घातल्याने मुलीच अशा गोष्टींना जबाबदार असतात असंही म्हटलं जातं. पण करणार्‍या व्यक्तीच्या विवेकबुद्धीबद्दल कोणी बोलत नाही. पीडित व्यक्तीला/महिलेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्याची खोड जायला हवी.

महिलेची संमती नसताना, तिच्या मनाविरुद्ध घडलेलं कृत्य ही हिंसाच आहे आणि अशी हिंसा चालणार नाही अशी समाजाची भूमिका असायला हवी. कोणत्याही प्रकारची हिंसा म्हणजे पीडितेच्या हक्कांचं उल्लंघन आहे हे समजून घ्यायला हवं. यासाठी स्त्री-पुरुष समता प्रत्येकाने समजून घेणं आणि आचरणात आणणं गरजेचं आहे आणि ही समता आणणं ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सायली ओक, प्रीती करमरकर

narisamata@gmail.com

Updated : 10 Jun 2020 8:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top