Home > Max Woman Blog > #Repost तुमची नकोशी

#Repost तुमची नकोशी

काही दिवसांपुर्वी बीडमध्ये शितल गाडे या गरोदर महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला होता. आधीच तीन मुलींच्या आई असलेल्या शीतल वर चौथ्या मुलासाठी दबाव होता का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि बऱ्याचदा हेच होतं. पण गर्भात वाढणाऱ्या त्या निष्पाप स्त्री अर्भकाचा काय दोष? अशा स्त्री भ्रुण हत्येच्या घटना या आधीही घडलेल्या आहेत. एसंच एका चिमुरडीने आपल्या पालकांना जाब विचारणारं लिहिलेलं हे पत्र प्रत्येकाने एकदा वाचायलाच हवं.

#Repost तुमची नकोशी
X

स्त्री जातीच्या अर्भकाला नकोशा भावनेनं फेकून दिल्याच्या घटना अनेकवेळा पहायला मिळत आहेत.जसं नेवासा तालुक्यात कुकाणा येथे नवजात जिवंत मुलीचा अभ्रक फेकुन दिलेल्या अवस्थेत सापडलं. यावेळी परिसरातील लोकांनी पहाण्याची भुमिका घेतली. त्यानंतर खेड तालुक्यातील चांडोली येथे एका शौचालयाच्या टाकीच्या चेंबरवर स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळलं.

मावळ देहुरोड येथील गांधीनगर मध्ये एका महिला शौचालयातही स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळून आलं. पिंपरी चिंचवडमध्येही एका जंगलात स्त्री जातीच अर्भक एका पिशवीत पेकून दिल्याचं समोर आलं होत. मुंबईमध्येही एका लोकल ट्रेनमध्ये एका पिशवीत चक्क सात दिवसांचे लहानगं अर्भक सापडल्याची घटना घडली होती. अशा कितीही घटनांचा उल्लेख केला तरी तो कमीच आहेत. हृदय हेलावून जातं अशा घटना ऐकल्या की...स्त्री अर्भक म्हण्यापेक्षा तिला नकोशी म्हणून जन्मतःच दर्जा दिला जातो. याच संर्दभात अशाच एका नकोशीनं तिच्या आई-बाबांना एक पत्र लिहिलं आहे.

"प्रिय आई-बाबा,

आई-बाबा मी नकोशी...ओळखंल का ? पण मी कसं ओळखणार तुम्हाला ? कारण मी डोळे उघडले तेव्हा मी स्वत:ला आईच्या कुशीत नाही तर एका प्लास्टिकच्या पिशवीत कच-याच्या पेटीत पाहिलं. एका कच-यासारखं... आणि आजूबाजूलाना खुप लोकं मला पाहायला जमा झाले होते. कौतुकाने नाही तर, दया म्हणून त्यातल्या एका काकांनी मला उचलंलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले. असो तुम्ही केलेलं कृत्य तुम्हालाच सांगून काय उपयोग? मी तुम्हाला आई-बाबा म्हटलेलं कदाचित तुम्हाला आवडणार नाही कारण तो हक्क तुम्ही मला जन्मत:च नाकारलाय. पण तरीही मी मात्र तुमच्याच रक्ता-मासाचा गोळा आहे. हे मी ठरवलं तरी नाकारू शकत नाही.

पत्र यासाठी लिहितेय कारण जन्म झाल्याबरोबर तुम्ही माझं अस्तित्वच नाकारून टाकलं. मी कुठे असेन हे मलाच माहित नाही. मग तुमच्याशी मी बोलणार तरी कसं म्हणून पत्र लिहित आहे. आई-बाबा माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की माझं काय चुकलं? मी मुलगी आहे हे ,की तुमच्या पोटी जन्म घेतला हे? पूर्वी मी जन्माला येण्या आधीच मला आईच्या पोटातचं मारलं जायच. पण शासनानं काही कायदे-नियम कठोर केल्यानं ते प्रमाण कमी झालं. मला वाटलं बर झालं आता तरी आमची कत्तल थांबेलं. पण नाही. तुम्ही तर खुप हुशार निघालात. माझ अस्तित्व टिकू द्यायचंच नाही असा तुम्ही जणू काही निर्धारचं केला आहे.

मला जन्माला येण्याआधी मारणं शक्य नाही हे समजल्यावर मला जन्माला आल्यावर मारायला सुरवात केली. आणि ते शक्य नाही झालं तर मला हवं तिथे फेकून द्यायला सुरवात केली. माझे डोळे उघडल्यावर मी कुठे आणि कोणत्या अवस्थेत असेनं हे मलाचं माहित नसतं. मला प्लास्टिक पिशवीत कच-यासारखं फेकुन देता. ज्या आईच्या साडीच्या पदरानं माझी लाऴ पुसली जाते त्याच साडीत गुंडाळून मरण्यासाठी मला फेकून दिलं जात. ट्रेनमध्ये किंवा चक्क नाल्यात टाकून निघून जाता तुम्ही. अहो ते मुके प्राणीही आपल्या पिल्लांना आपल्या नजरेतून सुटू न देता त्यांची काळजी घेतात मी तर तुमच्या हाडामासाचा गोळा आहे आणि तरीही तुम्हाला मी इतकी नकोशी आहे?

आई अगं तु तर मला नऊ महिने पोटात वाढवतेस, जपतेस, माझी नाळ तुझ्या फक्त उदराशी नाही गं तुझ्या ह्यदयाशी जोडलेली असते. मी पोटात असताना तुझा प्रत्येक श्वास हा माझा श्वास असतो. तुझ्या रक्ताच्या कणा कणानं मी हळू हळू तयार होत असते. आणि मी जन्मल्यावर मला फेकून देताना तुला काहिच भावना उरत नाही का गं? मी इतकी नकोशी आहे की मला तुझं दूध पिणं ही नशीबी नसावं. आपल्या लेकराला काहीही लागलं, दुखलं तर पहिलं आईच्या डोळ्यात पाणी येत. मग ते पाणी फक्त मुलांसाठीच असंत का?

मी मुलगी आहे म्हणून मी तोही अधिकार गमवलाय. कदाचित बाबांच्या पुढे किंवा काही परिस्थितीच्या पुढे तुझा नाईलाज होत असावा पण माझ्यासाठी तु झगडणं तरी तुझ्या हातात आहे ना. देवापेक्षाही आईला महत्त्वाचं स्थानं असतं पण तु तर वैरीणं ठरतेस माझी. तुझ्या पोटी जन्म घेणं हे माझ्या हातात नाहीना. मग तरीही माझीच सर्व चुक असल्यासारखी मला शिक्षा का? मला जगात आणण्याचा निर्णय तुमचा असतो मग त्यात माझी काय चुक? मग कधी कधी असं वाटंत की मला त्या पोटातंच मारून टाकणं योग्य होतं. निदान त्यात मला जन्माला आल्यानंतरचे चटके तरी सहन करावे लागले नसते. मला जन्माला घालण्याचा निर्णय तुमचा, फेकून देण्याचा निर्णय तुमचा मी नकोशी म्हणून एक जीव नाही खेळणं समजता तुम्ही मला...

मला कुठेही मरण्यासाठी सोडून जाताना माझं रडनं, माझा टाहो ऐकून तुमचं ह्दय हेलावतं नाही का? तुमची पावलं माझ्याकडे पाठं फिरवून कशी निघून जाऊ शकतात? माझी सुरवातच तुम्ही माझा शेवट बनवून टाकता. मला संपवण्याचा हा सर्व हट्टाहास कशासाठी तर मी मुलगा नाही म्हणून? वंशाचा दिवा डोळ्यात तेल टाकून जपायचा आणि मी नकोशी असलेली ,परक्याच धन असेलली वंशाची वेल जिच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही. सुकली की तीला खुडून बाहेर फेकून देता येत अशी जन्माला आलेला मुलगा आणि मुलगी यामध्ये काय फरक असतो हो? दोघांचेही जग पाहणारे ईवलेशे डोळे असतात. बंद असलेल्या मुठींचे नाजूक हात असतात. सर्व साम्य असतं, फरक असतो तो फक्त लिंगाचा म्हणून माझ्या वाट्याला ही भिषण वागणूक येते. माझीही काही स्वप्नं असतील, मलाही हे जग बघण्याचा अधिकार आहे तो का हिरावून घेता माझ्याकडून?

आई-बाबा असूनही अनाथ म्हणून माझी वाढ होत होती एका अनाथ आश्रमात. पण काही दिवसांपुर्वी मला एका कुटुंबानं दत्तक घेतलं. मग जन्मदात्यांपेक्षा, मला जन्मापासून सांभाळणारे ते माझे आई-बाबा झालेत. पण माझ्यासारख्या फेकून दिलेल्यांना स्विकारणारे आई-बाबा भेटतीलच असं नाहीना. माझी मनापासून विनंती आहे तुम्हाला नकोशी असले तरी मी तुमचाच एक भाग म्हणून माझा एकदा तरी विचार करा. आणि जो वंशाचा दिवा तुम्हाला हवा असतो तोही एका स्त्रिच्याचं पोटी जन्मला येतो हे विसरू नका. नाहीतर मुलाच्या हव्यासापोटी आणि मुलगी संपवण्याच्या हट्टापायी एक भावी मातृत्वच तुम्ही संपवताय याची जाणीव असूद्या...."

तुमची नकोशी

मयुरी सर्जेराव

Updated : 10 Jun 2022 1:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top