त्यांनी दिव्याचे हात बांधले आणि..., 7 दिवसांनी तिचा मृत्यु झाला
जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक हत्या असं तिच्या मृत्यूचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वाचा समीर गायकवाड यांचा लेख..
X
लॉकडाउनने माणसांची काय आणि किती दुरावस्था केली हे पाहायला कुणाला वेळ नव्हता कारण ज्याला त्याला स्वतःची भ्रांत पडली होती. यात फारसं काही वावगं वाटत नाही. मात्र लॉकडाउन सरल्यानंतर एकमेकाला पायाखाली घेऊन पुढे जाण्याची चढाओढ सुरु झालीय तेंव्हा तरी आपण भवतालात डोकवून पाहण्यास हरकत नसावी. मन सुन्न करणाऱ्या घटना भवतालात घडत होत्या. यातलीच एक दास्तान दिव्याची आहे. दिव्या चेकुदुराई. वय 22.
जून २०२० मध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तिची हत्या झाली. जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक मर्डर असं तिच्या मृत्यूचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
एखाद्याचं नशीब किती फाटकं असू शकतं, नियती किती हात धुवून पाठीशी लागते याचं अत्यंत दुःखद दुर्दैवी उदाहरण म्हणून दिव्याकडे पाहता येईल. दिव्याचे वडील तिच्या बालपणीच निवर्तले होते. तिच्या आजोबांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दिव्या सतरा वर्षांची असताना तिची आई, मोठा भाऊ आणि आजी रहस्यमय रित्या गायब झाले. विझाग पोलिसांनी मिसिंगच्या केसेस नोंदवून 2015 साली फाईल बंद केल्या. एकाच घरातली तीन माणसं गायब होतात याचा कुणाला काही संशय येत नाही आणि कुणाला त्याची खंत वाटत नाही हे आपल्या मुर्दाड समाजाचे प्रतिबिंब आहे जे आपल्या परिचयाचं आहे.
दिव्या एकटी पडल्यावर तिची मावशी कांतामणी हिने तिचा ताबा घेतला. कांताच्या मनात आधीपासूनच काळंबेरं होतं. तिचं वैयक्तिक चालचलनही वाईट होतं. जन्मल्यापासून हालअपेष्टा सोसणाऱ्या आणि अन्नाच्या घासासाठी मौताज झालेल्या दिव्याला मावशीचा आधार वाटला मात्र तो फोल ठरला. कांताला एक अय्याश यार होता, कृष्णा त्याचं नाव. आंध्रामधील फ्लेशट्रेडमध्ये याच्या ओळखी होत्या. त्यानं कांताला भयंकर सल्ला दिला. अवघ्या काही शेकडयांच्या बदल्यात दिव्याला वसंताच्या हवाली करण्यात आलं. गौतला वसंता ही अत्यंत दुष्ट आणि नीच स्त्री होती. सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकवस्तीत तिचा धंदा चाले. तिने दिव्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. दिव्याचा पहिला कस्टमर बहात्तर वर्षांचा होता ज्यानं वसंताला मालामाल केलं. दिव्या दिसायला देखणी होती आणि तारुण्याच्या खुणा तिच्या देहावर ठळकपणे उमटल्या होत्या. त्यामुळे अल्पावधीत वसंताकडे आंबटशौकीनांची रीघ लागली. दिव्याचं जबरी शोषण होऊ लागलं. वसंतासाठी दिव्या टांकसाळ ठरली असूनही ती आपल्या परस्पर काही पैसे लपवून ठेवत असावी या संशयाने वसंताला पछाडलं. या छद्मापायी त्यांच्यात वाद होऊ लागले. लॉकडाउन सुरु झाला आणि दिव्यासह सर्वांची उपासमार सुरु झाली. अधूनमधून येणाऱ्या एखाददुसऱ्या व्यक्तीच्या मेहरबानीवर सगळं विसंबून राहू लागलं. आमदनी घटली. उलट्या काळजाच्या वसंताला वाटू लागलं की दिव्या आपल्याला फसवतेय, ती सगळे पैसे हवाली करत नाहीये. आर्थिक तंगीने बेजार झालेल्या वसंताने दिव्याला धडा शिकवायचे ठरवले.
वसंताची बहिण मंजू, आई धनलक्ष्मी, विवाहित बहिण गीता, मेहुणा संजय, आणि मावशी वेण्णा यांच्या सहाय्याने वसंताने 30 मे रोजीच्या सकाळच्या सुमारास दिव्याचे हातपाय करकचून बांधले. नंतर तिला विवस्त्र केलं गेलं. तब्बल सहा दिवस तिला सिगारेटचे चटके दिले जात होते. मन मानेल त्या जागी तिला ठोकून काढलं जात होतं. 30 मे ते 4 जून या सहा दिवसात दिव्याला पाण्याचा एक थेंब देण्यात आला नाही. या काळात विशाखापट्टनममधील सरासरी तापमान 36 डिग्री सेल्सिअस होतं आणि ह्युमिडीटी एक्स्ट्रीम हाय लेव्हल्सवर होती. यावरून कल्पना येईल की पाण्याच्या एका थेंबासाठी ती किती तरसली असावी ! तिने पाणी मागितलं की तिच्या मस्तकावरचे तिचे कुरळे केस उपटले जात, अखेरच्या दिवशी तिच्या डोक्यावर केसच उरले नव्हते. इतकेच नव्हे तर तिच्या भुवया देखील कापण्यात आल्या होत्या. नाक कान डोळ्यांवरदेखील जखमा झाल्या होत्या. तिची स्तनाग्रे कापून टाकण्यात आली होती. अन्नपाण्यावाचून झालेली उपासमार आणि आत्यंतिक मारहाणीमुळे सातव्या दिवशी तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू नैसर्गिक दाखवून अंत्ययात्रेत फुलांच्या चादरीत तिच्या जखमा लपवण्याचा प्रयत्न झाला मात्र वसंताचं हे कुकृत्य समोर आलंच.
अन्य राज्यांच्या मानाने आंध्रमध्ये ब्रोथेल्स कमी आहेत. मात्र खेड्यातून अडल्यानडल्या मुली आणून शहरातल्या पांढरपेशी भागात त्यांच्याकडून धंदा करवून घेण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. प्रकाशम आणि कुर्नूल भागात दलाली करणाऱ्या एका व्यक्तीस दिव्यावरील अत्याचाराची कुठून तरी भनक लागली. तो दिव्याच्या अंत्ययात्रेत सामील झाला, थेट स्मशानात पोहोचला, तिथं त्याने पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी पुढील कारवाई जलद केली. दिव्याचे शवविच्छेदन झाल्यावर तिच्यावर झालेले अनन्वित अत्याचार समोर आले आणि विझाग शहर हादरून गेलं.
काही काळासाठी का होईना पण दिव्याचा नामधारी नवरा असलेला विराबाबू आणि कृष्णा त्याच दिवशी फरार झाले होते. या अधम कृत्यात त्यांचा देखील हात होता. दिव्याच्या दर्दनाक हत्येमुळे लोक पोलिसांना शिव्याची लाखोली वाहू लागले मग 2015 सालच्या दिव्याच्या आई, भाऊ आणि आजीच्या गायब होण्याच्या केसेसदेखील नव्याने ओपन केल्या गेल्या. त्या तिघांचा खून झाला असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरु झाले. दरम्यान काही आठवडयांच्या तपासानंतर दिव्याचे सगळे मारेकरी जेरबंद झाले.
दिव्याची जिथे हत्या केली गेली ती ईमारत विशाखापट्टनममधील अक्कायपालेम परिसरात आहे. हा भाग म्हणजे पुण्याच्या कोथरूडसारखा आहे. वेगाने विकसित झालेला आणि वर्दळीचा पांढरपेशी भाग आहे हा. इथे एका कोवळ्या मुलीकडून जबरदस्तीने तब्बल सहा वर्षे धंदा करून घेतला जात होता आणि मृत्यूच्या आधी सहा दिवस तिचा अन्नपाण्याचा आक्रोश कुणाच्याही कानी गेला नाही हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. दिव्याच्या हत्येनंतर सुरुवातीला मीडियाने चांगले कव्हरेज दिले, लोकांनीही आवाज उठवला. मात्र काही दिवसांनी सगळं विस्मरणात गेलं मात्र काही वेगळ्याच लोकांनी मामला लावून धरला.
दिव्याच्या केसची सेटींग केली जाऊ नये म्हणून जे लोक प्रयत्न करत आहेत तेच लोक कधीकाळी खेड्यातल्या पोरीबाळी धंद्याला लावत होते हे विशेष आहे. लॉकडाउनदरम्यान एका पोस्टमध्ये केलेलं भाष्य इतक्या भीषण रित्या प्रत्यक्षात येईल असं मला कदापिही वाटलं नव्हतं. असो. दिव्याच्या केसमधील इन्फॉर्मरवर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. 'राम तेरी गंगा मैली' मधील मणीलालसारखी त्याची अवस्था झालीय. त्याला बळ लाभो.
दरम्यानच्या काळात माझी विचारपूस करणाऱ्या आणि आस्थेने चौकशी करणाऱ्या सर्वांचा ऋणी आहे.
- समीर गायकवाड