दिवाळीत रेडिमेड फराळाचा ट्रेंड वाढला
X
दिवाळी फराळाचा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवाळीच्या काळात अनेक विशेष पदार्थ तयार केले जातात, जे घरातील आनंद आणि समृद्धी दर्शवतात. दरवर्षी दिवाळीला घरातले संपूर्ण कुटुंब एकत्र येत मोठ्या आनंदात आणि उत्साहात फराळ तयार करायचे. पण सध्या दिवाळीचा गोडवा वाढविणारे फराळाचे पदार्थ तयार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस विविध कारणांमुळे कमी होत आहे. फराळाचे पदार्थ तयार केले तर ते मोजकेच आणि मर्यादित प्रमाणातच केले जातात. शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नोकरी सांभाळून फराळ तयार करण्यासाठी त्यांना वेळ देणे शक्य होत नाही.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबात सदस्यांची संख्या कमी झाली असून, मर्यादित स्वरूपात फराळ तयार करणे किंवा तयार रेडीमेड फराळाचे पदार्थ घेण्यास महिला वर्गाची पसंती मिळत आहे. सदर शहरात प्रत्येक विभागात तयार फराळ विक्री करणाऱ्या घरगुती महिला, बचत गट, केटरिंग व्यवसायिक आदींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील अनेक महिलांना नोकरीनिमित्त सकाळीच घराबाहेर जावे लागते. दिवसभर नोकरीत व्यस्त असणाऱ्या महिलांना दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्याची खरेदी तसेच फराळ तयार करण्यासाठी वेळ पुरात नसल्याने शहरांमध्ये दिवाळी फराळ रेडिमेड घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ली अनेक लोक रेडिमेड फराळ घेणे अधिक सोयीचे मानतात. कारण रेडिमेड फराळ विकत घेण्यात वेळ वाचवतो, बाजारात अनेक प्रकारचे फराळ उपलब्ध असतात, ज्यामुळे नवीन चवींचा अनुभव घेता येतो, अनेक ब्रँड्स उच्च दर्जाचे साहित्य वापरतात, त्यामुळे चव चांगली मिळते. लोकांच्या जीवनशैलीत बदल झाल्याने, रेडिमेड उत्पादने अधिक लोकप्रिय झाली आहेत.