सासू-सुनेच्या नात्यापलीकडील मैत्री
X
तीर्थरूप प्रिय आईस,
६ एप्रिल २०२० ! तुम्ही हे इहलोक सोडून गेलात ! अवघं आयुष्य तुम्ही स्मित-संयम-असोशीने जगलात.. मधुमेह, हृदयरोग, स्लिपडिस्क, ब्लड प्रेशरसारख्या विकारांना नेहमीच हसतमुखाने सामोऱ्या गेलात.. स्वतःच्या विकारांची वाच्यता करणं हे तुमच्या साध्या सरळ स्वभावाच्या चौकटीत कधी बसलं नाही.. म्हणूनच अनेकदा मृत्यू देखील तुमच्या धीरोदात्तपणापुढे हार मानून गेला. पण ६ एप्रिलला मात्र त्याने आम्हांला तुमच्यापासून हिरावून नेलं !
खऱ्या अर्थाने मोठी पोकळी निर्माण केलीत माझ्या आयुष्यात !
माझे लग्न झाल्यापासून मला तुम्ही कधीही सासूरवास म्हणजे काय हे समजू दिलं नाही.. सासू कधीही आई होऊ शकत नाही हा फक्त गैरसमज असतो हे तुम्ही माझ्या आई होऊन सहज दाखवून दिलंत !
तुमचं माझं नातं नेहमीच 'फ्रेंड,फिलॉसॉफर, गाईड आणि त्याही पलीकडे म्हणजे तुमच्यात मी माझी जीवश्य- कंठश्य सखी पाहिली ! सासू आणि सुनेमध्ये गेल्या ३३ वर्षांत एकदाही वाद -विवाद-मतभेद झाला नसल्याची घटना आपल्या दोघींच्या आयुष्यात घडली, हा देखील बहुधा एक विक्रमच असावा. आई -लेकीमध्ये देखील वादावादी- भांडणं आश्चर्य नाहीये ,पण आपल्या नात्याला सासू -सुनेचं लेबल होतं पण तरीही घरातील भांडं कधी वाजलं नाही. कित्येक वर्षे आपण गुण्या -गोविदांने काढलीत. अनेक रात्री गप्पा मारत राहिलो. माझ्या अनेक भाव- भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही माझं एक हक्काचं व्यासपीठ होतात.
तुमच्या सहवासात माझ्यावर आलेल्या इष्ट -आपत्ती , संकटं जीवघेणी वाटली नाहीत. संकटांचा सामना धीराने -संयमाने करायचा असतो हे तुमच्याकडून अगदी सहजपणे मला जाणवलं. अत्यंत शालिन सौन्दर्य जन्मजात घेऊन जन्मास आलेल्या तुम्ही पण तुमच्या व्यक्तिमत्वात मी नेहमीच स्नेहाळ -स्निग्धता पाहिलीये. अनेक वर्षांच्या आपल्या सहवासात तुमचा शांत आवाज कधीही वाढलेला मी पाहिला नाही. कलियुगात श्रीरामचंद्रांचे गुण असलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळ पण माझे भाग्य खरोखरच थोर म्हणून मला तुमचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. आणि सततच्या सहवासामुळे तुम्हांला कधी पत्र लिहिलं नाही , जे आज तुमच्या एक्झहिट नंतर लिहितेय.
माझ्या सासूबाई श्रीमती सुशिला गोपाळ सामंत मूळच्या गोमंतक कन्या. अनेक स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा गोवा हा प्रांत, आईंमध्ये इथले सुगरणीची चव अलवार उतरली आणि त्या साक्षात अन्नपूर्णा झाल्या. त्यांच्या हातची चव मला अन्य कुणाही स्त्रीमध्ये किंवा अगदी पंचतारांकित हॉटेलमध्येही आढळली नाही. त्यांच्या प्रत्येक पदार्थात दररोजचे जिन्नस असत पण ओतप्रोत प्रेमाने केलेला स्वयंपाक कधी बेचव होत नाही हे त्यांना पाहून प्रचिती येत गेली. त्यांच्या सानिध्यात राहून आज मी जे काही शिकले हीच माझी शिदोरी आहे. संस्कार ते स्वयंपाक जे काही ह्या प्रवासात शिकू शकले ते तुमच्याच सहवासांत. फारसं शिक्षण नसतानाही वाचनाच्या आवडीने तुम्हाला बहुश्रुत बनवलं! अनेक कलांची आवड असूनही मर्यादित साधनांमुळे आपल्या आवडी निवडी जोपासता आल्या नाहीत तुम्हांला पण कलेतील निखळ आनंद प्रेक्षक म्हणूनही घेता येतो हे तुम्हीच जाणलेत .
मी कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच पत्रकारिता करत असल्याने विवाहानंतर साहजिकच पत्रकारिता हीच नोकरी हाच व्यवसाय झाला होता. कामाच्या अनियमित वेळा आणि संसार सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत पण ह्या माऊलीने अतिशय आनंदानं -विना तक्रार मला साथ दिलीत -माझ्या जवाबदाऱ्या सांभाळल्या. माझी लेक समृद्धी तुमची नात हिला तर अडीच महिन्याची असल्यापासून तुम्हीच सांभाळलं. समृद्धी म्हणजे तुमच्यासाठी दुधावरची साय. माझी आजारपणात आईच्या ममतेने देखभाल देखील तुम्ही त्याच प्रेमाने केलीत जशी तुम्ही तुमच्या लेकीची केली ! आई , तुम्ही होतात म्हणून मी घर-दाराच्या अडचणींवर सहज मात करू शकले ! मनःपूर्वक ऋणी -मनःपूर्वक कृतज्ञ आहे मी तुमची ! कायम राहिन ..
तुमच्या नसण्याने मी काय गमावलंय हे आज मी नेमक्या भावनांत मांडू शकत नाही ..
तुमचे -संस्कार तुमच्या स्वभावातील माधुर्य ह्यातील माझ्यात किमान दहा टक्के जरी आलं तरी आपली मैत्री फळाला आली असं मी समजेन !
तुमची स्नूषा -अहं सखी ,
पूजा राजन सामंत