Home > Max Woman Blog > महिलांच्या लै भारी दिसण्यामागचं रहस्य

महिलांच्या लै भारी दिसण्यामागचं रहस्य

हा टॉप तिला छान दिसतो. मला का नाही? तिच्या अंगावर ते कपडे उठून दिसतात. माझ्या का नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सतत सुरु असते. मात्र, त्या कपड्यात ती लै भारी का दिसते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जाणून घ्या सुवर्णरेहा जाधव यांच्याकडून तिच्या लै भारी दिसण्यामागचं रहस्य

महिलांच्या लै भारी दिसण्यामागचं रहस्य
X

The human body is the best work of art.- Jess C.Scott

मार्च असल्याने घामाच्या धारा निथळताहेत. एक दीड महिन्यापूर्वी वापरत होतो ते जाडसर कपडे हातात घेण्याचीही इच्छा आता होत नाहीये. लोकरीचे कपडे तर फार लांबचीच गोष्ट.

आपण कपडे नेहमी ऋतुप्रमाणे वापरतो. उन्हाळ्यात सुती, कमी घाम येणारे, हवेशीर, शरीराला न चिकटणारे, पावसाळ्यात पटकन सुकू शकतील असे रेयॉन, पॉलीएस्टर इत्यादी. हिवाळ्यात अंग पूर्ण झाकतील असे, हीट लॉस कमी करणारे, शरीराला चिकटून राहणारे लोकरी थर्मल्स, बर्फाळ परदेशात गरम पण न भिजणारे वगैरे वगैरे.

जे कपडे आपण चेन्नई किंवा केरळमध्ये वापरू ते आपण नक्कीच काश्मीरमध्ये वापरणार नाही. पावसाळ्यात सफेद किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरणार नाही. पावसात भिजल्यावर कपडा पारदर्शक होतो. त्यानुसार कोणते कपडे पावसाळ्यात घालावे? याचाही विचार आपण करतोच. हे ऋतू आपल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. फक्त ऋतुच नाही तर भौगोलिक परिस्थितीवर खूप काही अवलंबून असते. तेथील सामाजिक, आर्थिक, शारीरिक व मानसिक परिस्थिती हे सर्वच.

आपले शरीर जरी आपल्या पूर्वजांचे गुणधर्म घेऊन घडलेले असले तरी त्या जडणघडणी मागे वरील कंडिशन्सचा खूप मोठा हात असतो आणि त्याच गोष्टी आपल्या इतर वागण्यावरही प्रभाव पाडतात.

पूर्वीच्या ग्रीस या देशाचे हे उदाहरण इथे द्यावेसे वाटते. ग्रीसचा नकाशा पाहिला तर लक्षात येते की, तीनही बाजूंना समुद्र आहे आणि किनारा खूप वेडावाकडा आहे. देशातील लहान-मोठ्या बर्याहचशा राज्यांना स्वतःचा असा मोठा मोठा किनारा आहे आणि त्यामुळे तिथे बरीच बंदरे होती आणि साहजिकच व्यापार चांगला होता. आर्थिक दृष्ट्या तिथली जनता सधन आणि त्यामुळे निर्धास्त होती.

तिथला आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तिथले तापमान. जे इतर देशांच्या मानाने बर्यारपैकी आल्हाददायक होतं. त्यामुळे तेथील जनता स्वतःचा बराचसा वेळ बाहेर मैदानांमध्ये / मोकळ्या हवेत घालवत असे. त्यातूनच वेगवेगळ्या मैदानी खेळांमध्ये भाग घेणे आले आणि तेथे अनेक आंतरराज्यीय स्पर्धा नियोजित केल्या गेल्या.

या स्पर्धा वाढत जाऊन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक्सपर्यन्त पोहोचल्या. या सर्वांचा सगळ्यात मोठा परिणाम जनतेच्या शरीरयष्टीवर झाला. सतत मैदानी खेळांमध्ये भाग घेणे, समुद्रावर बोटीवर काम करणे यामुळे येथील पुरुषांची शरीरे प्रमाणबद्ध होऊ लागली आणि त्यातील काही जण पुढे तेथील शिल्पकारांची मॉडेल्स झाले. आणि त्यापासूनच जगातील सर्वात देखण्या अशा शिल्पांची निर्मिती झाली. आणि म्हणूनच अत्यंत देखण्या पुरुषाला ग्रीक गॉड म्हटले जाते.

आपल्या देशापुरते बोलायचे झाले तर आपल्याकडे मायनस (बिलो झीरो) थंडगार तापमानापासून अगदी 50 डिग्री से. उष्णता असलेले प्रदेश आहेत. त्यामुळे साहजिकच इथे शेतीतून घेतली जाणारी पिकेही वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि ते आपलं प्रामुख्याने मुख्य डाएट बनते.

जसे उत्तरेकडे गव्हाचे पराठे, दक्षिणेकडे पाऊस जास्त म्हणून भाताची लागवड आणि जेवणातही प्रामुख्याने भातच. याचाही आपल्या शरीरयष्टीवर परिणाम होत असतो. त्याच प्रमाणे उत्तरेकडे जनता सतत उत्तर-पश्चिमेकडून येणार्याह आक्रमणांना तोंड देत राहिली. त्यासाठी ऊत्तम खाऊन, कसरती करून शरीर मजबूत ठेवणे, ताकद वाढवणे अत्यंत गरजेचे होते आणि म्हणूनच तिथे उंचपुरे, तगडे पंजाबी, जाट, शीख लोकं!

त्यामानाने आपल्या दक्षिणेकडील लोकांची ऊंची कमी, शरीरेही फारशी मजबूत नाहीत. यांना कधी युद्ध वगैरेवर फारसे जावे लागले नाही. त्यामुळे इथे बऱ्यापैकी शांतता. त्याचा परिणाम म्हणून अनेक कला इथे बहरल्या.

घरातील प्रत्येकाला काही ना काही कला आलीच पाहिजे असा जवळ जवळ नियमच असावा दक्षिणेकडे, असं वाटतं. नृत्याचे, गाण्यांचे, कितीतरी प्रकार आणि सततच्या नृत्याच्या सरावामुळे त्यांची कमनीय बनलेली शरीरे.

प्रमाणबद्ध शरीर देखणेपणात भर घालते. अन मग त्यावर कोणतेही कपडे चांगलेच दिसतात. त्यामुळे शरीराचे माप महत्त्वाचे. परंतू या शरीरांचेही अनेक प्रकार आहेत. जे वेगवेगळ्या आकारांवरुन ठरवले जातात.

'फॅशन इज ऑल अबाउट ड्रेसिंग फॉर युवर शेप' असे म्हणतात ते कसे ते पाहू .

पूर्वी आपण आपले कपडे शिवूनच घेत असू. मग रेडिमेड मिळायला लागले. दुकानात गेलं की हवे ते उपलब्ध असतं. आता तर तेवढेही कष्ट घ्यायची गरज नसते. ऑनलाइन जा, हव्या त्या साईट्सवर क्लिक करा आणि जे आवडेल ते विकत घ्या. जाण्यायेण्याचा खर्च, वणवण काहीच नाही. एकतर वेळ वाचतो. एनर्जी वाचते. पुन्हा दुकानपेक्षा कितीतरी जास्त पटीने ऑप्शन्स आपल्याला ऑनलाइन बघायला मिळतात. कपड्याचा फील सोडला तर सगळंच इथे अनुभवलं जाऊ शकते आणि मग आपण एखादा ड्रेस ऑर्डर करतो.

हाच ड्रेस जेव्हा घरी काही दिवसांनी पोचतो आणि आपण घालून बघतो तेव्हा लक्षात येतं की जितका चांगला तो साइटवर दिसत होता तितका इथे दिसत नाहीये. अगदी माप, रंग, पॅटर्न, सगळं चेक करून तर ऑर्डर केला होता ना? मग असं काय झालं? त्याचं कारण हेच की ज्या मॉडेलच्या शरीरावर आपण जो ड्रेस पाहिला होता तिच्या आणि आपल्या शरीराचा आकार सारखा नसतो.

एकतर या मॉडेल्स खूप उंच असतात. किमान 5.7 एवढी ऊंची असतेच त्यांची. शरीरही व्यवस्थित डाएट आणि व्यायाम करून मेंटेन केलेली असतात. आता तर मेकअप, फोटोग्राफी आणि फॉटोशॉपमुळेही त्या अजूनही सुंदर दिसतील हे बघितले जाते.

उदाहरणार्थ दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा दोघी ही जरी उंच असल्या तरी त्यांच्या शरीराचे आकार वेगवेगळे आहेत. दीपिकाचा बॉडी टाइप स्ट्रेट (सरळ) आहे, तर प्रियंकाचा अवर ग्लास त्यामुळे दोघींना एकाच प्रकारचा ड्रेस सुंदर दिसणार नाही. सर्वसाधारणपणे अॅपल, पेअर, अवरग्लास, स्ट्रेट असे बॉडी टाईप्स असतात आणि प्रत्येक बॉडी टाईपसाठी काही नियम असतात.


अॅपल (सफरचंद) सारखा आकार असणार्याी स्त्रीयांचे वजन पोटाकडे जास्त असते. खांदेही रुंद असतात. तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून पोटाला घट्ट बसणारे कपडे शक्यतो टाळावे. सैलसर असावे. तोकडे हात असलेले आणि गुडघ्यावर येतील असे कुडते चालतात. फुगीर हात किंवा गळ्याकडे फ्रिल असेल तर अजून रुंद दिसायला होईल म्हणून टाळावे. स्टँड कॉलर वापरू नये. तोकडे टॉप्स वापरू नयेत. जेणेकरून पोटाकडे लक्ष जाईल. व्ही नेक, यू नेक, अशा नेक लाईन्स चालतात. रंग शक्यतो गडद वापरावेत. परंतु भलेमोठे प्रिंट्स टाळावेत. खूप रंगीबेरंगी कपडेही टाळावेत. सैलसर पॅंन्ट्स घालाव्या.

पेर म्हणजे नासपतीचा आकार असलेल्या स्त्रीयांचे वजन कमरेखाली जास्त असते. हिंदुस्तानात हा प्रकार जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये दिसतो. वजन आटोक्यात ठेवलं तर हा प्रकार कमनीय दिसतो. या व्यक्तिला 'ए लाईन स्कर्ट्स, 'फ्लेअर्ड स्कर्ट्स छान दिसतात.

कारण कंबर नाजुक असते. या व्यक्तींनी ब्राइट रंगांचे व मोठ्या प्रिंट्सचे टॉप्स वापरले तर कमरेखाली वजन बॅलेन्स करायला ते मदत करतात. जीन्स वापरल्यास स्ट्रेटकट असाव्या. ट्राउझर कमरेवर उंच घालावी. मोठी नेकलाईन, फ्रिल असलेले टॉप्स या शरीराला बरे दिसतात.

अवर ग्लास हा शरीराचा आकार सर्वात देखणा मानला जातो. नाजुक कंबर आणि त्यावरची - खालची मापे सारखी असतात. या स्त्रियांना काही छान दिसते. तरीही शक्यतो खूप सैल व बॅगी कपडे टाळावे. नेकलाईन थोडी लो असली तर चालते. व्यवस्थित फिटिंगचे बुटकट आणि स्ट्रेटकट बॉटम्स वापरावेत.

स्ट्रेट हा शरीराचा आकार एखाद्या लांबट आयतासारखा असतो. आपल्या शरीराची जी तीन महत्वाची मापे असतात त्यात खूप फरक नसतो. त्यांनी नेकलाईन लो घालावी. ड्रेसचे हात खूप घट्ट नसावेत. रॅप अराउंड असे स्कर्ट्स घालावे. जीन्स बुटकट किंवा फ्लेअर्ड वापराव्या. ट्राउझर्स मिडवेस्ट असाव्या. बेल्ट लावले जातील असे ड्रेसेस या शरीरांना चांगले दिसतात.

एकदा आपला बॉडी टाईप आपल्याला कळला की त्यानुसार कपडे आणि रंग निवडणे सोपे होते. कालच्या लेखात एकदोन ठिकाणी बॉडी टाईप्सचा उल्लेख मी केला होता. आज त्यावर ही थोडी माहिती द्यावीशी वाटली.

- सुवर्णरेहा जाधव

#exerpt3 #upcoming

Updated : 2 April 2021 6:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top