Home > Max Woman Blog > 
'स्वयंपाकघर' फक्त स्रियांसाठी असते का?


'स्वयंपाकघर' फक्त स्रियांसाठी असते का?


‘स्वयंपाकघर’ फक्त स्रियांसाठी असते का? की स्रियांसाठी इथल्या पुरुषसत्ताक संस्कृतीने तयार केलेला तुरुंग आहे. महिला शिक्षित होऊन अर्थाजन करायला लागल्या तरी त्यांचं स्वयंपाकघर सुटलं का? चूल आणि मूल या जबाबदाऱ्याच्या पलिकडे जाऊन महिलांच्या प्रश्नावर Jeo Baby यांनी The Great Indian Kitchen या मल्ल्याळी सिनेमातून भाष्य केलं आहे. या चित्रपटाचं प्रशांत साजनीकर यांनी केलेलं समीक्षण


स्वयंपाकघर फक्त स्रियांसाठी असते का?
X

सकाळी ती उठते.... निवडते, सोलते, चिरते,कापते, किसते, वाटते, मळते, लाटते, तळते, शिजवते आणि त्याला वाढते....

सकाळी तो उठतो... फास फुस करत कपालभाती आणि योग करतो. आंघोळ करुन टेबलावर नाश्ता करायला येतो. आवरुन, तिने केलेला डबा घेऊन कामाला जातो. संध्याकाळी थकून येतो. तिने वाढलेलं ताजं जेवण जेवतो आणि बेडरुममध्ये तिची वाट पहात जागा राहतो. दिवसभराच्या रहाटगाडग्यातून ती थकलेली आहे. त्याचं त्याला काहीच देणघेणं नसतं.


ती ताटात राहिलेलं खरकटं गोळा करते, ते वेगळं करते, भांडी, ताटं, वाट्या धुते, धुतलेली भांडी नीट लाऊन ठेवते, तुंबलेलं सिंक हात घालून साफ करते, ओटा घासुन पुसून लखलखीत करते आणि थकून (त्याची इच्छा असेल तर ) झोपी जाते.

भारतातल्या बहुतांश घरातली आणि त्याहूनही स्वयंपाकघरातली ही सार्वत्रिक स्थिती आहे. सकाळी उठल्यावर हात धुवून मागे तिच्या लागणारं स्वयंपाकघर दिवसभर नव्हे जन्मभर (२४/७ आणि ३६५ दिवस) सुटत नाही.

प्रत्येक घरामध्ये अविभाज्य असलेलं असं हे किचन किती कंटाळवाणं आणि त्रासदायक असू शकतं याचं अगदी प्रत्ययकारी आणि चपखल चित्रण दिग्दर्शक Jeo Baby यांनी The Great Indian Kitchen मध्ये केलं आहे. Jeo Baby यांनी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात जेव्हा त्यांच्या पत्नीला हातभार लावावा म्हणून स्वयंपाकघरातल्या कामात थोडा हातभार लावायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना स्वयंपाकघरातल्या रोजच्या कंटाळवाण्या कामाची जाणीव झाली.

Jeo Baby म्हणतात, केवळ पुरुष असल्याने मी यातुन माझी स्वत:ची सुटका करुनही घेऊ शकलो असतो. पण देशातल्या कोट्यावधी महिलांचे काय ? त्यांना हा पर्याय आहे का ?

त्यांच्या मते स्वयंपाकघर हा स्रियांचा एक प्रकारचा तुरुंगच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या बहुतांश पुरुषांना याची जाणीव असणे दूरच… पण ते या कामाची साधी दखल सुध्दा घ्यायला तयार नसतात. एखाच्या मित्राच्या घरी जेवायला यायचं निमंत्रण आलं की Jeo Baby केवळ त्या घरातल्या स्त्रियांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन तिथे जाणं टाळतात.

The Great Indian Kitchen मध्ये या स्वयंपाक घरातल्या कामाचं इतकं इंत्यभूत चित्रण केलंय आणि ते पुन्हा पुन्हा दिसत राहतं. हे पाहून प्रेक्षकांनाही कंटाळवाणं होतं. नेमकं हेच दिग्दर्शकाला दाखवून द्यायचं आहे की, जर तुम्हाला हे पाहणं सुध्दा त्रासदायक होत असेल तर तिला ते प्रत्यक्ष करताना किती कंटाळवाणं होत असेल?

केवळ शिक्षण आणि अर्थाजन सुरु झालं म्हणजे स्त्री स्वतंत्र झाली असं अनेकांना वाटत असलं तरी केवळ स्त्री असण्यामुळे तिच्यावर पडणाऱ्या चूल आणि मूल या जबाबदाऱ्यातूनच तिची मुक्तता काही होत नाही. यातली चूल ही जबाबदारी किती व्यापक आणि कटकटीची आहे. याची बरेचदा कल्पना नसते. चित्रपटात केवळ स्वयंपाकघर आणि तिथेच तयार होणारे पदार्थ आणि त्यामागचे श्रम दाखवले असले तरी प्रत्यक्षात मात्र, अगदी किराणा आणण्यापासून ते भाजीपाला, दुध आणणे, दळणे, नीट साठवणे, निवडणे, धुणे, योग्य प्रकारे नसाडी होऊ न देता वापरणे, नियोजन अशा अनेक गोष्टींपासून स्वयंपाकघर सुरु होतं. पानात पदार्थ पडण्यापूर्वी अशा अनेक गोष्टींची तयारी त्यामागे असते आणि मिटक्या मारत खाणाऱ्या अनेकांना त्याची जाणीवही नसते.

याची एक दुसरी महत्त्वाची बाजू अशी की, एखाद्या स्त्रीच्या स्वयंपाक घरातल्या कामांना पर्याय म्हणुनही दुसरी स्त्रीच उभी राहते. तिला बरं नसेल तर घराची जबाबदारी घ्यायला दुसऱ्या एखाद्या स्त्रीचाच विचार केला जातो. घरातल्या पुरुषांनी घरातल्या स्त्रीच्या कामाची जबाबदारी उचलली आहे. असे अभावानेच पहायला मिळते. सहज एखाद्या मित्र मैत्रिणींच्या कुटुंबात जेवायला जेव्हा बोलावले जाते. तेव्हाही सगळे पुरुष बाहेर गप्पा मारत बसणार आणि सगळ्या स्त्रिया स्वयंपाकघरात अशीच विभागणी होते. स्त्रिया गप्पा मारत बसल्यात आणि पुरुष स्वयंपाक घरात आहेत असं कधीच होत नाही.



दिग्दर्शक Jeo Baby यांचं दिग्दर्शन अप्रतिम आहे. माजघरातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी त्यांनी कॅमेऱ्यातून फार विलक्षणरित्या टिपल्या आहेत. रुढी परंपरा आणि स्त्रीची मासिक पाळी आणि याकडे पाहणारा कर्मठ समाज या विषयालाही चित्रपट स्पर्श करतो. सर्व कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहेत. दिग्दर्शकाने अनेक प्रसंगात ठोकळ संवाद न लिहिता कलाकारांच्या उस्फुर्ततेवर जास्त भर दिला आहे. मुख्य भुमिकेत Nimisha Sajayan ने जान ओतली आहे. पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रातिनिधिक चेहरा म्हणुन Suraj Venjaramoodu याने सुंदर साथ दिली आहे.


चित्रपट मल्यालम आहे. त्या अर्थाने ही गोष्ट केरळमधली आहे. जिथे शंभर टक्के स्त्रिया साक्षर आहेत. स्त्री प्रधान संस्कृती हे वैशिष्य असणाऱ्या केरळमधल्या स्त्रीची जर ही व्यथा असेल तर उत्तर भारतात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

चित्रपटातल्या कोणत्याच पात्रांना नावं नाहीत किंवा आडनावं नाहीत. स्त्रीची ही व्यथा प्रातिनिधिक असल्याचेच यातुन दिग्दर्शक स्पष्ट करतो. या चित्रपटातली नायिका सुशिक्षित आहे. तिला नृत्याची आवड आहे. तिला नृत्यशिक्षिका व्हायचं आहे. परंतु तिच्या नवऱ्याला आणि सासरा नाही. तिच्या आवडीनिवडींशी काही देणं घेणं नाही. कुठेही ठोस विरोध न करता गोड बोलुन ते तिच्याकडुन त्यांच्या मनाप्रमाणे वागायची अपेक्षा करत राहतात.

या चित्रपटात कोणीच खलनायक नाहीत. टिपिकल चित्रपटांत दाखवला जातो. असा कोणताही छळ नाही. परंतु पुरुषप्रधान व्यवस्थाच इथे खलनायकाची भुमिका बजावते. चित्रपटाचा शेवटही विचार करायला लावणारा आहे.

प्रत्येक स्त्रीने हा चित्रपट पहावाच पण ज्याला आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे, मैत्रीण आहे, ऑफिसमधली एखादी स्त्री सहकारी आहे, शाळेत शिकवणारी शिक्षिका आहे, घरात घरकाम करणारी बाई आहे, अशा कोणत्याही नात्यात जिथे स्त्री आहे. अशा प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट पहायला हवा. घरातील आयांनी आपल्या मुलांना आवर्जून हा चित्रपट दाखवावा. घरातल्या स्त्रिला स्वयंपाकघरात थेट मदत जरी करता तर उत्तमच… पण किमान तिच्या दृष्य आणि अदृष्य कष्टांची बोचरी जाणीव जरी पुरुषांना झाली तरी चित्रपटाचे सार्थक होईल. अॅमेझॉन प्राईमवर चित्रपट उपलब्ध आहे.

प्रशांत साजणीकर

Updated : 9 April 2021 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top