Home > Max Woman Blog > केवळ २१०० रुपयांमध्ये कुटुंबाच्या मदतीने सुरु केला व्यवसाय

केवळ २१०० रुपयांमध्ये कुटुंबाच्या मदतीने सुरु केला व्यवसाय

केवळ २१०० रुपयांमध्ये कुटुंबाच्या मदतीने सुरु केला व्यवसाय
X

कोरोनासारख्या कठीण काळात जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा त्या काळात एका सामान्य कुटुंबाने मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. लॉकडाउनमुळे सगळं व्यापारी जग थांबलं होतं, अनेक लोकांचे रोजगार हिरावले गेले होते, आणि सर्वत्र एक अनोळखी भीती पसरली होती. परंतु, त्या अंधाऱ्या काळातही कुटुंबाला आधार देण्यासाठी, स्वत:च्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आणि इतरांना रोजगार देण्याच्या हेतूने कांगुलकर कुटुंबाने मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप संघर्ष होता, संसाधनांची कमतरता होती, विक्रीची मंदी होती, परंतु त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाच्या कष्टामुळे आज त्यांचा व्यवसाय फुलला आहे. या अवघड परिस्थितीतून कांगुलकर कुटुंब आता लाखो रुपये कमवत आहेत. आपण अशीच एक मसाल्यांची कहाणी जाणून घेणार आहोत.

मसाल्यांची चव देशभरातील नागरिकांना देण्यासाठी आधुनिकतेची जोड देऊन त्याचे मार्केटिंग करावे, अशी कल्पना द्रौपदी कांगुलकर यांच्या मनात आली आणि बघता बघता ही कल्पना सत्यात उतरून त्यांच्या कुटुंबाला या व्यवसायातून मोठा हातभार मिळाला. जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे खरं तर सर्वांनाच चटके बसत होते. पण सर्वसामान्य, नोकरदार, लहान-मोठे व्यापारी, किंवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत होता. हाताला काम नाही, परिवारातील सर्व सदस्य घरीच बसून असल्याने द्रौपदी कांगुलकर यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांचे पती संतोष कांगुलकर एका सामाजिक संस्थेत १५ वर्षांपासून शेफ म्हणून काम करतात. पण एकट्याच्या पगारावर आई, वडील, पत्नी आणि दोन मुले यांचा उदरनिर्वाह होणे अवघड होत चालले होते. मसाला उद्योगात भविष्यात खूप मोठी संधी असेल, असे द्रौपदी कांगुलकर यांच्या लक्षात आले आणि कांगुलकर परिवाराने मसाला व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सुरुवातीला शासनाच्या नियमाप्रमाणे व्यवसायाचा परवाना, उद्योग आधार, सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि ब्रँडचे नाव 'शेफ मसाले' ठेवले. त्यांनी परिवारातील सदस्यांच्या मदतीने अवघ्या २१०० रुपयांत व्यवसाय सुरू केला. बघता बघता भरपूर ऑर्डर यायला लागल्या आणि बंगलुरू, मुंबई, नाशिक, झारखंड, छत्तीसगढ़ अशा भरपूर ठिकाणांवरून मसाल्यांची मागणी वाढत गेली.

मसाले तयार करत असताना पारंपरिक पद्धतीने ते तयार केले जातात, म्हणूनच ते खूपच चवदार बनतात. आई आणि आजीच्या पारंपरिक पद्धतींचा अनुभव जो अनेक पिढ्यांपासून चालत आलेला होता, त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. त्या अनुभवासोबतच, पत्नी आणि स्वत:च्या मेहनतीची जोड देऊन, ४१ प्रकारचे मसाले तयार केले आणि त्यांचा स्वाद ग्राहकांच्या मनात घर करू लागला. सगळ्या कुटुंबाच्या एकत्रित परिश्रमामुळे हे मसाले अधिक खास बनले. या व्यवसायामुळे अनेक महिलांना या व्यवसायात हाताशी घेऊन त्या महिलांना सुद्धा रोजगार मिळत आहे, असे संतोष कांगुलकर यांनी सांगितले.

Updated : 11 Dec 2024 3:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top