माझं लाॅकडाऊन सुरूच!
X
बघता बघता लाॅकडाऊनचे दिवस संपले. आता लाॅकडाऊन शिथिल होणं सुरू आहे. गेल्या काही महिन्यात नियमित गृहसेविका नसल्यानं बऱ्याच गोष्टी स्वत: कराव्या लागल्या. यामुळे तुमच्या क्षमतांची नव्यानं ओळख झाली. आपण करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला असला ( अर्थात, तो नव्हता असंही नव्हतं ) तरीही त्रास सहन करावा लागलाच. कारण दिव्यांग व्यक्तींना साधा चहा बनवून डायनिंग टेबलपर्यंत आणायला बऱ्याच कसरती कराव्या लागतात. घर हँडिकॅप फ्रेंडली असलं तरीही.
[gallery size="medium" bgs_gallery_type="slider" columns="1" ids="14210,14213,14212"]
पण खरी कसरत आता सुरू होणार आहे. मी घरूनच काम करू शकत असल्यानं ते टेंशन नाही. पण मला स्वत:ला बाहेर भटकायला आवडतं. तशी भटकंती बरीच झालीही आहे. आता सध्या तरी मी पर्यटनाचा विचारही करत नाहीय. पण कोरोनामुळे समोर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण आपल्या नकळत शंका घेतो. अगदी घरातली एखादी व्यक्ती बाहेरून आली, तरीही! आता ठराविक वेळेत तुम्ही पाय मोकळे करायला बाहेर पडू शकता. पण मी हे करू शकत नाही. कारण जिना चढताना, उतरताना मला त्याला पकडावेच लागते. शिवाय आपले रस्ते, विशेष करून फुटपाथ अजिबातच डिसेबल फ्रेंडली नसल्यानं मला फुटपाथवर चढताना मदत लागते. मग एक तर मी कुणाची मदत घेताना कचरणार, मनात नाना शंका येणार आणि मलाही मदतीचा हात देताना समोरच्याच्या मनात निखळता राहणार नाही. मग सतत हाताला सॅनिटायझर लावावं लागणार.
हे ही वाचा
‘मनरेगा’वर राजकारण करु नका गरिबांना मदत करा- सोनिया गांधी
‘डॅशींग नवरा, साधी बायको’ पाहा बच्चू कडूंचा डॅशींग संसार
[gallery columns="2" size="medium" bgs_gallery_type="slider" ids="14214,14211"]
मी सहसा टॅक्सीनं प्रवास करते. आता त्या टॅक्सीत मी निश्चिंत मनान कशी बसणार? चढताना समोरच्या सिटला धरल्याशिवाय मला चढता येत नाही. म्हणजे बाहेरच्या वस्तूंना जास्तीत जास्त स्पर्श होणार. मग त्यापेक्षा बाहेर जाणंच नको, असं वाटत राहणार. पुढचे काही महिने उपहार गृह, थिएटर्स टप्प्या टप्प्यानं सुरू होतीलही, पण जोपर्यंत कोरोना नियंत्रणात येत नाही, मनातला भयगंड संपत नाही, तोवर माझं लाॅकडाऊन चालूच राहणार.
- सोनाली देशपांडे